कराड : पूररेषेतील बांधकामे, अतिक्रमणांना सार्वजनिक बांधकाम विभाग परवानगी देत नसल्याने कराड शहरातील पाटण कॉलनी, पत्राचाळ व अन्य ठिकाणच्या पूररेषेत वास्तव्य करणाऱ्या नागरिकांचे ज्या वेळी पूरपरिस्थिती उद्भवेल, त्यावेळी तात्पुरते स्थलांतर करण्यापेक्षा त्यांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्याचा प्रस्ताव कराड नगरपालिकेने शासनाकडे द्यावा, अशा सूचना साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी कराड पालिका मुख्याधिकाऱ्यांना दिल्या.
येथील कृष्णा घाटावर पालकमंत्री देसाई यांनी शासकीय यंत्रणेसमवेत पूरपरिस्थितीची पाहणी केली. प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, पोलीस उपाधीक्षक राजश्री पाटील, मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर आदी उपस्थित होते.
पालकमंत्री देसाई यांनी प्रशासनाकडून पूरपरिस्थिती, त्याबाबतच्या उपाययोजनांसंदर्भात घेण्यात आलेल्या दक्षतेचा आढावा घेतला. प्रांताधिकारी म्हेत्रे यांनी, प्रशासनाने सर्व पातळीवर आवश्यक उपाययोजना केल्याचे सांगितले.
संभाव्य पूरपरिस्थितीच्या अनुषंगाने किती लोकांचे स्थलांतर केले, धोकादायक घरांची पडझड, तसेच नालेसफाईबाबत, देसाई यांनी विचारले असता, मुख्याधिकारी व्हटकर यांनी, संभाव्य पूरपरिस्थितीच्या अनुषंगाने पत्राचाळ, पाटण कॉलनीतील २१ कुटुंबांचे तात्पुरते स्थलांतर केल्याचे सांगितले. यावर पालकमंत्री देसाई म्हणाले, पूररेषेच्या आत असलेल्या बांधकाम, अतिक्रमणांवर बांधकाम विभागाकडून कारवाई केली जाते. बाहेरून कराडमध्ये येऊन राहणाऱ्यांवर पूर परिस्थितीमुळे एखादी आपत्ती उद्भवल्यास त्यास प्रशासनालाच जबाबदार धरले जाते. त्यामुळे त्यांचे पूररेषेच्या बाहेर कायमस्वरूपी स्थलांतर करण्यासाठी नगरपालिकेने शासनाकडे प्रस्ताव द्यावा, असे सुचवताच संबंधित कुटुंबे निळ्या रेषेत (ब्लू लाईन) असल्याचे पालकमंत्र्यांना सांगण्यात आले.
यावर त्यांनी याबाबतचे सर्व निकष तपासा, जलसंपदा विभागाने आखून दिलेल्या पूररेषेच्या अनुषंगाने पाणीपातळी अधिकाधिक किती आहे, याचीही माहिती घ्या. परंतु, संबंधितांचे पूररेषेबाहेर कायमस्वरूपी पुनर्वसन गरजेचे असल्याचे शंभूराजेंनी सांगितले. यावेळी पालिकेच्या दोन जलशुद्धीकरण केंद्रामार्फत शहरात स्वच्छ पाणीपुरवठा करण्यात येत असून, नागरिकांच्या आरोग्याबाबत पालिका प्रशासन सतर्क असल्याचे मुख्याधिकारी व्हटकर यांनी पालकमंत्र्यांना सांगितले.
यंत्रणेकडून सर्व उपाययोजना
दोन दिवसांत पाऊस वाढल्याने कोयना धरणातून ९५ हजार क्युसेकचा जलविसर्ग करण्यात आला. त्यामुळे पूरपरिस्थिती उद्भवली. यासंदर्भात कोयना, मोरणा, तसेच सुपने विभाग व कराड परिसराची पाहणी पालकमंत्र्यांनी केली. रात्रीपासून पावसाचा जोर मंदावल्याने धरणातील विसर्ग कमी झाला आहे. नैसर्गिक प्रवाहाचे पाणीही कमी झाल्याने, कराडमधील नद्यांची जलपातळी चांगलीच खालावली आहे. दरम्यान, प्रशासनाने सर्व उपाययोजना केल्याचे पालकमंत्री देसाई यांनी पत्रकारांना सांगितले.