Jitendra Awhad : शरद पवार यांच्या हस्ते दिल्लीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. एकनाथ शिंदेंना महादजी शिंदे गौरव पुरस्कार देऊन शरद पवार यांनी त्यांचा सन्मान केला. यानंतर संजय राऊत हे चांगलेच भडकले आहेत हे पाहण्यास मिळालं. संजय राऊत यांनी राजकारण आम्हालाही कळतं असं म्हणत शरद पवारांवर टीका केली. या टीकेला आता जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार उत्तर दिलं आहे.

संजय राऊत काय म्हणाले होते?

संजय राऊत म्हणाले, “महाराष्ट्राचं राजकारण फार विचित्र दिशेने चाललं आहे. कोण कोणाला टोप्या घातलंय आणि कोणाच्या टोप्या उडवतंय, हे पुन्हा एकदा समजून घ्यावं लागेल. ज्या एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचं सरकार पाडलं, बेईमानी केली त्यांच्या कार्यक्रमाला शरद पवारांनी जायला नको होतं, ही आमची भावना आहे.” “ज्यांनी शिवसेना फोडली अशांना तुम्ही सन्मानित करता यामुळे आम्हाला वेदना झाल्या. दिल्लीतील राजकारण वेगळं असेल, पण यामुळे आम्हाला वेदना झाल्या. काही गोष्टी राजकारणात टाळायच्या असतात. तुमचं आणि अजित पवारांचं गुफ्तगू होत असेल, पण याचं भान राखून आम्ही पुढचं पाऊल टाकतो”, असंही संजय राऊत म्हणाले. त्यांना आता जितेंद्र आव्हाड यांनी उत्तर दिलं आहे.

जितेंद्र आव्हाड काय म्हणाले?

शरद पवार हे असे राजकारणी आहेत ज्यांच्यात सूड, द्वेष भावना असं कधी निर्माणच होत नाही. आम्हालाही त्यांचा कधी कधी राग येतो. असं वाटतं की शरद पवार हे असं का करतात? पण हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. अनेक उदाहरणं अशी आहेत जिथे शरद पवार जातील असं वाटत नव्हते तिथे शरद पवार जातात. ज्या माणसांनी शरद पवारांच्या राजकारणाची अडचण केली, पक्ष पळवला त्यांच्याबाबतही शरद पवारांच्या मनात असूया नाही. खरंतर ही गोष्ट शिकण्यासारखी आहे. खोट्या केस करा, खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवा असं राजकारण कधीही शरद पवार यांनी केलं नाही. मागच्या पाच ते दहा वर्षांत सुरु झालंय ना ते शरद पवारांच्या मनातही कधी येणार नाही. असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शरद पवार कुठल्या मंचावरर जातात याचा विचार कुणी करु नये- आव्हाड

शरद पवार कुठल्या मंचावर जातात? याचा विचारही कुणी करु नये. ते राजकारणात कप्पे करतात. राजकीय कप्पा आणि सामाजिक कप्पा वेगळा आहे. मी बाबासाहेब पुरंदरेंबाबत वक्तव्य केलं होतं तेव्हा आमच्या पक्षातल्या अनेक लोकांनी मला सांगितलं माफी माग म्हणून. मी शरद पवारांना फोन केला मी विचारलं मी चुकलो का? त्यावर शरद पवार चटकन म्हणाले या विषयात तुझा अभ्यास आहे. त्यानंतर तू भूमिका घेतली आहे. यात कुठेही तुझं काही चुकलेलं नाही. हे पवार आहेत. शरद पवार हे रसायन समजून घेण्यासारखं आहे. विश्वासघातकी वगैरे शब्द आम्ही ऐकून घेणार नाही. लढायची वेळ येईल तेव्हा तुमच्यापेक्षा जास्त आक्रमकपणे शरद पवार सामोरे जातात हे लक्षात ठेवा. राजकारण म्हणजे सूड, द्वेष, संपवून टाका वगैरे असं काही नसतं. असंही आव्हाड म्हणाले.