सांगली : पावसाची वर्दी घेऊन चातक पक्षी थेट आफ्रिकेतून कृष्णाकाठी मुक्कामी डेरेदाखल झाला आहे. हजारो किलोमीटरचा प्रवास करून आलेला पक्षी पावसाच्या आगमनाचे वर्तमान घेऊन येतो, असा शेतकरी वर्गाचा होरा कायम असून, त्याचा कृष्णाकाठी चार महिने मुक्काम राहणार आहे.
आभाळाकडे डोळे लाऊन बसलेल्या शेतकऱ्यांना पाऊस येणार असल्याची वर्दी निसर्गातील पक्षांकडून मिळत असते. कुळीव कुळीव म्हणणारी कोकिळा, शेतकऱ्यांना पेरते व्हा, अशी साद घालणारा पावशा, हे नेहमीच बळीराजाला पावसाच्या आगमनासाठी सज्ज ठेवत असतात. त्याचबरोबर आणखी एक पाहुणा अगदी वेळेत थेट आफ्रिकेतून पावसाचा सांगावा घेऊन कृष्णाकाठावर दाखल झाला आहे.
हा पाहुणा म्हणजे चातक. काळ्या पांढऱ्या चातकाच्या डोक्यावर एखाद्या राजकुमाराच्या मस्तकी शोभावा असा काळा तुरा असतो. त्याचा साळुंकी एवढा आकार, लांब शेपूट, शरीराचा वरील सर्व भाग काळ्या रंगाचा असतो. हनुवटी, मान व पोटाचा भाग पांढरा असतो. पंखांवर रुंद पांढरा पट्टा असल्यामुळे उडतानाही हा चातक पक्षी सहज ओळखतो.
शेपटीतील पिसांची टोके पांढरी असतात. डोळे तांबडे तपकिरी, चोच काळी व पाय काळसर निळे असतात. हे एकेकटे किंवा यांची जोडी असते. हा चातक पक्षी सध्या पलूस तालुक्यातील कृष्णाकाठावर बंचाप्पा बनी दाखल झाला आहे. पावशा, बुलबुल, रॉबीन या गाणाऱ्या पक्षांसोबतच चातकाच्या सुरांची रानमैफल कृष्णाकाठावर रंगते आहे. या चातक पक्षाचा मुक्काम जून ते सप्टेंबर म्हणजे संपूर्ण पावसाळी हंगामात कृष्णाकाठी राहणार असल्याचे पक्षी निरीक्षक संदीप नाझरे यांनी सांगितले.