कराड : दिल्लीतील सिटीझन्स सोसायटी ऑफ इंडियाकडून काढण्यात आलेल्या २६ व्या कारगिल विजय कलश मोहिमेचे विजय दिवस समारोह समितीतर्फे कराड रेल्वे स्थानकावर भव्य स्वागत करण्यात आले. या वेळी कराडकरांतर्फे विजय दिवस समारोह समितीचे सहसचिव सुभेदार विलासराव जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत सामुहिक मानवंदना देण्यात आली.
२६ व्या विजय कलश मोहिमेचे नेतृत्व करणारे मेजर जनरल पूरोहित, ब्रिगेडियर रवी मुनिस्वामी, कर्नल पी. व्ही. हरी व त्यांच्या गटाचे स्मृती चिन्ह, ‘योद्धा सह्याद्री’चा कर्नल संभाजी पाटील गौरव ग्रंथ व पुष्पगुच्छ देऊन याप्रसंगी स्वागत व सत्कार करण्यात आले.
कारगिल विजय कलश यात्रा नवी दिल्ली येथून सुरू झाली असून, देशभर प्रवास करुन २६ जुलैला कारगिल द्रास सेक्टर येथे होणाऱ्या भव्य विजयोत्सव समारंभात विसावणार आहे. कराड रेल्वे स्थानकावर कलश यात्रेचे आगमनावेळी मोठ्या संख्येने मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या स्वागत, कलश पूजन व सत्कारप्रसंगी विजय दिवस समारोह समितीचे पदाधिकारी, वृक्षमित्र चंद्रकांत जाधव, उद्योगपती सलीम मुजावर, स्थानक प्रमुख अनिल शिंदे, श्रीनिवास डुबल, राजीव अपिने, प्रा. जालिंदर काशीद, प्राचार्य गणपतराव कणसे, आत्माराम अर्जुगडे, प्रसाद पावसकर, अरुण पवार, विजय खबाले यांच्यासह शहरातील सामाजिक संस्था, संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कराड रेल्वे स्थानकाचे प्रमुख अनिल शिंदे यांनी रेल्वेची पाच मिनिटे वेळ वाढवून घेतल्यामुळे, रेल्वे स्थानकावर कारगिल विजय कलशाचे भव्य स्वागत, कलशाचे पूजन करून हुतात्म्यांना पुष्पांजली वाहण्याचा समारंभ झाला.