कराड : कराड नगरपालिका निवडणूक ‘महायुती’च्या माध्यमातून लढवण्यासाठी आम्ही आग्रही असून, कराडच्या नगराध्यक्षपदासाठी भाजपची उमेदवारी देवू, असा कोणालाही शब्द दिलेला नाही, या उमेदवारीचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल, असे भाजपचे जिल्हाध्यक्ष, आमदार डॉ. अतुल भोसले यांनी स्पष्ट केले.

कराडमध्ये पत्रकारांशी बोलताना डॉ. भोसले म्हणाले की, नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘महायुती’च्या स्थापनेसाठी प्रयत्न सुरू आहेत. ‘कराडमध्ये महायुती करता येते का, यासाठी मी मित्रपक्षांशी संवाद साधणार असून, लवकरच सर्वांना एकत्र बसवून चर्चा करण्याचे निमंत्रण देणार आहे. मात्र, मागच्या वेळेस नगराध्यक्षपदासाठी भाजपचा उमेदवार विजयी झाला असल्याने यावेळीही आमचा आग्रह राहणार असल्याचे डॉ. भोसले यांनी सांगितले.

शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस हे मित्रपक्ष तसेच इतर आघाड्यांच्या पदाधिकाऱ्यांना घेवून शहराच्या विकासासाठी एकत्रित तोडगा काढण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे. भाजप हा राष्ट्रीयस्तरावरील आणि जगातील सर्वांत मोठा पक्ष आहे. कोणत्याही व्यक्तीने पक्षात प्रवेशासाठी इच्छा दर्शवली, तर जिल्हाध्यक्ष म्हणून आम्हाला त्यांना पक्षात घेणे भागच असते. मात्र, सलोखा आणि शिस्त राखण्याच्या बाबतीत आम्ही ठाम असल्याचा विश्वास डॉ. भोसले यांनी व्यक्त केला.

नगराध्यक्षपदाच्या इच्छुकांमध्ये ‘आमदारांनी शब्द दिला’ असा गैरसमज निर्माण केल्याच्या तक्रारींबाबत बोलताना ते म्हणाले, पक्षात उमेदवारी ठरविण्याचा अधिकार फक्त पक्षाचे प्रमुख नेतृत्व आणि मुख्य समिती यांच्याकडे आहेत. आम्ही कोणालाही शब्द दिलेला नाही. निरीक्षक सर्व इच्छुकांचे म्हणणे ऐकून घेतील आणि योग्य उमेदवार ठरवतील.

काही लोक आपल्या प्रभागांमध्ये फिरून खोटा प्रचार करत आहेत, ते चुकीचे आहे. आपल्या भागात काम करा, पण उमेदवारीच्या अपेक्षेने नाही, पक्षासाठी काम करा. पक्ष ठरवेल त्यालाच उमेदवारी मिळेल, असे डॉ. अतुल भोसले यांनी ठामपणे सांगितले.

गेल्या २०१७ सालच्या निवडणुकीत कराडकरांनी भाजपच्या नगराध्यक्षाला निवडून दिले होते, हे ठळकपणे नमूद करत डॉ. भोसले म्हणाले, या वेळीही ‘महायुती’चा नगराध्यक्ष व्हावा आणि तो भाजपचाच असावा, अशी आमची भूमिका आहे. सध्याचा विद्यमान नगराध्यक्ष भाजपचा असल्याने आम्ही पुन्हा भाजपचाच उमेदवार नगराध्यक्षपदासाठी उभा राहावा, अशी अपेक्षा व्यक्त करत आहोत. मित्रपक्षांनी यासाठी सहकार्य करावे, असे आवाहनही आमदार डॉ. अतुल भोसले या वेळी केले.