कोल्हापूर : चतुरस्त्र अभिनेते अरुण सरनाईक यांचा अभिनय पाहत, गाणी गुणगुणत एक पिढी मोठी झाली. त्यांचा अभिनय, आठवणी कोल्हापुरकरांच्या सदैव स्मरणात राहणाऱ्या आहेत, असे प्रतिपादन पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी रविवारी केले.
दिवंगत अभिनेते अरुण सरनाईक यांच्यावरील ‘पप्पा सांगा कुणाचे’ या माहितीपटाचे पहिले प्रदर्शन येथे झाले, यावेळी आबिटकर बोलत होते. माहितीपटाच्या फलकाचे अनावरण मंत्री आबिटकर, खासदार शाहू छत्रपती, खासदार धनंजय महाडिक, जिल्हाधिकारी अमोल येडगे, दिग्दर्शक संतोष पाठारे यांच्या हस्ते करण्यात आले.
मंत्री आबिटकर म्हणाले, अरुण सरनाईक यांच्या विविधांगी भूमिकेमुळे ते किती ताकदवान अभिनेते होते हे समजून येते. त्यांच्या उंचीचा अभिनेता मराठीला आणखी काही काळ लाभला असता तर इतिहास वेगळा असता. खासदार शाहू छत्रपती यांनी कोल्हापुरात राजकपूर यांच्या पुतळ्याप्रमाणेच सरनाईक यांचा दर्शनी भागात पुतळा उभा करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. खासदार महाडिक म्हणाले, सरनाईक यांचे स्मरण पुढच्या पिढीला होण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमांचा प्रभावी वापर केला पाहिजे.
कलावंतांसाठी शिष्यवृत्ती
सरनाईक यांच्या कन्या डॉ. सविता नाईकनवरे म्हणाल्या, पप्पांचे सहकलाकार, मित्रांमुळे ते माझ्याबद्दल, कुटुंबाबद्दल किती जिव्हाळ्याने बोलत हे ऐकून डोळे पाणावले. ‘पप्पा सांगा कुणाचे’ म्हणताना ते आमचे हाेते की परमेश्वराचे असा प्रश्न कायम राहतो. नातू नील नाईकनवरे यांनी अरुण सरनाईक यांच्या नावाने अभिनय क्षेत्रासाठी शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यात येणार असल्याचे जाहीर केले. रणजीत नाईकनवरे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. मनीष आपटे यांनी सूत्रसंचालन केले.