कोल्हापूर : कोल्हापुरात सोमवारी पावसाची उघडीप राहिली असली तरी नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. पंचगंगा नदी इशारा पातळीच्या दिशेने वाहू लागली आहे. शहराच्या मळे भागामध्ये पाणी येऊ लागल्याने प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. जिल्ह्यात पाच दिवस मुसळधार पाऊस पडला. आज पावसाने विश्रांती घेतली. चांदोली, राधानगरी, काळम्मावाडी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवल्याने नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे.
कोल्हापुरात पंचगंगा नदीत काल चार वाजता ३४.२ फूट इतके पाणी होते. आज ही पाणीपातळी याचवेळी ३६.१ फूट झाली असून ती ३९ फूट या इशारा पातळीच्या दिशेने वाहत आहे. काल ३५ हजार १०४ क्युसेक असणारा विसर्ग आज ३९ हजार ४१४ इतका वाढवण्यात आला. पाण्याखालील बंधाऱ्यांची संख्या ६२ वरून ५५ इतकी घटली आहे.
पुरामुळे रस्ता बंद
कोल्हापूर शहराच्या मळे भागात पुराचे पाणी घुसले आहे. उत्तरेश्वर पेठ, शिंगणापूर जुना नाका व प्रबुद्ध भारत कॉलनी येथील रस्त्यावर पहाटे पुराचे पाणी आले आहे. सावधगिरीचा भाग म्हणून येथे लोखंडी कठडे लावून मार्ग बंद करण्यात आला आहे.
कृष्णाकाठ फुगला
कोयना, चांदोली धरणातील पाण्याच्या विसर्गमुळे शिरोळ तालुक्यातील कृष्णा, पंचगंगेच्या पुराच्या पाण्यात सोमवारी दिवसभरात तीन फुटाने वाढ झाली आहे. पुराचे पाणी वाढल्याने नृसिंहवाडी येथील दत्त मंदिरास पुराच्या पाण्याचा पुरता वेढा पडला असून निम्म्याहून अधिक मंदिर पाण्याखाली गेले आहे.