राज्यालाच नव्हे, तर देशालाही हादरवणाऱ्या भंडारा जिल्ह्यातील खैरलांजी हत्याकांडातील पीडित भैयालाल भोतमांगे यांचे आज, शुक्रवारी हृदयविकाराने निधन झाले. शुक्रवारी श्रीकृष्ण रुग्णालयात भोतमांगे यांनी अखेरचा श्वास घेतला. खैरलांजी प्रकरणाच्या दशकभरानंतरही भोतमांगे अजूनही न्यायाच्याच प्रतीक्षेत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२९ सप्टेंबर २००६ मध्ये खैरलांजीत माणूसकीला काळीमा फासणारे हत्याकांड घडले होते. घटनेच्या दिवशी गावातील दलितेतर समूहाने भोतमांगे यांच्या झोपडीला वेढा घातला आणि शिविगाळ केली. तसेच झोपडीत असलेल्यांवर हल्ला केला होता. जमावाने भैयालालची पत्नी सुरेखा, मुले प्रियंका, सुधीर आणि रोशन यांची अमानुषपणे हत्या केली होती. भोतमांगे यांचे कुटुंबच एका गटाने अमानुषपणे हत्या करून संपवून टाकले. तर भैयालाल शेतावर गेल्याने ते या हल्ल्यातून बचावले होते. ही घटना समोर येताच दलितांच्या भावनांचा उद्रेक केवळ राज्यातच नव्हे तर देशभर उडाला आणि देशभरातील राष्ट्रीय प्रसिद्धी माध्यमांचे लक्ष या घटनेकडे वेधले गेले होते. हत्याकांडानंतर भोतमांगे यांना सरकारने मदत केली होती. भैयालाल सध्या तीन खोल्यांच्या पक्क्या घरात राहत होते. सरकारने त्यांना भंडारा येथील म्हाडा कॉलनीत घर दिले होते. तसेच त्यांना वसतिगृहात सुरक्षा रक्षकांची नोकरी देण्यात आली होती.

भंडारा जलद गती न्यायालयाने या प्रकरणातील आठ आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली होती. त्याला आव्हान देण्यात आले. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने यातील आठ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्यातील एका आरोपीचा मृत्यू झाला आहे. सध्या हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे. त्यामुळे न्याय न मिळताच भोतमांगे यांना जगाचा निरोप घ्यावा लागला अशी भावूक प्रतिक्रिया आता व्यक्त होत आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Khairlanji massacre victim bhaiyalal bhotmange passes away in bhandara
First published on: 20-01-2017 at 18:08 IST