कराड: भांडवली बाजारातील (शेअर मार्केट) गुंतवणुकीतून दुप्पट परतावा देण्याचे आमिष दाखवून त्यांची ७० लाख ५० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याबाबत अल्लाउद्दीन गुलाब तांबोळी (रा. गांधीनगर-काले, ता. कराड) यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून प्रमोद रमेश पाटील (रा. पंचरत्न अपार्टमेंट, आगाशिवनगर-मलकापूर, कराड) याच्यावर कराड शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, काले- गांधीनगर येथील अल्लाउद्दीन तांबोळी आणि त्यांचे मित्र श्यामसुंदर सारडा या दोघांची आगाशिवनगर येथील प्रमोद पाटील याच्याशी ओळख झाली होती. शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणूक करून दिवसाला लाखो रुपये कमवत असल्याचे प्रमोद पाटील याने त्या दोघांना सांगितले. तसेच त्यांनाही गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले. त्या गुंतवणुकीची विश्वसार्हता म्हणून त्याच रकमेचे धनादेश आणि नोटरी करुन देण्याचेही प्रमोद पाटील याने कबूल केले. त्यानुसार अल्लाउद्दीन तांबोळी यांनी मार्च २०२२ मध्ये १० लाख ५० हजार रुपये, तर त्यांचे मित्र श्यामसुंदर सारडा यांनी २१ लाख रुपये प्रमोद पाटील याला दिले. मात्र, २०२२ पासून २०२४ पर्यंत प्रमोद पाटील याने दोघांनाही मूळ रक्कम अथवा त्याचा परतावा दिला नाही. त्यामुळे अल्लाउद्दीन तांबोळी आणि श्यामसुंदर सारडा यांनी त्याच्याकडे पैशाची मागणी केली. त्यावेळी त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. वारंवार पैशाची मागणी करूनही प्रमोद पाटील याने त्यांना टाळले. तसेच शेअर मार्केट पडले आहे. थोड्या दिवसांनी पैसे देतो, असे सांगून त्याने पैसे देण्यास टाळाटाळ केली.

हेही वाचा : Uddhav Thackeray On Chhgan Bhujbal : “त्यांच्याबद्दल मला फार वाईट वाटलं”, भुजबळांच्या प्रश्नावर नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अल्लाउद्दीन तांबोळी, श्यामसुंदर सारडा यांच्यासह अन्य पाच जणांकडून प्रमोद पाटील याने दुप्पट परतावा देण्याचे आमिष दाखवून पैसे घेतल्याचे, तसेच सर्वांची मिळून सुमारे ७० लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याचे निदर्शनास आल्यानंतर अल्लाउद्दीन तांबोळी यांनी याबाबत कराड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अल्लाउद्दीन तांबोळी आणि श्यामसुंदर सारडा यांच्यासह प्रमोद पाटील याने हिना चेतन मोठा यांचे ३ लाख, जयकर जयसिंग पाटील यांचे ३ लाख, डॉ. नितीन नरेंद्रकुमार जाधव यांचे १० लाख, गणेश पाटील यांचे १० लाख, राजाराम पांडुरंग माने यांचे १५ लाख ५० हजार असे एकूण ७० लाख ५० हजार रुपये घेतले असल्याचे अल्लाउद्दीन तांबोळी यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक मारुती चव्हाण तपास करीत आहेत.