कराड : राज्यात शेतकरी, कष्टकऱ्याऱ्यांना सौरऊर्जा घेतल्याशिवाय शासनाने दुसरा पर्याय ठेवलेला नाही. राज्यात मोठ्या प्रमाणात वीजनिर्मिती होऊनही शेतकऱ्यांना हक्काची वीज दिली जात नाही. त्याला अदानी यांचे सौरऊर्जा प्रकल्प जबाबदार आहेत. मुख्यमंत्र्यांनी अदानींची वीज खपवण्याची जबाबदारी घेतल्याचे आरोप करीत, अदानीची सौरऊर्जा शेतकऱ्यांच्या माथ्यावर मारू नका अन्यथा, तीव्र आंदोलन छेडू असा इशारा बळीराजा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी निवेदनाद्वारे केली.
या निवेदनावर पंजाबराव पाटील, विश्वास जाधव, चंद्रकांत यादव, आनंदराव थोरात, पोपटराव जाधव, दीपक पाटील, उत्तम खबाले आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. निवेदनात म्हटले आहे की, सध्या शेतकरी, कष्टकऱ्यांना जबरदस्तीने सौरऊर्जा दिली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. त्याला मुख्यमंत्रीच जबाबदार आहेत. राज्यात सध्या अदानी समूहाकडून लाखो एकर जमिनीवर सौरऊर्जा प्रकल्प उभे केले जात आहेत. त्यातून निर्माण होणारी वीज शेतकऱ्यांच्या माथी मारली जात आहे.
राज्यात मोठे उद्योग, कारखाने, औद्योगिक वसाहती (एमआयडीसी) आहेत. त्यांना अदानींच्या सौरऊर्जा प्रकल्पातील वीज द्यावी. अदानींच्या वीज देयकाची जबाबदारी राज्य सरकारने घेतल्याचे दिसते. यासाठी स्मार्ट मीटर बसवले जात आहेत. या पद्धतीने वीज देयकाची वसुली केली जात आहे. याचा त्रास गोरगरीब शेतकरी, कामगारांना होत आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांना सौरऊर्जेची व स्मार्ट मीटरची सक्ती करू नये. अदानीची सौरऊर्जा शेतकऱ्यांच्या माथ्यावर मारू नये. शेतकऱ्यांना पूर्वीप्रमाणे हक्काची वीज व मीटर द्यावे. अन्यथा, बळीराजा शेतकरी संघटना सरकारच्या या धोरणाविरोधात तीव्र आंदोलन करेल, याची मुख्यमंत्र्यांनी नोंद घ्यावी, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.