कराड : कोयना धरणग्रस्तांचा गेल्या सात दशकांपासून रखडलेला पुनर्वसनाचा प्रश्न आणि कोयना अभयारण्यग्रस्तांचा गेल्या चार दशकांपासूनचा पुनर्रचनेचा प्रलंबित प्रश्न ‘जैसे थे’ असल्याने संतप्त बाधित मिळकतदारांनी आज गुरुवारी दसऱ्याच्या सणा दिवशीच कोयनानगरमध्ये कोयना जलाशयात जलसमाधीचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली. हे आंदोलन पूर्वनियोजित असल्याने प्रशासनाच्या मध्यस्थीने ते स्थगित करण्यात आले.

‘हिरवा लिंबू, कडकपत्ता सरकार झाले बेपत्ता’ ‘आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा’ अशा घोषणा देत आक्रमकपणे हे आंदोलन छेडण्यात आले. पण, प्रशासन व पोलिसांनी या वेळी हस्तक्षेप करून मध्यस्थी केली. आणि जिल्हा पुनर्वसन अधिकाऱ्यांचे संबंधित अधिकाऱ्यांशी येत्या बुधवारी (दि. ८) बैठक घेण्याचे लेखी आश्वासन मिळाल्याने हे जलसमाधी आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात आले. चैतन्य दळवी यांच्या नेतृत्वाखालील या आंदोलनात सचिन कदम, महेश शेलार, विनायक शेलार, संदीप देवरूखकर यांच्यासह बाधित मिळकतदार सहभागी झाले होते.

कोयना धरणग्रस्तांचे पुनर्वसन लांबतच चालले आहे. त्याचाच निषेध म्हणून कोयना धरणग्रस्त आणि अभयारण्यग्रस्तांनी जलसमाधी आंदोलन पुकारले होते. कोयनानगर बस स्थानकापासून आंदोलक मोर्चाने कोयना जलाशयाकडे वाटचाल करू लागले, नेहरू पार्क जवळील बोट धक्का येथे सर्व आंदोलन एकवटल्यानंतर पोलीस प्रशासनाने आंदोलकांना अडवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. परंतु, आंदोलक आपल्या निर्णयावर ठाम होते, काही क्षणात धरणग्रस्त पाण्यात उतरले, त्यानंतर पोलीस प्रशासन आणि महसूल अधिकाऱ्यांनी मंत्रालय आणि जिल्हास्तरावर वरिष्ठांशी यशस्वी चर्चा करून बुधवारी तातडीने बैठक घेण्याचे पत्र आंदोलकांना दिले, आणि आंदोलकांनी जलसमाधी आंदोलनातून तूर्तास माघार घेतल्याचे जाहीर केले. तसेच आमचे प्रश्न सोडवण्यास दिरंगाई झाल्यास गनिमी काव्याने पुन्हा आंदोलन छेडू असा इशारा त्यांनी दिला.

या वेळी बोलतना, चैतन्य दळवी म्हणाले की, कोयना धरणग्रस्तांच्या तिसऱ्या आणि चौथ्या पिढीने चालू केलेला लढा अंतिम टप्प्यात आला असताना, मंत्रालयस्तरावर काही अधिकाऱ्यांच्या आडमुठे धोरणामुळे धरणग्रस्तांना जमीन मिळण्यात होणारा विलंब आणि अनावश्यक कागदपत्रांची केली जाणारी मागणी यामुळे आमच्या मागण्या प्रलंबित असून, त्याविरोधात आम्ही हे आंदोलन छेडले. राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्र्यांच्या खाजगी सचिवांनी दूरध्वनीवरून उपविभागीय पोलीस अधिकारी पाटण यांच्याशी चर्चा करून लवकरात लवकर बैठक आयोजित करण्याचे लेखी आश्वासन दिल्याचे चैतन्य दळवी यांनी या वेळी सांगितले.