नांदेड : काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या कार्यकाळात सुरू झालेले नरहर कुरुंदकर स्मारकाचे काम १५ वर्षांनंतरही अर्धवट अवस्थेत असून या स्मारकाच्या दुसऱ्या टप्प्यातील नियोजित कामांसाठी सुमारे १५ कोटींची प्रशासकीय मान्यता असताना फडणवीस सरकारने ३ कोटींवर बोळवण केली आहे.
विख्यात समीक्षक प्राचार्य नरहर कुरुंदकर यांनी ज्या नांदेड एज्युकेशन सोसायटी या संस्थेच्या पीपल्स महाविद्यालयात मोठे योगदान दिले, त्या संस्थेच्या परिसरात त्यांच्या स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचे बांधकाम काही वर्षांपूर्वी पूर्ण झाले. त्यानंतर स्मारकाच्या वास्तूचा ताबा नरहर कुरुंदकर प्रतिष्ठानकडे देण्यात आला असून तेथे काही नियमित उपक्रम पार पाडले जातात. २०१० नंतर राज्याला ५ मुख्यमंत्री लाभले, तरी वरील प्रकल्पाला शासकीय दिरंगाईचा फटका बसला. तसेच प्रकल्पाच्या खर्चातही मोठी वाढ झाल्याचे सांगण्यात आले.
अशोक चव्हाण यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात राज्याच्या अर्थसंकल्पातच वरील स्मारकासाठी १० कोटींची घोषणा झाली होती. नंतर नांदेडच्या चव्हाणांच्या जागी दुसरे म्हणजे पृथ्वीराज चव्हाण आल्यानंतर २०१३ साली या स्मारकासाठी विविध शासन निर्णयांद्वारे २ कोटींचा निधी वितरित करण्यात आला. त्यातून पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले.
वरील स्मारकाच्या दुसऱ्या टप्प्यातील कामांसाठी शासनाकडून निधी द्यायचा किंवा कसे, याबद्दलचा निर्णय प्रदीर्घ काळ प्रलंबित राहिला. २०१९ ते २०२२ दरम्यान महाविकास आघाडी सरकारमध्ये स्वतः अशोक चव्हाण बांधकाम खात्याचे मंत्री होते; पण त्या काळात या प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यातील बांधकामास प्रशासकीय मान्यता मिळाली नाही. गेल्या वर्षी मार्च महिन्यात १४.७८ कोटींच्या खर्चास प्रशासकीय मान्यता मिळाली. त्यानंतर साडेपाच महिन्यांनी सामान्य प्रशासन विभागाने नांदेड जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्रानुसार वरील कामासाठी ३ कोटींचा निधी वितरित करण्यास मान्यता दिली आहे.
यासंबंधीचा शासन आदेश नुकताच जारी झाला असून वितरित झालेला निधी चालू आर्थिक वर्षामध्ये स्मारकाच्या कामासाठीच खर्च होईल, याची दक्षता जिल्हाधिकाऱ्यांनी घ्यावी, असे या आदेशात नमूद करण्यात आले आहे. या निधीच्या खर्चाची बाब सार्वजनिक बांधकाम खात्याकडे न ठेवता नांदेडच्या निवासी उपजिल्हाधिकाऱ्यास आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे. वरील शासन आदेश जारी होताच खासदार अशोक चव्हाण यांच्या स्थानिक यंत्रणेने एक प्रसिद्धिपत्रक जारी केले. स्मारकाच्या दुसऱ्या टप्प्यातील बांधकामाच्या निधीसाठी खासदार चव्हाण यांनी सातत्याने पाठपुरावा केल्याचे पत्रकात नमूद करण्यात आले.