कराड : किरकोळ कारणावरून चाकूने भोसकून खून केल्याप्रकरणी रोहिदास बाळकृष्ण सावंत (रा. चिंचणी ता. कराड) यास दोषी ठरवून कराड न्यायालयाचे पहिले अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश यू. एल. जोशी यांनी जन्मठेप व दंडाची शिक्षा सुनावली. तर, खोटी साक्ष दिल्याप्रकरणी एका महिला डॉक्टरलाही नोटीस बजावण्यात आली आहे.
याबाबतची माहिती अशी की, २४ जुलै २०१८ रोजी चिंचणी, (ता. कराड) येथील वरदायिनी देवीच्या मंदिरात गावकऱ्यांनी भंडारा आयोजिला होता. त्यावेळी रोहिदास सावंतने दारूच्या नशेत भातात आमटी का वाढत नाही म्हणून भांड्यातील आमटी ओतली. त्यावेळी तेथीलच महेश पवार यांनी त्यास अटकाव केला असता, त्याच्याशी रोहिदासने बाचाबाची केली. यावेळी गावकऱ्यांनी मध्यस्थी करून त्याला घरी पाठवले.
मात्र, तासाभरानंतर रोहिदास चाकू घेऊन तिथे आला आणि महेश पवारला शिवीगाळ करू लागला. त्यावेळी तेथील अमोल अशोक पवार (३४) हा रोहिदास सावंतला समजावून सांगत असताना, सावंतने ‘तुला आणि तुझ्या भावाला जिवंत ठेवत नाही’, असे म्हणून अमोल पवारवर चाकूने वार केले.
त्यावेळी महेश पवार मध्ये आला असता, तोही चाकूच्या वाराने जखमी झाला. यानंतर गंभीर जखमी अमोल पवारला रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, अमोल पवारचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेची नोंद उंब्रज पोलीस ठाण्यात झाली होती. सहाय्यक पोलीस निरीक्षक पी. ए. भोसले यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले.
सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता पुष्पा जाधव यांनी काम पाहिले. या खटल्यात २१ साक्षीदार तपासले गेले. न्या. जोशी यांनी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, पंच, तपासी अंमलदार, वैद्यकीय अधिकारी यांच्या साक्षी ग्राह्य मानून रोहिदास सावंत यास खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेप व १० हजार रुपये दंड, तसेच दंड न भरल्यास तीन महिने साधी कैद अशी शिक्षा ठोठावली. न्यायालयाने मयताच्या नातेवाईकांनाही नुकसान भरपाईची तजवीज ठेवली आहे.