पंढरपूर : सोलापूर जिल्ह्यात दिवाळीत राजकीय फटाकेही फुटण्याची शक्यता आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील चार माजी आमदार, शहरातील माजी उपमहापौरांसह काही नगरसेवक लवकरच भाजपामध्ये प्रवेश करण्यास इच्छुक आहेत.

याबाबत बैठका सुरू असून, लवकरच त्यांच्या पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम पार पडेल, असे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. ज्या ठिकाणी पक्षाची ताकद वाढणार तिथे या प्रवेशाला प्राधान्य दिल्याचेही गोरे यांनी यावेळी सांगितले.

आगामी स्थानिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री गोरे यांनी सोलापूर जिल्ह्यात भाजपाने जोरदारपणे पक्ष बांधणी सुरू केली आहे. यामध्ये जिथे पक्षाची ताकद कमी आहे, अशा भागात पक्ष प्रवेशास मान्यता देत पक्षाचे बळ वाढवले जाणार असल्याचे गोरे यांनी सांगितले. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात भाजप मागे पडला, त्या ठिकाणचे राजकीय नेते इच्छुक आहेत. या सर्वांना पक्षात घेण्याबाबत मुंबई, सोलापूर येथे बैठका सुरू झाल्या आहेत.

यामध्ये माढा येथील माजी आमदार बबन शिंदे यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे, मोहोळचे माजी आमदार राजन पाटील व माजी आमदार यशवंत माने, माजी आमदार दिलीप माने यांची मुख्यमंत्री फडणवीस यांच्या निवासस्थानी पक्ष प्रवेशाबाबत बैठक झाल्याचे गोरे यांनी मान्य केले. याशिवाय सांगोल्याचे माजी आमदार दीपक साळुंखे यांनीही आपली भेट घेत पक्ष प्रवेशासाठी चर्चा केल्याचे गोरे यांनी सांगितले.

दरम्यान सोलापूर शहरात महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही माजी महापौर, नगरसेवक भाजपात प्रवेश करण्यास इच्छुक आहेत. या इच्छुकांसोबत आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार देवेंद्र कोठे, शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर आणि महिला अध्यक्षा रंजिता चाकोते या भाजप पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली आहे.

शहरात ज्या ठिकाणी भाजपाची ताकद कमी आहे. त्या ठिकाणी अशांना प्रवेश दिले जाणार आहेत. जिल्ह्यात पक्षाची ताकद मोठी आहे. मात्र तरीही अद्याप जिथे पक्ष कमी आहे, अशा भागात अन्य पक्षातील इच्छुकांना संधी देत पक्ष विस्तार करण्याचे धोरण भाजपने स्वीकारले आहे. या धोरणानुसार जिल्ह्यातील चार माजी आमदारांसह शहरातील माजी उपमहापौरांसह काही नगरसेवक लवकरच भाजपामध्ये प्रवेश करण्याची शक्यता गोरे यांनी व्यक्त केली.

भाजपा प्रवेशाबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत इच्छुकांची बैठक झाली. तर काही नेत्यांची स्वतंत्र भेट घेवून चर्चा सुरू आहे. या सर्वांचा लवकरच पक्ष प्रवेश होईल. जिल्ह्याचा विकास करताना सर्वांना सोबत घेवून काम करणार आहोत. त्याच बरोबरीने पक्षाची ताकद वाढविण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत. त्याचा फायदा आगामी निवडणुकीत दिसून येईल. – पालकमंत्री जयकुमार गोरे.