विश्वशांतीचा प्रचार करणाऱ्या जैन धर्मगुरू प्रशांत विजयजी यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. विश्वशांतीचा प्रचार करणारे जैन धर्मगुरू प्रशांत विजयजी गेली १२ वर्षे रायगड जिल्ह्य़ातील इंदापूरजवळील पोटनेर येथील जैन मंदिरात वास्तव्य करत होते. कोकण विभागात जैन धर्माचा प्रसार करून शांतिधाम उभारण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली होती. सोमवारी रात्री दहाच्या सुमारास मंदिरातील पुजाऱ्याला प्रशांत विजयजींच्या ओरडण्याचा आवाज आला. म्हणून तो धावत मंदिरात दाखल झाला. तेव्हा प्रशांत विजयजी मंदिरात रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे त्यांना आढळून आले. मंदिराचे बांधकाम करणारे दोन कामगार बाजूला असल्याचे दिसून आले. पुजाऱ्यांनी माणगावमध्ये फोन करून स्थानिकांना ही माहिती दिली. मात्र तोवर प्रशांत विजयजी यांचा मृत्यू झाला होता. मंदिराचे दुरुस्ती काम सध्या सुरू होते. यासाठी राजस्थानहून दोन कामगार बोलवण्यात आले होते. या कामगारांचे पशावरून प्रशांत यांच्याशी वाद झाला होता. यातून त्यांची या कामगारांनी लोखंडी रॉडच्या साह्य़ाने निर्घृण हत्या केली.  या प्रकरणी पोलिसांनी मंदिराचे काम करणाऱ्या फुलराम मेघवाल आणि प्रकाश कुमार गर्ग या दोघांना अटक केली आहे.