कराड : पश्चिम घाटमाथ्यांवर १५ दिवसांच्या दीर्घ कालावधीनंतर पुन्हा जोरदार पाऊस सुरू झाला आहे. कोयना पाणलोटात तर तुफान बरसात सुरू असून, गेल्या २४ तासांत १६८.३३ मिमी (६.६२ इंच) पाऊस होताना, कोयनेचा धरणसाठा २.७२ टीएमसीने (अब्ज घनफूट) म्हणजेच २.५८ टक्क्यांनी झेपावला आहे. दरम्यान, पावसाची सलग विश्रांती राहिल्याने रखडलेल्या खरिपाच्या पेरण्यांना गती मिळून आता त्या जवळपास पूर्णत्वाकडे आहेत.
सध्या कोयना धरणात ३१,५२८ क्युसेक (घनफूट) पाण्याची आवक सुरू असून, जलसाठा ९१.३१ टीएमसी (८६.७६ टक्के) झाला आहे. गतीने वाढणाऱ्या धरणसाठ्याच्या पार्श्वभूमीवर धरणाचे पायथा वीजगृह पुन्हा कार्यान्वित करून त्यातून २,१०० क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
आज, शनिवारी (दि. १६) सकाळी आठ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत कोयना पाणलोटातील कोयनानगरला ४१ एकूण ३,३०१ मिमी, नवजाला ६६ एकूण ३,८६० मिमी, महाबळेश्वर येथे ७० एकूण ३८७० मिमी पावसाची नोंद झाली आहे. कोयना पाणलोटात चालू हंगामात आजवर ३,६७७ मिमी (वार्षिक सरासरीच्या ७३.५४ टक्के) पाऊस झाला आहे.
पश्चिम महाराष्ट्रात सर्वदूर दिवसभर कमी-अधिक प्रमाणात पाऊस होत असून, घाटमाथ्यावर मात्र, जोरदार पर्जन्यवृष्टी होत असल्याचे चित्र आहे. त्यात जोर येथे ७५ मिमी, सांडवली येथे ७२, प्रतापगडाला ६२, कटी येथे ५६, पाडळीला ३८, सावर्डे येथे ३४ मिमी अशा जोरदार पावसाची नोंद आहे. धरण क्षेत्रात धोम ४५ मिमी, तारळी ३०, कडवी २९, धोम-बलकवडी २४, दूधगंगा १६, रांजणी तलाव ११, वारणा धरण ९ मिमी असा दिवसभरातील पाऊस आहे. सध्या खरिपाचा पेरा बऱ्यापैकी उरकला असून, पावसाची गरज असताना, पाऊस पुन्हा सक्रिय झाल्याची बाब समाधानाची आहे.
अंदाज घेऊन विसर्ग – रासनकर
दरम्यान, कोयना सिंचन विभागाचे मुख्य महेश रासनकर यांनी, पुन्हा पाऊस सक्रिय झाला म्हणून घाईगडबडीने धरणाच्या सहा वक्री दरवाजांतून जलविसर्ग करण्यात येणार नाही, तर पावसाचा अंदाज घेऊन याबाबत निर्णय होईल, असे स्पष्ट केले. सध्या पावसाचा धोकादायक (रेड अलर्ट) कोसळण्याचा हवामान खात्याचा इशारा आहे. त्यामुळे पावसाच्या कमी-अधिक प्रमाणावर आमचे बारकाईने लक्ष असून, धरणातील जलविसर्ग आणखी वाढल्यास धरणातून विसर्ग सुरू करण्यात येईल, असेही महेश रासनकर यांनी या वेळी स्पष्ट केले.