Maharashtra FDA on Kids Cough Syrups : मध्य प्रदेश, राजस्थानसह देशाच्या विविध भागांत ‘कोल्ड्रीफ’ या कफ सिरपमुळे (खोकल्यावरील) अनेक लहान मुलांनी आपला जीव गमावला आहे. यापैकी काही मुलांना उपचारासाठी नागपुरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तर काही मुलं अजूनही नागपुरात उपचार घेत आहेत. अशातच महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासनाने खोकल्यावरील औषधांबाबत मोठा निर्णय घेतला आहे. डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय लहान मुलांच्या कफ सिरपची विक्री करण्यास बंदी घातली आहे. याबाबत अन्न व औषध प्रशासनाने परिपत्रक जारी केलं आहे.

अन्न व औषध प्रशासनाची एक महत्त्वाची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत खोकल्यावरील औषधांबाबत, लहान मुलांवरील उपचारांबाबत चार महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तांनी कफ सिरपबाबत दिलेले निर्देश

१) सह आयुक्तांनी (औषधे) त्यांच्या कार्यक्षेत्रातील Liquid Oral Formulation उत्पादकांची माहिती त्वरीत मुख्यालयास सादर करावी.
२) मध्यप्रदेश बाल मृत्यू प्रकरणाच्या अनुषंगे आढळून आलेल्या Diethylene Glycol व Ethylene Glycol यांनी भेसळयुक्त असलेला औषधसाठा वापरला जाणार नाही व तो तत्परतेने परत मागवला जाईल याबाबत सर्व संबंधितांनी वेळोवेळी मिळणाऱ्या सुचनेनुसार कार्यवाही करावी.

३) राज्यातील कफ सिरपचा दर्जा पडताळणीसाठी नमुने घेणे.

  • सर्व शासकीय व निमशासकीय रुग्णालये व त्यांचे औषध भांडार यांना, औषध निरीक्षक /सहाय्यक आयुक्त यांनी भेटी देऊन औषध भांडारामध्ये उपलब्ध Liquid Oral Formulation औषधांची माहिती घ्यावी. संबंधित रुग्णालयातील औषध भांडार सांभाळणाऱ्या रजिस्टर्ड फार्मासिस्ट व संबंधित वैद्यकीय व्यावसायिक यांच्याशी चर्चा करून संशयित १ किंवा २ कफ सिरपचे नमुने विश्लेषणार्थ घ्यावेत. ज्या जिल्ह्यांमध्ये औषध निरीक्षक कार्यरत नाहीत, त्या जिल्ह्यातील सहाय्यक आयुक्त यांनी भेटी देऊन नमुने विश्लेषणार्थ घ्यावेत.
  • रुग्णालयांव्यतिरिक्त घाऊक किंवा किरकोळ विक्रेत्यांकडून प्रामुख्याने Doctor supply / propoganda व इतर formulations चे प्रती औषध निरीक्षक ३ नमुने विश्लेषणार्थ घ्यावेत.
  • विश्लेषणार्थ घेण्यात आलेले नमुने अतीप्राधान्याने प्रयोगशाळेत Diethylene Glycol व Ethylene Glycol ही चाचणी करण्याच्या विनंतीसह शासकीय विश्लेषकांना पाठवावे.
  • मुंबई, कोकण, पुणे व नाशिक या विभागातील नमुने, मुंबई प्रयोगशाळेत पाठवण्यात यावेत. छत्रपती संभाजी नगर, अमरावती नागपूर या विभागातील नमुने छत्रपती संभाजी नगर प्रयोगशाळेत पाठवण्यात यावेत. सदर मोहीम ही दिनांक ९ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करावी. विश्लेषणार्थ घेण्यात आलेल्या नामुन्यांबाबत त्यानुषांगाने तयार करण्यात आलेल्या गुगल फॉर्मवर माहिती त्याच दिवशी सायंकाळी सादर करावी.

४) Liquid Oral उत्पादकांच्या तपासण्या करण्याबाबत – मध्यप्रदेश व राजस्थान येथे बालरुग्णांचा मृत्यू हा प्रामुख्याने Diethylene Glycol व Ethylene Glycol या भेसळयुक्त कफ सिरपमुळे झालेला असल्याचे दिसून येते. या पार्श्वभूमीवर राज्यातील Liquid Oral उत्पादक Liquid Oral उत्पादनामध्ये वापरत असलेले Liquid solvents जसे glycerin, sorbitol, propylene glycol यांचा दर्जा पडताळणे अनिवार्य असल्याने Liquid Oral उत्पादकांच्या तपासण्या कराव्यात. त्यांच्या तपासणीत खालील बाबी तपासण्यात याव्यात.

  • Glycerin, sorbitol, propylene glycol हे excipients कोणत्या formulation मध्ये वापरले जातात.
  • ते कोणाकडून खरेदी केले जाते.
  • पुरवठादाराचे विक्रेता प्रमाणीकरण (Vendor Validation) केले आहे काय
  • Pharmacopial / Industrial grade खरेदी केले आहे का
  • formulation मध्ये वापरण्यापूर्वी Diethylene Glycol व Ethylene Glycol साठी चाचणी केली जाते का
  • अभिलेख योग्य प्रकारे ठेवला जातो का
  • चाचणी अहवाल व त्याची सत्यता इत्यादी बाबी तपासाव्यात.
  • ज्या उत्पादकाकडे Liquid solvents किंवा finish goods यांच्या दर्जाबाबत शंका उत्पन्न होत असेल अशा प्रकरणी Liquid solvents किंवा finish goods यांचेसुद्धा नमुने घ्यावेत.

५) सर्व विभागीय सह आयुक्त यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील सर्व Liquid Oral उत्पादकांच्या १० ऑक्टोबर ते १५ ऑक्टोबर या कालावधीत तपासण्या पूर्ण करण्यासाठी त्यांच्या विभागातील औषध निरीक्षक / सहाय्यक आयुक्त यांच्यासाठी कार्यक्रम आखून द्यावा. त्या कार्यक्रमानुसार तपासण्या पूर्ण केल्या जातील यासाठी जातीने लक्ष द्यावं. या तपासण्याची माहिती मुख्यालयात सादर करून सुकर होण्यासाठी स्वतंत्र गुगल फॉर्म तयार करण्यात येत आहे. त्यावर संबंधित तपासणी अधिकारी यांनी त्याच दिवशी माहिती सादर करणे अनिवार्य आहे. तरी सर्व संबंधितानी याप्रमाणे कार्यवाही घेवून वेळोवेळी अहवाल मुख्यालयास सादर करावा.