पंढरपूर : ‘साडेसातशे वर्षांनंतरही संत ज्ञानेश्वर माउलींच्या विचारांची ताकद आजही महाराष्ट्राला प्रेरणा देते. ज्ञानेश्वरीच्या आध्यात्मिक तेजावरच महाराष्ट्राची संस्कृती आणि वारकरी परंपरा टिकून आहे,’ असे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले. श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७५० व्या जयंती वर्षानिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समिती, श्री क्षेत्र पंढरपूर व श्री ज्ञानेश्वरी अभ्यासवर्ग-सामूहिक चिंतन महाप्रकल्प, अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने श्री संत तुकाराम भवन येथे आयोजित श्री ज्ञानेश्वरी चिंतन राज्यस्तरीय संमेलनाचे उद्घाटन पालकमंत्री गोरे यांच्या हस्ते झाले.

यावेळी आमदार अभिजित पाटील, मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, सदस्य शकुंतला नडगिरे, संभाजी शिंदे, ह.भ.प. प्रकाश जवंजाळ, ह.भ.प. ज्ञानेश्वर देशमुख (जळगावकर), ॲड. माधवी निगडे, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, मुक्ताई संस्थानचे अध्यक्ष रवींद्र पाटील, ह.भ.प. बंडा तात्या कराडकर, श्री. सहस्रबुद्धे, प्र. व्यवस्थापक पृथ्वीराज राऊत तसेच अनेक मान्यवर वारकरी व भाविक उपस्थित होते. पालकमंत्री गोरे म्हणाले, की पंढरपूर ही संतांच्या विचारांनी प्रेरित झालेली भूमी आहे. ज्ञानेश्वरीवर चिंतन करण्यासाठी राज्यभरातील अभ्यासक एकत्र येत आहेत, ही अत्यंत गौरवाची बाब आहे. विठ्ठल-माउलींचा सेवक म्हणून मला या संमेलनात सहभागी होण्याचा आनंद आहे.

आषाढी वारीतील सेवेसंदर्भात बोलताना त्यांनी सांगितले की, मंदिरे समिती व प्रशासनाने मिळून केलेल्या कामाचे कौतुक सर्वत्र होत आहे. वारकरी भाविकांनी दिलेल्या सुविधांचे मूल्यमापन केले असून त्यांचं समाधान हेच आमचं यश आहे. भाविकांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन व मंदिर समिती यांच्यातील समन्वय अधिक बळकट केला जाईल.

संमेलनात परिसंवाद, व्याख्याने

संमेलनात रविवारी ५ ऑक्टोबर रोजी “श्री ज्ञानेश्वर महाराज अद्वितीय तत्वज्ञ” या विषयावर उल्हास घोडके, इंदुताई खेडकर, प्रा. सुदाम देवखिळे, सुचित्रा भालेराव, संजय खेले यांचा सहभाग असून, या परिसंवादाचे अध्यक्ष दिलीप धनेश्वर असणार आहेत. या नंतर श्रीमद् भगवद्गीता व ज्ञानेश्वरीतील पात्रांचा तौलनिक विचार या विषयांवर ह.भ.प. चैतन्य महाराज देगलूरकर यांचे व्याख्यान तर ह.भ.प. जयवंत महाराज बोधले श्री ज्ञानेश्वर महाराज विरचित अमृतानुभव, अभय टिळक “श्री ज्ञानदेव, ज्ञानदेवी आणि भाषा व्यवहार यावर व्याख्याने देणार आहेत, अशी माहिती औसेकर महाराज यांनी दिली.