रत्नागिरी – रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यात सापडलेल्या एका बिबट्याच्या बछड्याला आई न मिळाल्याने वनविभागाने अखेर त्या बछड्याला बोरिवली येथे असलेल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पुढील देखभालीसाठी सोडले.

लांजा तालुक्यातील संसारे तिठा येथे ८ मे २०२५ रोजी दुपारी एक नर असलेला बिबट्याचा बछ्डा आढळून आला. याठिकाणी रस्ता ओलांडताना मादीच्या तोंडातून हा बछ्डा पडल्याचे लक्षात आले. मात्र एक महिन्याच्या या बिबट्याच्या बछ्ड्याची माहिती मिळताच ताब्यात घेवू जिवदान दिले.

वन विभागाच्या अधिकारी व कर्मचारी वर्गाने या बछड्याला त्याच परिसरातील जंगलमय भागात त्याच्या आईसोबत पुन्हा एकत्र आणण्याचा वारंवार प्रयत्न केला. मात्र तो यशस्वी झाला नाही. डॉ. निखिल बनगर, पशुवैद्यकीय अधिकारी, वन्यजीव सातारा वनविभाग आणि सह्याद्री व्याघ्र यांनी लांजा येथे येऊन बछड्याची प्राथमिक तपासणी केली. त्यानंतर पुन्हा हा बछडा सापडलेल्या परिसराची पाहणी करून आई व बछड्याची भेट घडविण्यासाठी अनुकूल जागा निवडण्यात आली. त्यासाठी बछड्याला कॅमेऱ्याच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले. परंतु वारंवार प्रयत्न करूनही बछड्याची आईशी भेट झाली नाही. मात्र, एके रात्री दोन वेळा बिबट्या मादी या बछड्या जवळ येऊन गेल्याचे छायाचित्र कॅमेरात कैद झाले होते.

आई व बछड्याची भेट प्रयत्न करुन देखील होत नसल्याने शेवटी वन विभागाने वातावरणातील बदल आणि पावसामुळे बछड्याच्या आरोग्याला धोका पोहोचू नये म्हणून लांजा येथील शासकीय विश्रामगृहात डॉ. निखिल बनगर यांच्या देखरेखीखाली त्या बछड्याला सुरक्षित ठेवण्यात आले. वनरक्षक कोर्ले श्रावणी पवार, वनरक्षक लांजा नमिता कांबळे, आणि वनपाल लांजा सारिक फकीर यांनी त्या बछड्याची चोवीस तास देखरेख केली. डॉ. बनगर यांच्या सूचनेनुसार दिवसातून चार वेळा त्याला खाद्य देण्यात येवून त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात आले. बछड्यासाठी लागणारी खाद्य पावडर वनपरिक्षेत्र अधिकारी रत्नागिरी, प्रकाश सुतार यांनी कोल्हापूर-मिरज येथून तात्काळ उपलब्ध करून दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सापडलेल्या या एका महिन्याच्या बछड्याच्या आईचा शोध घेण्यासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी प्रकाश सुतार यांनी कोल्हापूर वन विभागाची थर्मल ड्रोन तपासणी टीम बोलावून बछडा सापडलेल्या ठिकाणी दिवसा आणि रात्री थर्मल ड्रोनद्वारे तपासणी केली. यात बिबट्या मादी आढळून आली नाही. अखेर २५ ते ३० दिवसानंतर बिबट्याचा हा बछ्ड्याला आई न मिळाल्याने मुंबई बोरीवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पुढील संगोपनासाठी पाठवण्याची परवानगी मिळाली. त्यानंतर शासकीय वाहनाने वनपाल सारिक फकीर आणि डॉ. निखिल बनगर यांनी बछड्याला मुंबईला नेऊन वन अधिकारी आणि डॉ. जंगले यांच्या ताब्यात देण्यात आले.