सांगली : स्वातंत्र्य सेनानी डॉ. जी.डी. बापू लाड यांच्या कार्याची माहिती युवकांना मिळावी यासाठी कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठात अध्यासन केंद्र सुरू करण्यात येत आहे. याचा प्रारंभ सोमवार दि. २५ ऑगस्ट रोजी करण्यात येणार आहे.
ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. डी. बापू लाड यांनी स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळात कष्टकरी समाजासाठी कार्य केले. 1942 च्या स्वातंत्र्य आंदोलनात क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या सातारा प्रतिसरकारचे ते महत्त्वपूर्ण भाग होते. प्रतिसरकारच्या सशस्त्र लढ्याचे ते एक कुशल संघटक होते आणि प्रतिसरकारच्या प्रशिक्षित तुफानसेनेचे ते फिल्डमार्शल होते. त्यांची प्रतिसरकारच्या लढ्यातील कामगिरी अतुलनीय होती. त्यावेळच्या सातारा आणि आत्ताच्या सांगली जिल्ह्यातील अनेक गावांना इंग्रजांच्या अन्यायी कारभारापासून आणि चोर-दरोडेखोर, गावगुंड, सावकार, पाटील यांच्या जाचातून मुक्त केले.
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर त्यांनी मराठवाड्यात निजामाच्या अत्याचारी रझाकारांना पायबंद घालण्यासाठी सशस्त्र लढा उभा करण्यास मदत करून हैद्राबाद मुक्ती संग्रामध्ये देखील मोलाची कामगिरी केली. तसेच संयुक्त महाराष्ट्र आंदोलनातही अग्रभागी राहून जनजागृतीचे कार्य केले.. त्यांनी सशेवटच्या श्वासार्पंत शेतकरी, कष्टकरी, गोरगरिबांच्या न्याय्य हक्कांसाठी अनेक लढ्यांचे नेतृत्व केले. अविश्रांत परिश्रमातून त्यांनी शेती, शिक्षण, पर्यावरण, सहकार क्षेत्रात रचनात्मक कार्याद्वारे भरीव योगदान दिले. लोकांच्या प्रबोधनातून नवसमाज निर्मितीसाठी महत्त्वपूर्ण वैचारिक संघर्ष केला.
जी. डी. बापूंच्या कार्यातून नव्या पिढीला दिशा आणि प्रेरणा मिळावी यासाठी शिवाजी विद्यापीठात त्यांच्या नावे अध्यासनाची स्थापना करण्यात आली आहे. या अध्यासनाच्यावतीने भारतीय स्वातंत्र्य लढा, सातारा प्रतिसरकारची चळवळ व जी.डी. बापू लाड यांच्या जीवनकार्यासंबंधी लेखन, संशोधन केले जाणार आहे. जास्तीत जास्त लोकांना भारतीय स्वातंत्र्य लढा आणि जी, डी. बापूचे विचार व कार्य यातून समाजाभिमुख कार्य करण्याची प्रेरणा ही काळाची गरज आहे. म्हणून जी.डी. बापूंनी स्वातंत्र्यप्राप्तीसाठी आणि स्वातंत्र्योत्तर काळात शोषणाविरुद्ध केलेला संघर्ष यासंबंधी व्याख्याने, चर्चासत्रे, शिबिरे, आदींचे आयोजन करण्यात येणार आहे.
जी. डी. बापूंचे आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक अशा विविध क्षेत्रात मौलिक चिंतन होते. त्यांच्या यासंबंधिच्या विचार व कार्याचे आणि अन्य सामाजिक महत्त्वाच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी अध्यासनाच्यावतीने काही संशोधन प्रकाल्प देखील हाती घेतले जाणार आहेत.
या अध्यासनाच्या कार्याचा शुभारंभ कुलगुरुंच्या अध्यक्षतेखाली सोमवार दिनांक २५ ऑगस्ट, रोजी शिवाजी विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहामध्ये आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त पत्रकार उत्तम कांबळे यांचे भारतीय स्वातंत्र्य लढा आणि जी.डी. बापू लाड या विषयावर व्याख्यान आणि शाहीर सदाशिव निकम, कोल्हापूर यांचे शाहिरी सादरीकरण होणार आहे. या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्यासंबंधी क्रांतिअग्रणी विचार व कार्यशक्तीचे प्रमुख आमदार अरुणअण्णा लाड यांनी आवाहन केले आहे.