कराड : पुणे- बंगळुरू महामार्गालगत शिवडे (ता. कराड) येथे सेवा रस्त्यावर नव्याने बांधण्यात आलेल्या उत्तरमांड नदीवरील पुलाचा भराव खचल्याने खळबळ उडाली. या पुलाची दुरुस्ती व डागडुजी कामाबाबत संबंधित कामाचे ठेकेदार व अधिकाऱ्यांकडून टाळाटाळ होत असल्याचा आरोप करत शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
दरम्यान, शिवडे येथे सेवा रस्त्यावरील पुलाचा भराव खचल्याची पाहणी शिवसैनिकांनी केली असून, या वेळी पोलीस अधिकारीही उपस्थित होते. शिवडे हद्दीत उत्तरमांड नदीवर सेवा रस्त्यावर बांधण्यात आलेल्या पुलाचे काम नित्कृष्ट दर्जाचे केले गेले आहे. याबाबत शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी महामार्ग प्राधिकरणास पत्रव्यवहार केला होता. त्यास अनुसरून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणास (एनएचएआय) कागल सातारा रोड प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीस जागेची पडताळणी करून आवश्यक ती कारवाई करावी आणि कोल्हापूर येथील राष्ट्रीय राज महामार्ग प्राधिकरण प्रकल्प अंमलबजावणी युनिटला (पीआयू) सविस्तर अहवाल सादर करण्याबाबत सांगितले.
असे असतानाही त्यांच्याकडून अद्याप कोणतीही हालचाल करण्यात आलेली नाही. सदर बाबतीत पालकमंत्र्यांनी यासंदर्भात बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्याच्या सूचना केलेल्या असताना संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांनी पालकमंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली असल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. या निवेदनावर सचिन जाधव, रवींद्र हजारे, अतुल पाटील, राजेंद्र चव्हाण, विठ्ठल वाघमारे, सुरज खामकर यांच्या स्वाक्षरी आहेत.
गुन्हे दाखल करण्याची मागणी
उत्तरमांड नदीवरील पूल बांधकाम करताना, ठेकेदाराने केलेला हलगर्जीपणा व त्यास साथ देणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा स्पष्टपणे दिसून येत आहे. संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी शिवसैनिकांनी निवेदनात केली आहे.