दापोली : गेल्या काही दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे खेड तालुक्यातील नद्या-नाले तुडुंब भरून वाहत आहेत. खेड शहरालगतची जगबुडी नदीच्या सतत वाढत्या पाण्यामुळे धोकादायक स्थितीत पोहोचली आहे. नदीची इशारा पातळी ५ मीटर असून धोका पातळी ७ मीटर आहे. सध्या नदीचे पाणी ७.२० मीटरवरून वाहत असल्याने खेड शहराला पुराचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. खेडसह चिपळूण व दापोली तालुक्यात पावसाची संततधार सुरुच राहिली आहे.
जगबुडी नदीचे पाणी पात्राबाहेर पडून खेडमधील मटण-मच्छी मार्केट परिसर आणि शेजारील रस्त्यांमध्ये शिरले आहे. यामुळे व्यापारी व नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. दापोली नाका येथे रस्त्यावर पुराचे पाणी आल्याने वाहतुकीवरही मोठा परिणाम झाला आहे. याशिवाय खेड-दापोली मार्गावरील सुर्वे इंजिनिअरिंगजवळ रस्त्यावर पाणी आल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. तालुक्यातील खडीपट्टा विभागाचा खेड शहराशी संपर्क तुटल्याची माहितीही समोर आली आहे.
दरम्यान, खेड नगरपरिषद प्रशासन सतत नागरिकांना सावधगिरीचा इशारा देत आहे. १६ ऑगस्ट पासूनच नगरपरिषदेकडून अधिकृत इशारा जारी करण्यात आला आहे. त्यात नागरिकांना व व्यापाऱ्यांना सतर्क राहण्याचे व आपले कुटुंबीय व सामान सुरक्षित स्थळी हलवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
भारतीय हवामान खात्याने पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिल्यामुळे प्रशासन हायअलर्टवर असून, पुरस्थितीचा सामना करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा तैनात ठेवण्यात आली आहे. खेड शहरात वाढत्या पाण्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, नगरपरिषदेच्या सूचनांचे पालन करून सुरक्षिततेची खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. या पावसामुळे चिपळूण शहराला पुराचा धोका निर्माण झाला आहे. शहरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात पाणी शिरल्याने अधिकारी व कर्मचारी वर्गाची चांगलीच तारांबळ उडाली.
चिपळूण परिसरात रात्रभर मुसळधार पाऊस कोसळत असल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे. मात्र, सध्या पाणीपातळी नियंत्रणात असून प्रशासनाने नागरिकांना काळजी न करण्याचे आवाहन केले आहे. चिपळूण प्रांताधिकारी यांनी पावसामुळे नागरिकांनी घाबरून जावू नये, सर्व परिस्थिती नियंत्रणात आहे. तसेच अनावश्यकपणे नागरिकांनी घराबाहेर पडू नये. प्रशासनाकडून सर्व माहिती दर अर्ध्या तासाला देण्यात येईल, असे सांगितले.
दापोली येथील दादर पुलावरून पाणी जावू लागल्याने येथील वाहतुक ठप्प झाली आहे. जिल्ह्यात कोसळणा-या या पावसाचा दापोली, खेड, चिपळूण मंडणगड व संगमेश्वर तालुक्यांना मोठा फटका बसला आहे.