कराड : कोयना धरणक्षेत्रात चालू हंगामात आत्तापर्यंत वार्षिक सरासरीपेक्षा जास्तीचा पाऊस झाला आहे. असेच चित्र पश्चिम घाट प्रदेशात सर्वदूर असून, मान्सूनपूर्व मुसळधार आणि हंगामी दमदार ते जोरदार पावसाने जलसाठे कधीच भरून वाहताना, सर्वत्र पाण्याचा सुकाळ पहायला मिळत आहे. मात्र, कमी कालावधीत अधिक कोसळलेल्या लहरी पावसाचा खरीप हंगामाला फटका बसला आहे.

कोयना धरणाच्या जलवर्षास एक जूनपासून प्रारंभ होतो आणि कोयना पाणलोटात एकूण सरासरी पाच हजार मिमी. पाऊस गृहीत धरला जातो. यंदा एक जूनपासून आत्तापर्यंत कोयनेच्या पाणलोटात नवजाला सर्वाधिक ५,४५३ मिमी., खालोखाल महाबळेश्वरला ५,२२९ मिमी. तर, कोयनानगरला ४,३६७ मिमी. पावसाची नोंद झाली आहे. हा सरासरी पाऊस ५,०१६.३३ मिमी. (वार्षिक सरासरीच्या १००.३३ टक्के) झाला आहे. कोयना धरणात यंदा आत्तापर्यंत १५५.४१ टीएमसी, अब्ज घनफूट (धरण क्षमतेच्या १४७.६५) पाण्याची आवक झाली आहे. तर, जलसाठा नियंत्रणासाठी धरणाचे दरवाजे तब्बल सहावेळा उघडून दरवाजातून विनावापर ५०.५२ टीएमसी तर, पायथा वीजगृहातून वीजनिर्मितीसाठी ९.८२ टीएमसी पाण्याचा वापर झाला आहे. असे एकूण ६०.४३ टीएमसी पाण्याचा धरणातून कोयना नदीपात्रात विसर्ग करण्यात आला आहे.

आज शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता कोयनेचा धरणसाठा १०३.५२ टीएमसी (९८.३६ टक्के) असून, धरणाचे सहा वक्री दरवाजे एक फुटांवर उघडे ठेवून त्यातून ९,१०० क्युसेकचा (प्रतिसेकंद घनफूट) तर, पायथा वीजगृहातून २,१०० क्युसेकचा कोयना नदीपात्रात विसर्ग सुरू आहे. सध्या कोयना धरणात १४,२९५ क्युसेकची जलआवक सुरू असून, सकाळी आठ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत कोयना धरणात १.२३ टीएमसी पाण्याची आवक होताना, धरणक्षेत्रात १७.६६ मिमी. पावसाची नोंद झाली आहे.