लोकसत्ता वार्ताहर

कराड : सुर्ली (ता. कराड) येथे डांबर चोरी करणारी आंतरराज्य टोळी कराड तालुका गुन्हे प्रकटीकरण शाखेने पकडली. त्यांच्याकडून दोन लाख रुपये किमतीचे चार टन डांबर व १५ लाख रुपये किमतीचा टँकर असा १७ लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

राजेश जसवंत सिंग (वय ४०), विजयपाल उमेद सिंग (वय २९ दोघेही रा. भुटोली, ता. निमकथाना, जि. सिक्कर, राजस्थान), प्रतीक अशोक बोरकर (वय २५ रा. एकोडी, ता. वारासोणी, जि. बालाघाट, मध्यप्रदेश) व आदम दादाहयात शेख ( वय ४२, रा. चेंबूर- मुंबई) अशी अटक करण्यात आलेल्या टोळी सदस्यांची नावे असून, न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी दिली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार सुर्ली गावच्या हद्दीतील लिनोफ डांबर बॅचमिक्स कंपनीच्या डांबर प्लॅन्टमधून चार टन डांबर व टँकर असा मुद्देमाल चोरून नेल्याबाबत उद्योजक उदय धनाजीराव जाधव (रा. सैदापूर- कराड) यांनी कराड ग्रामीण पोलिसात तक्रार दिली होती. त्या अनुषंगाने पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर, पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांनी कराड ग्रामीण गुन्हे प्रकटीकरण शाखेला तपासाच्या सूचना दिल्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, महेंद्र जगताप यांना चोरी करणारे परप्रांतीय कामगार हे बॅगा घेऊन त्यांच्या मूळ गावी पळून जाण्याच्या तयारीत असल्याची खबर सूत्रांकडून मिळाली. यावर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने सुर्ली भागात सापळा रचून राजेश सिंग, विजयपाल सिंग, प्रतीक बोरकर या तिघांना पकडले. त्यांच्याकडे कसून चौकशीअंती आदम शेख हा चोरलेले डांबर टँकरमधून घेऊन मुंबईकडे पसार झाल्याची माहिती समोर आली. यावर पोलिसांनी शेखला चेंबूरमधून अटक केली. त्याच्याकडे चोरून नेलेले दोन लाख रुपये किमतीचे चार टन डांबर व १५ लाख रुपयांचा टँकर असा एकूण १७ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.