कराड : कराड शहर परिसरातील मोलमजुरी करणाऱ्या एका २९ वर्षीय महिलेस वारंवार त्रास देत तिच्यावर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कराड शहर पोलीस ठाण्यात याबाबत संबंधित महिलेच्या फिर्यादीनुसार मलकापूर- आगाशिवनगर (टा. कराड) येथील एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेची माहिती मिळताच कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू ताशिलदार व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत कठोर पावले उचालली आहेत. याबाबत कराड शहर पोलीस ठाण्यातील अंमलदाराकडून मिळालेली माहिती अशी की, संबंधित पीडित फिर्यादी महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, एप्रिल २०२५ पासून आरोपीने तिला वारंवार लग्नासाठी त्रास देण्यास सुरुवात केली होती. मे महिन्यात आरोपीने तिच्यावर अत्याचार करत जीवे मारण्याची धमकीही दिली होती.
या घटनेनंतरही आरोपीचा त्रास थांबला नाही. ४ ऑगस्ट रोजी आरोपीने पीडितेच्या वडिलांची दुचाकी जाळून टाकली. घरातील वस्तूंचे नुकसान करून पुन्हा शिवीगाळ करत, धमकी दिली. त्यानंतर पीडितेने मंगळवारी ५ ऑगस्ट रोजी रात्री आठ वाजता कराड शहर पोलीस ठाण्यात याप्रकरणी फिर्याद दिली असून, त्यानुसार आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास कराड शहर पोलीस करत आहेत.