कराड : पश्चिम घाटक्षेत्रासह कोयना पाणलोटातील पावसाची मुसळधार ओसरली असली तरी रात्रीत जोरदार तर, दिवसा दमदार पाऊस कोसळत आहे. त्यात कोयना धरणातील पाण्याची आवक वाढल्याने धरणाचे सहा वक्री दरवाजे पाच फुटांवरून आज रविवारी सायंकाळी आणखी दीड फुटाने उघडून कोयना नदीपात्रातील प्रतिसेकंद २० हजार ९०० क्युसेकचा (घनफूट) जलविसर्ग २९ हजार ६४६ क्युसेक करण्यात आला. तर, धरणाच्या पायथा वीजगृहातून २ हजार १०० क्युसेकचा जलविसर्ग कायम असल्याने कुठे दुथडी तर, कुठे पात्राबाहेरून वाहणाऱ्या कृष्णा-कोयना नद्यांच्या जलपातळीत वाढ होणार आहे.
कोयनेचा जलसाठा आज ८१ टक्क्यांवर असताना, धरणात जवळपास ५०,९४५ क्युसेक पाण्याची आवक तर, दरवाजे व पायथा वीजगृहातून असा एकंदर ३१ हजार ७४६ क्युसेकचा कोयना नदीत जलविसर्ग सुरू आहे. धरणाच्या दरवाजातून जलविसर्ग टप्याटप्याने वाढण्याची शक्यता आहे.
कोयना धरणातील जलआवक गेल्या चार- पाच दिवसांत झेपावली आहे. आज रविवारी सायंकाळी पाच वाजता कोयनेचे दरवाजे पाच फुटांवरून साडेसहा फुटांवर उघडण्यात आले. परंतु, पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असल्याने पाण्याची आवक प्रचंड झेपावली आहे. दरम्यान, प्रमुख सर्व जलाशयातून विसर्ग सुरू असल्याने कृष्णा, कोयना, वारणा, पंचगंगा नद्यांच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ होणार आहे. यंदा पाण्याचा सुकाळ दिसत आहे. मात्र, अतिपावसाने खरीप हंगामाला जोरदार तडाखा दिल्याने शेतकऱ्याच्या तोंडचे पाणी पळाले आहे.
आज रविवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत गेल्या २४ तासांत कोयना धरणाचा जलसाठ्यात तब्बल ४.४० टीएमसी पाण्याची आवक होवून हा धरणासाठा ८५.२९ टीएमसी (७१.०४ टक्के) झाला. जलआवक ४९,४५५ क्युसेकवरून ५०,९४५ क्युसेक अशी वाढली आहे.
कोयना पाणलोटात रविवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत गेल्या २४ तासांत १३५ मिमी (५३१.४४ इंच) असा जोरदार पाऊस झाला आहे. तर यंदा आजवर सरासरी ३ हजार १०९.३३ मिमी, (एकूण वार्षिक सरासरीच्या ६२.१९ टक्के) असा पाऊस झाला आहे.
रविवारी सकाळी आठ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत कोयना पाणलोटक्षेत्रात महाबळेश्वरला ३९, नवजाला २४ तर, कोयनानगरला २१ मिमी तर, कुंभी व वारणा धरण १८ मिमी, कडवी ३०, धोम-बलकवडी १०, दूधगंगा २१, धोम ३, तारळी ८ मिमी असा धरणांच्या परिसरातील पाऊस आहे. तसेच पश्चिम घाट अपवाद वगळता मध्यम ते जोरदार पाऊस होत आहे.