सावंतवाडी : नागपूर येथे २८ सप्टेंबर रोजी होणाऱ्या ओबीसी मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा ओबीसी आणि आरक्षित समाज महासंघाने कुडाळ येथे दोन दिवसांचे लाक्षणिक उपोषण आणि इशारा आंदोलन सुरू केले आहे.

आंदोलनाची सुरुवात कुडाळ येथील राजमाता जिजाऊंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून झाली. मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देऊ नये, ही या आंदोलनाची मुख्य मागणी आहे.

​या आंदोलनात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३२ विविध ओबीसी समाजांचे प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. कुडाळच्या जिजामाता चौकात हे आंदोलन आयोजित करण्यात आले असून, आंदोलकांनी राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. यावेळी ओबीसी आंदोलनाच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली.

​प्रमुख मागण्या आणि नेत्यांची भूमिका

यावेळी बोलताना सिंधुदुर्ग जिल्हा ओबीसी आणि आरक्षित समाज महासंघाचे अध्यक्ष नितीन वाळके म्हणाले, “मराठा समाजाला आरक्षण देण्यास आमचा विरोध नाही, मात्र ते ओबीसी कोट्यातून नसावे.” त्यांनी ‘हैदराबाद गॅझेट’ रद्द करण्याची मागणी केली. तसेच, बिहारमध्ये सुरू असलेल्या जातगणनेच्या धर्तीवर देशपातळीवरही जातगणना करण्याची मागणी करण्यात आली.

​या आंदोलनाला माजी आमदार राजन तेली, माजी आमदार प्रमोद जठार, आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी भेट देऊन पाठिंबा दर्शवला. आंदोलनात नितीन वाळके, नंदन वेंगुर्लेकर, काका कुडाळकर, सुनील भोगटे, अतुल बंगे, रमण वायंगणकर, एकनाथ तेली, श्री. भालेकर, राजन नाईक, आनंद मेस्त्री, कृष्णा तेली, समिल जळवी, किरण शिंदे, राजू गवंडे, श्रेया गवंडे, वर्षा कुडाळकर यांच्यासह मोठ्या संख्येने ओबीसी बांधव उपस्थित होते.