गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकीय वर्तुळात कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीची जोरदार चर्चा सुरू होती. भाजपानं प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यामुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. मात्र, दुसरीकडे काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव यांच्या पाठिशी महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांची ताकद उभी राहिल्यामुळे दोघांमध्ये कांटे की टक्कर होणार असल्याचं भाकित वर्तवलं जात होतं. पण प्रत्यक्षात जयश्री जाधव यांनी भाजपाचे उमेदवार सत्यजीत कदम यांचा दणदणीत पराभव केला. या निकालानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भाजपावर आणि चंद्रकांत पाटील यांच्यावर मीम पोस्ट करत खोचक टोला लगावला आहे.

कोल्हापुरात भाजपाचा पराभव!

मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर दुसऱ्या फेरीपर्यंत काँग्रेसच्या जयश्री जाधव यांनी आघाडी घेतली होती. पालकमंत्री सतेज पाटील यांच्या कसबा बावडा भागातून मतमोजणी सुरुवात झाल्यानंतर पहिल्या फेरीत काँग्रेसच्या जयश्री जाधव २१३७ मतांनी आघाडीवर होत्या. २०व्या फेरीनंतर काँग्रेसच्या जयश्री पाटील यांनी १५ हजार मतांची मोठी आघाडी घेतली होती. संभाजी नगर, पद्माला, मंगळवार पेठ या भागातील मतपेट्या उघडल्या नंतर जयश्री पाटील यांना ४३६६ तर सत्यजित कदम यांना ३०७४ मते मिळाली. दरम्यान चोविसाव्या फेरीअखेर जयश्री जाधव यांना १८ हजार ८३८ इतके मताधिक्य मिळाले होते. त्यानंतर जयश्री जाधव यांनी १९ हजारपेक्षा जास्त मतांची आघाडी घेत विजय मिळवला आहे.

दरम्यान, ही निवडणूक भाजपाकडून प्रतिष्ठेची करण्यात आली होती. खुद्द प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील कोल्हापुरात प्रचारासाठी तळ ठोकून होते. दोनच दिवसांपूर्वी इथल्या मंगळवार पेठेत चंद्रकांत पाटील प्रचारासाठी पोहोचले असता महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू केली होती. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज आणि जिजाऊ यांच्या नावाचा यावेळी जयघोषण करण्यात आला. दादा हिमालयात जावा अशीही घोषणा यावेळी तरुण देत होते. अखेर कार्यकर्त्यांचा हा संताप पाहून चंद्रकांत पाटील यांनी समर्थकांसोबत तिथून काढता पाय घेतला.

आव्हाडांचं खोचक ट्वीट

दरम्यान, याच पार्श्वभूमीवर आता जितेंद्र आव्हाड यांनी खोचक मीम ट्वीट करत चंद्रकांत पाटील आणि भाजपावर निशाणा साधला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी आधी निकालाबाबतचं ट्वीट केलं. यामध्ये “फुले, शाहू, आंबेडकर विचारांचा विजय… कोल्हापूरची जागा जिंकली… शाहू महाराज की जय”, असं ट्वीट केलं. त्याच्याच पुढच्या ट्वीटमध्ये जितेंद्र आव्हाड यांनी एक मीम शेअर केलं आहे.

काय आहे मीम?

जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट केलेल्या मीममध्ये चंद्रकांत पाटील मांडी घालून आणि डोळे मिटून बसल्याचं दिसत आहे. तो फोटो मॉर्फ्ड करून त्याच्या पार्श्वभूमीवर हिमालयाचा फोटो लावण्यात आला आहे. सोबत बॉक्समध्ये ‘मी पोहोचलो रे हिमालयात’ असं वाक्य लिहिलं आहे. हे ट्वीट शेअर करताना जितेंद्र आव्हाडांनी “नको, परत या”, अशी खोचक टिप्पणी केली आहे.

“कोल्हापूरच्या जनतेने आपला स्वाभिमान राखला”; मोठ्या विजयानंतर जयश्री पाटलांची प्रतिक्रिया

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जयश्री जाधव यांची विजयानंतर प्रतिक्रिया

“कोल्हापूरच्या जनेतेने शब्द पाळला आहे. चंद्रकांत जाधव यांच्या नंतर माझी जी जबाबदारी घेतली होती ती पूर्ण केली आहे. कोल्हापूरच्या जनतेने आपला स्वाभिमान राखला आहे. महाविकास आघाडीतल्या सर्व नेत्यांनी मला सहकार्य केले. हा विजय माझ्या कोल्हापूरच्या स्वाभिमानी जनतेचा आहे. चंद्रकांत जाधव यांनी जे पेरले तेच उगवले. मताधिक्य मिळणार याची अपेक्षा होती कारण जनता आमच्यासोबत होती,” अशी प्रतिक्रिया जयश्री जाधव यांनी दिली.