“या देशात भाजपा जो टोकाचा जातीयवाद करतो आहे त्याला जातीयवादानं नाही, तर धर्मनिरपेक्षवादाने उत्तर देवू, असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केलं. लातूर जिल्ह्यातील उदगीर नगरपंचायतीच्या नगरसेवकांनी आज (१४ ऑक्टोबर) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी जयंत पाटील बोलत होते.

जयंत पाटील म्हणाले, “अल्पसंख्याक समाजातील मान्यवर नेते व कार्यकर्ते मधल्याकाळात भावनेच्या भरात एमआयएम या पक्षात गेले होते. त्या सर्वांच्या लक्षात आले की, भाजपा एमआयएमचा दुरुपयोग सत्तेत टिकण्यासाठी करत आहे. भाजपाचे हितसंबंध जपण्यासाठी एमआयएमला उभं करुन अल्पसंख्याक समाजाची मते विभाजीत करुन भाजपाचा विजय होण्यासाठी मदत होते आहे हे लक्षात आले.”

“ही चूक पुन्हा होणार नाही म्हणून एमआयएममधील अनेक कार्यकर्ते राष्ट्रवादीत येत आहेत”

“ही चूक पुन्हा होणार नाही म्हणून एमआयएममधील अनेक कार्यकर्ते, अनेक शहरात, जिल्ह्यात राष्ट्रवादीत येत आहेत. ही ताकद वाढत असताना अल्पसंख्याक समाजाने पाठिंबा दिला, तर ही ताकद आणखी वाढायला मदत होईल. आपल्या हितसंबंधांना बाधा पोहचणार नाही. नगरपरिषदेत आपल्या हिताचे संरक्षण होईल,” असंही जयंत पाटील यांनी नमूद केलं.

यावेळी जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेल्या सर्व नगरसेवकांचे पक्षात स्वागत केले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उदगीर नगरपंचायतीतील एमआयएमच्या ५ नगरसेवकांनी व कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, राज्यमंत्री संजय बनसोडे, प्रदेश सरचिटणीस बसवराज पाटील, अल्पसंख्याक सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर विद्रोही, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, युवक कार्याध्यक्ष सूरज चव्हाण आदी उपस्थित होते.

हेही वाचा : “आपले फक्त ५४ आमदार आहेत, लक्षात घ्या”, जयंत पाटलांनी दिली कार्यकर्त्यांना तंबी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एमआयएमचे लातूर जिल्हाध्यक्ष व नगरसेवक सय्यद ताहीर हुसेन, नगरसेवक जरगर शमशोद्दीन, नगरसेवक शेख फयाज नसोरोद्दिन, नगरसेवक हाश्मी इमरोज नुरोद्दीन, नगरसेवक इब्राहिम पटेल (नाना) यांच्यासह शेख अहेमद सातसैलानी, महंमदरफी भाई, सय्यद अन्वर हुसेन, शेख अजीम दायमी, शेख अबरार, सय्यद सोफी आदींनी प्रवेश केला.