सावंतवाडी : ज्येष्ठ साहित्यिक जयवंत दळवींच्या साहित्यातून त्यांचे विचार चिरंजीव राहतील, त्यामुळे त्यांचे साहित्य हीच त्यांची खरी संजीवन समाधी आहे, असे मत गोवा मराठी अकादमीचे अध्यक्ष प्राचार्य अनिल सामंत यांनी व्यक्त केले. आरवली (सिंधुदुर्ग) येथील दळवींच्या जन्मगावी झालेल्या त्यांच्या जन्मशताब्दी सांगता सोहळ्यात ते बोलत होते.

​आजगाव येथील साहित्य प्रेरणा कट्ट्याच्या ५८ व्या मासिक कार्यक्रमांतर्गत शिरोडा येथील रघुनाथ गणेश खटखटे ग्रंथालय आणि दळवी कुटुंबीयांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या सोहळ्याला जयवंत दळवी यांचे सुपुत्र गिरीश दळवी, ‘संगीत देवबाभळी’ या नाटकाचे लेखक व दिग्दर्शक प्राजक्त देशमुख आणि प्राचार्य अनिल सामंत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

​या कार्यक्रमात दळवींच्या जीवनपटावर आधारित विविध कार्यक्रम सादर करण्यात आले. ‘पाऊलखुणा’ या दृकश्राव्य कार्यक्रमात राजेश नाईक यांनी दळवींच्या साहित्यात आलेल्या घरातील वस्तू, आरवली परिसरातील वास्तू आणि व्यक्ती यांचा मागोवा घेतला. विनय सौदागर दिग्दर्शित ‘दळवींचे साहित्य चरित्र’ या कार्यक्रमात उमा प्रभुदेसाई (गोवा), नीला इनामदार (अमेरिका) आणि रवींद्र पणशीकर यांनी दळवींच्या विविध नाटकातील व्यक्तिरेखांचे अभिवाचन व सादरीकरण केले. सरोज रेडकर, सोमा गावडे, स्नेहा नारिंगणेकर, वैभवी राय शिरोडकर, डॉ. गणेश मर्ढेकर, आसावरी भिडे, काशिनाथ मेस्त्री या स्थानिक वाचकांनीही दळवींच्या पुस्तकांमधील निवडक भागांचे वाचन केले.

​’आप्तेष्टांशी हितगुज’ या सत्रात सोनाली परब यांनी गिरीश दळवी आणि त्यांच्या पत्नी आदिती दळवी यांची मुलाखत घेतली, ज्यात दळवींचे कौटुंबिक व्यक्तिमत्त्व उलगडले. ‘सन्मित्र जयवंताचे’ या कार्यक्रमात रघुवीर मंत्री आणि ज्येष्ठ पत्रकार अनिल निखार्गे यांच्याशी गजानन मांद्रेकर यांनी संवाद साधला. या संवादातून दळवींचे सामाजिक कार्य आणि आरवली गावावरील त्यांचे प्रेम याबद्दलची माहिती समोर आली. ​विनय सौदागर यांनी वर्षभर चाललेल्या ‘दळवींचा साहित्य जागर’ या उपक्रमाचा आढावा सादर केला. यामध्ये दळवींच्या ३२ पुस्तकांचे वाचन आणि त्यावरील चर्चांचा समावेश होता. या सोहळ्यात माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, नाटककार सतीश आळेकर, साहित्यिक मुकुंद टाकसाळे आणि दळवींच्या कन्या शुभांगी नेरूरकर यांचे संदेशही दृकश्राव्य माध्यमातून दाखवण्यात आले.

​कार्यक्रमाची सुरुवात स्थानिक गायक शेखर पणशीकर यांनी गायिलेल्या ‘मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश…’ या गीताने झाली. गोव्याचे चित्रकार लक्ष्मण चारी यांनी रेखाटलेल्या जयवंत दळवींच्या पेन्सिल रेखाचित्राला मान्यवरांनी पुष्पांजली अर्पण केली. सोहळ्याचे सूत्रसंचालन सोनाली परब यांनी केले. सचिन दळवी यांनी स्वागत, तर राजेश नाईक यांनी प्रास्ताविक केले. शेवटी खटखटे ग्रंथालयाचे कार्यवाह सचिन गावडे यांनी आभार मानले.

​या सोहळ्याला जयवंत दळवींचे कुटुंबीय आणि गोवा व महाराष्ट्रातील चाहते मोठ्या संख्येने उपस्थित होते.