कराड : साताऱ्याची वेगळी ओळख आहे. या जिल्ह्याने केवळ महाराष्ट्रालाच नव्हेतर देशाला दिशा देण्याचे काम केले. हे कार्य साधणाऱ्या नेत्यांच्या विचार अन् प्रेरणेतून आजवर आपण लोकहितासाठी राजकारण नव्हेतर समाजकारणच केले. लोकहितासाठी अखेरपर्यंत समाजकारणच करणार असल्याचा विश्वास खासदार उदयनराजे भोसले यांनी दिला.

कराडमध्ये कराड दक्षिण व उत्तर तसेच पाटण विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या कार्यकर्ता संवाद मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पालकमंत्री शंभूराज देसाई हे होते. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नामदार नरेंद्र पाटील, आमदार शिवेंद्रराजे भोसले, माजी आमदार आनंदराव पाटील, भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुल भोसले, जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम आदींची प्रमुख उपस्थिती होती.

हेही वाचा : “उद्धव ठाकरेंनी शब्द फिरवला”, राजू शेट्टींचा आरोप; सांगली लोकसभेवरून टीका करत म्हणाले, “वसंतदादा पाटलांचं घराणं…”

उदयनराजे म्हणाले, एकेकाळी दोन खासदारांचा भाजपा आज जगातील सर्वात मोठा पक्ष असून, केंद्र सरकारने सर्वच घटकांचे प्रश्न सोडवले. दहा वर्षात ऐतिहासिक कामगिरी साधल्याने समाजहितासाठी अनेक पक्ष, संघटना आज भाजपाच्या नेतृत्वाखाली एकत्र आल्या आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कोणत्याही दबावाच गरज नाही. त्यामुळे लोकांनी अफवांना बळी पडू नये असे आवाहन उदयनराजेंनी केले. साताऱ्यात महायुतीचा कोणीही उमेदवार असलातरी त्याच्या पाठीशी ठाम उभे राहून मताधिक्याचा नवा विक्रम नोंदवूया असे आवाहनही उदयनराजेंनी केले.

शंभूराज म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहांनी जनतेच्या अपेक्षांची पूर्तता करताना, गतिमान विकास साधला आहे. देशाच्या विकासासाठी जे काही करणे आवश्यक आहे ते त्यांनी केले. त्यामुळे जगातिक क्रमवारीत दहाव्या स्थानावरून भारत पाचव्या स्थानावर झेपावला. आता, मोदींना हुकमी बहुमताची संधी मिळाल्यास आपला देश निश्चितपणे तिसऱ्या क्रमांकावर नेण्याचा त्यांचा संकल्प पूर्ण होईल, त्यासाठी महायुतीने प्रामाणिकपणे ताकदीने एकजूट दाखवावी असे आवाहन शंभूराज देसाई यांनी केले.

हेही वाचा : सांगली जिल्हा बॅंकेतील गैरव्यवहारातील ५० कोटींची जबाबदार निश्चितेचे आदेश

सातारा हा जाणत्या राजाला मानणारा मतदार संघ असल्याने गाफील राहून एकमेकावर जबाबदारी ढकलून चालणार नाही, जिंकण्यासाठी सूक्ष्म नियोजन हवे, एकूणच राबणाऱ्या यंत्रणेसह त्यावर लक्ष ठेवणारी, निवडणुकीवर नियंत्रण राखणारी अशी त्रिस्तरीय योजना हवी अशी स्पष्ट भूमिका पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी मांडली.

नरेंद्र पाटील म्हणाले, महाराज जेथे उभे, तेथे सगळे आडवे होतात. पण काही नरेंद्र अजूनही त्यांच्या पुढे उभे आहेत, लोकसभेला मी इच्छुकच आहे. गत निवडणुकीत मी आणि उदयनराजे समोरासमोर लढलो. पण, आज परिस्थिती वेगळी आहे. आम्ही दोघे एकाच व्यासपीठावर आहोत. हे काहीही असोत पक्षश्रेष्ठी जो उमेदवार देतील, त्याला आम्ही पूर्णपणे साथ देऊ. मताधिक्याने निवडून आणू अशी ठाम ग्वाही नरेंद्र पाटील यांनी दिली. लोकसभेच्या पोट निवडणुकीत पावसात भिजलेल्या काकांनी केलेल्या बॅटिंगमुळे मतदारांनी त्यांना साथ दिली अन् निकाल फिरला. पण आता परिस्थिती बदलल्याचे त्यांनी सांगितले.

उदयनराजेच भाजपाचे अर्थात महायुतीचे उमेदवार असतील आणि त्यावर लवकरच शिक्कामोर्तब होईल असा विश्वास व्यक्त करून शिवेंद्रराजे म्हणाले, जगात आज भारताकडे सन्मानाने पाहिले जाते. काँग्रेसच्या काळात अशी परिस्थिती नव्हती. मोठी राष्ट्रेही मोदींकडे आशेने, आदराने पाहतात. पालकमंत्री म्हणून शंभूराज देसाई यांनी निवडणुकीची जबाबदारी घ्यावी. ऊसदर, साखर कारखानदारीला अमित शहांनी मोदींच्या नेतृत्वाखाली चांगले दिवस आणले. काँग्रेसने खाजगी कारखान्यासाठी एक आणि सरकारी कारखान्यासाठी एक असा न्याय देण्याची भूमिका घेतली. परंतु, भाजपच्या काळात कारखानदारांना न्याय मिळाला.

प्रस्ताविकात डॉ. अतुल भोसले म्हणाले, भारताला जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था करण्याचे काम मोदी सरकारकडून होत आहे. शेतकऱ्यांना अडचणीच्या काळात हातभार लावण्याचे काम मोडी सरकारने केले आहे. येणाऱ्या काळात महायुतीच्या पाठीशी ठामपणे उभे रहा. महायुतीच्या उमेदवाराला कराड दक्षिण मतदारसंघातून मोठे मताधिक्य देऊ, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली. राजेंद्र यादव यांनी आभार मानले.

हेही वाचा : ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या ‘कुकर’चे ‘प्रेशर’ कुणावर? ईश्वरचिठ्ठीवर लागला चिन्हाचा निकाल…

सर्वांना मिसळ खायला घेऊन जाणार

गत निवडणुकीचा धागा पकडत उदयनराजे भोसले यांनी नरेंद्र पाटील यांना चिमटा काढताना म्हणाले, नरेंद्र पाटलांनी मला मिसळ खायला नेले नाही. पण आज व्यासपीठावर बसलेल्या सर्वांना मी मिळस खायला घेऊन जाणार असल्याचे सांगताच उपस्थितांमध्ये चांगलीच खसखस पिकली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यांनी, मराठा शब्दही स्वतःला चिटकू दिला नाही

राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला न्याय दिला. वास्तविक पाहता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यावेळेस मराठा समाजाला आरक्षण देवून हा प्रश्न निकाली काढला होता. परंतु, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांच्या सत्तेच्या कार्यकाळात मराठा हा शब्दही स्वतःला चिटकू दिला नाही, अशी टीका नरेंद्र पाटील यांनी केली.