राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाने राजकारणात उलथापालथ झाली आहे. शिंदे यांच्या गटात राज्यभरातील अनेक आमदार सामील होत आहेत. जिल्ह्यातील शिवसेनेचे आमदार शिंदे यांच्या गटात सामील झाले आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ भडगाव तालुक्यातील शिवसेना, युवासेना व महिला आघाडीच्या पदाधिकार्‍यांनी रक्ताने पत्र लिहून त्यांना पाठिंबा दर्शविला आहे. या आगळ्यावेगळ्या आंदोलनामुळे जिल्ह्याचे लक्ष वेधले गेले आहे.

पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना पाठिंबा दर्शविण्यासाठी भडगाव तालुक्यातील निष्ठावंत शिवसेना कार्यकर्ते शुक्रवारी (२३ जून) भडगाव येथील शासकीय विश्रामगृहात आवारात एकत्र आले होते. यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत पदयात्रा काढून पाठिंबा दर्शवण्यात आला. तेथे पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून विविध घोषणाबाजी देखील करण्यात आली. त्यामुळे परिसर दणाणला होता. यावेळी युवासेनेचे जिल्हा सरचिटणीस लखीचंद पाटील, निलेश पाटील, रघुनंदन पाटील यांनी रक्ताने पत्र लिहीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दर्शवला.

…हाच आमचा पाठिंबा समजावा –

पत्रात म्हटले आहे, “सन्माननीय उद्धवसाहेब आम्ही, तुमच्या पाठीशी आहोत. तुम्ही फक्त लढा. आम्ही आमच्या स्वतःच्या रक्ताने पत्र लिहून रक्त बलिदान करीत आहोत. आम्ही सर्व शिवसैनिक आपल्यासोबत आहोत. हे रक्ताने लिहिलेले पत्र हाच आमचा पाठिंबा समजावा.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यावेळी युवासेनेचे जिल्हा सरटिणीस लखीचंद पाटील, जिल्हा उपप्रमुख निलेश पाटील, जिल्हा समन्वयक अनिल पाटील, माजी नगरसेवक शंकर मारवाडी, युवासेनेचे शहरप्रमुख बंटी सोनार, माधव जगताप, चेतन भोई, बाबाजी पाटील, आबा महाले, गणेश परदेशी, जे. के. पाटील, प्रशांत गालफाडे, पप्पू पाटील, भोला पाटील, महिला आघाडीच्या पुष्पाबाई परदेशी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.