कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान सुरु असून हिंदूत्ववादी आकर्षण असलेले शिवसेनेचे मतदार पक्षाच्या आदेशानुसार आघाडीकडे राहणार की भाजपच्या आवाहनाला प्रतिसाद देत ‘कमळा’कडे झुकणार यावर निर्णयाचा कल अवलंबून आहे. हिंदूत्ववादी विचारसरणीच्या मतदारांना आपल्याकडे खेचण्याच्या अखेरच्या टप्प्यात महाविकास आघाडी आणि भाजपा या दोन्हीकडून जोरदार प्रयत्न झाला. दरम्यान आज मतमोजणी सुरु असताना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या संतापाला सामोरं जावं लागलं. यानंतर त्यांना तिथून काढता पाय घ्यावा लागला.

चंद्रकांत पाटील मंगळवार पेठेतील बूथवर पोहोचले असता महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी सुरु झाली. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज आणि जिजाऊ यांच्या नावाचा यावेळी जयघोषण करण्यात आला. दादा हिमालयात जावा अशीही घोषणा यावेळी तरुण देत होते. अखेर कार्यकर्त्यांचा हा संताप पाहून चंद्रकांत पाटील यांनी समर्थकांसोबत तेथून काढता पाय घेतला.

पोलीसदेखील यावेळी उपस्थित होते आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत होते. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याने चंद्रकांत पाटील गाडीतून तेथून निघून गेल्याचं व्हिडीओत दिसत आहे.

…तर राजकारण सोडून हिमालयात जाईन-चंद्रकांत पाटील

“जे मला म्हणतात ना कोल्हापूरमधून पळून आले. ते तिथे निवडून आले नसते. मात्र मी आज मी एक आव्हान देतो की, कोल्हापूरमधील कोणत्याही विधानसभा मतदारसंघातून आज एखाद्याने राजीनामा द्यावा आणि पोटनिवडणूक घ्यावी म्हणजे त्यांना समजेल, जर निवडून नाही आलो तर राजकारण सोडून देईन आणि हिमालयात जाईन,” अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांनी सत्ताधारी पक्षाला टोला लगावला होता.

चंद्रकांत पाटील म्हणाले होते की, “मागील वर्षी विधानसभा निवडणूक जाहीर झाली तेव्हा मला अमित शाह यांनी सांगितले की, आपको विधानसभा निवडणूक लढनीं पडेगी. अमितभाई माझा अजून विधान परिषदेचा एक महिना शिल्लक आहे मला कुठे यात अडकून ठेवता? मी जर मोकळा राहीलो तर महाराष्ट्रभर फिरेन असं त्यांना सांगितले. आपण महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपल्या पक्षाचे जास्त जागा निवडून आणू. मात्र अमितभाईंनी आग्रह धरला तुला विधानसभा लढवायची असून आपको पुना मैं कोथरूडसे लढना है असंही सांगितलं. तसेच मी त्यानंतर माझ्या नावाची या मतदार संघातून घोषणा झाली आणि त्यानंतर आजवर माझ्यावर अनेक आरोप प्रत्यारोप झाले”.