अहिल्यानगर : सेवा व वस्तुकराची (जीएसटी) १८.३१ लाखांची रक्कम घेऊन ती शासनाकडे न भरता बनावट ऑडिट रिपोर्ट देऊन व्यावसायिकाची फसवणूक केल्याच्या आरोपावरून कोतवाली पोलिसांनी सनदी लेखापालासह तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. शहरातील सूर्या हॉलमार्किंगचे संचालक राजेश बाळासाहेब भोसले (वय ४४, रा. गजराज टॉवर, सारसनगर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.

सचिन आप्पासाहेब दुधाडे (रा. सावेडी), सनदी लेखापाल देवेंद्र आण्णासाहेब पाटील (रा. पाइपलाइन रोड) व सोनाली लोणकर (रा. पुणे, पूर्ण नाव पत्ता नाही) या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात शहरातील व्यावसायिक व सूर्या हॉलमार्किंगचे संचालक राजेश बाळासाहेब भोसले (रा. गजराज टॉवर, सारसनगर) यांनी फिर्याद दिली आहे. ऑगस्ट २०२१ ते डिसेंबर २०२४ या कालावधीत ही फसवणूक झाल्याची तक्रार आहे.

व्यावसायिक राजेश भोसले व त्यांचे बंधू किशोर पाटील यांनी २०२१ मध्ये शहरात सूर्या हॉलमार्किंग्स ही फर्म सुरू केली. जीएसटी आणि प्राप्तिकर रिटर्न भरण्याचे काम त्यांनी सचिन दुधाडे व देवेंद्र पाटील यांना दिले होते. या दोघांनी आमची एसपी. असोसिएट्स आणि एसडी. असोसिएट्स या नावाची चार्टर्ड अकाउंटंट फर्म असल्याचे सांगत काम स्वीकारले. भोसले यांच्याकडून त्यांनी जीएसटी भरण्यासाठी १८.३१ लाख रुपये घेतले. यापैकी दीड लाख रुपये रोखीने तर उर्वरित रक्कम अर्णव एंटरप्रायझेसच्या खात्यात जमा करण्यात आली. अर्णव एंटरप्रायझेस ही पुण्याची फर्म असल्याचे सांगत तेथे काम पाहणाऱ्या सोनाली लोणकर यांच्याशी दोघांनी बोलणेही करून दिले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दुधाडे आणि पाटील यांनी जीएसटी भरल्याचे सांगत ऑडिट रिपोर्ट आणि प्रमाणपत्र दिले. दरम्यान, भोसले यांनी त्यांना जीएसटी भरल्याच्या पावत्या मागितल्यावर त्यांनी तांत्रिक अडचणीमुळे भरल्याचे दिसत नाही, आज देतो, उद्या देतो असे सांगत टाळाटाळ केली. त्यामुळे भोसले यांनी जीएसटी कार्यालयात जाऊन खातरजमा केली असता, एकदाही रक्कम भरलेली नसल्याचे व आता दंडासह ३८ लाख रुपये भरावे लागणार असल्याची माहिती त्यांना मिळाली तसेच, ऑटिड रिपोर्ट, प्रमाणपत्र बनावट असल्याचे उघड झाले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी कोतवाली पोलिसांकडे फिर्याद दिली.