राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या वर्धेतील वास्तव्यात पूर्णवेळ त्यांच्या सहकारी राहिलेल्या ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी कांचनबेन मुन्नालाल शहा यांचे बुधवारी वृध्दापकाळाने निधन झाले. त्या ९९ वर्षांच्या होत्या.

वर्धेतून लढल्या गेलेल्या भारतीय स्वातंत्र्य लढय़ाच्या सक्रिय साक्षीदार राहिलेल्या कांचनबेन गेल्या काही वर्षांपासून अंथरुणालाच खिळल्या होत्या. मात्र, त्यांना कोणताही आजार नव्हता. त्यांचे पती अॅड. मुन्नालाल शहा यांचे काही वर्षांपूर्वीच निधन झाले. महात्मा गांधी वर्धेत आल्यानंतर त्यांच्या संपर्कात सर्वप्रथम शहा कुटुंब आले होते. महात्माजींच्या काकावाडीतील वास्तव्यानंतर ते सेवाग्राम आश्रमातून प्रयाण करेपर्यंत कांचनबेन त्यांच्यासोबत वावरल्या.

आश्रमातील सफोई, स्वयंपाक, पाहुण्यांची व्यवस्था ही कामे महात्माजींनी त्यांच्यावर सोपविली होती. १९४२ चा लढा तीव्र झाला तेव्हा कांचनबेन यांना अटक करून नागपूरच्या तुरुंगात ठेवण्यात आले होते. एक वर्ष ११ महिन्यांचा कारावास त्यांनी भोगला.

शहा कुटुंबाने आपली संपूर्ण मालमत्ता स्वातंत्र्य लढय़ास अर्पण केली होती. कांचनबेन यांनी सर्व दागिने महात्माजींच्या सुपूर्द केले होते. त्याच दरम्यान त्यांना एका कौटुंबिक कार्यक्रमासाठी सौभाग्यलेणे हवे होते. ते मागितल्यावर गांधीजींनी परत मिळणार नसल्याचे सांगून आता त्यासाठी पैसे पडतील, असे उत्तर हसत दिले होते. कांचनबेन यांनी मग त्यासाठी परत शब्द टाकला नाही. अशी आठवण त्यांनी प्राचार्य अशोक पावडे यांच्याजवळ कथन केल्याचे पावडे यांनी सांगून आठवणींना उजाळा दिला. दोन महिलांच्या खांद्यावर हात टाकून चालतांनाचे गांधीजींचे चित्र सुपरिचित आहे. त्यापैकी कधीकधी एक कांचनबेन असत. मुंबईला काही वर्षांपूर्वी झालेल्या स्वातंत्र्य दिनाच्या सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमात त्यांचा सत्कार करण्यात आला होता. प्रदीर्घ आयुष्यात त्यांनी निष्कामपणे सेवा केली. बुधवारी दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी व आप्त परिवार आहे.