रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपूळे येथे येणा-या पर्यटकांना समुद्राचा मोह आवरत नसल्याने अनेक पर्यटकांना आपले प्राण गमावावे लागले तर काहीना वाचविण्यात यश आले आहे. अशीच घटना पुन्हा घडली. गणपतीपुळे समुद्रात बुडणाऱ्या तीन महिला पर्यटकांना वाचविण्यात स्थानिक वॉटर स्पोर्ट व्यवसायिक आणि जीवरक्षकांना यश आले.
कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील ज्योतिबा डोंगरवाडी येथून निशा अजय सांगळे (वय वर्षे ३०), हर्षदा प्रमोद मिटले (वय वर्षे ३०), आणि तनुजा रमेश आभाळे (वय वर्षे १७) या तिघीजणी १७ ऑक्टोबर रोजी आपल्या फॅमिली सहित पर्यटनासाठी आल्या होत्या. या तिघी समुद्रात आंघोळीसाठी पाण्यात उतरल्या असताना समुद्राच्या मोठ्या लाटांमध्ये अडकल्या. त्यांना बाहेर पडता येत नसल्याने त्यांनी आरडाओरडा केला.
यावेळी समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या मोरया वॉटर स्पोर्टच्या व्यवसायिकांनी आपल्या स्पीड बोटीच्या सहाय्याने तात्काळ त्यांच्या दिशेने धाव घेवून तिघिंना पाण्या बाहेर काढले. या तिघींचे प्राण वाचविण्यात वॉटर स्पोर्ट व्यवसायिकांना यश आले. यावेळी त्यांना गणपतीपुळे ग्रामपंचायतीचे जीवरक्षक, वॉटर स्पोर्ट व्यवसायिक आणि गणपतीपुळे चौकीच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी मोलाची मदत केली. या तिन्ही महिलांना सुरक्षित रित्या समुद्राच्या पाण्याबाहेर काढल्यानंतर जीवरक्षक, वॉटर स्पोर्ट व्यवसायिक आणि गणपतीपुळे पोलीस चौकीच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना अधिक उपचारासाठी मालगुंड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात गणपतीपुळे देवस्थानच्या अॅम्बुलन्सने दाखल केले. आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.
गणपतीपुळे समुद्रकिनारी पर्यटकांनी समुद्राच्या खोल पाण्यात जाऊ नये. समुद्रातील भरती-ओहोटीचा वेग, मोठ्या लाटा आणि प्रवाह यामुळे अपघाताची शक्यता जास्त असते. जीवरक्षक आणि वॉटर स्पोर्ट व्यवसायिक यांच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. समुद्रकिनारी लावलेले इशारे आणि लाल झेंडे याबाबत माहिती घ्यावी. स्वतःची आणि कुटुंबीयांची सुरक्षितता लक्षात घेऊन केवळ सुरक्षित मर्यादेतच समुद्रस्नानाचा आनंद घ्यावा, असे आवाहन मंदिर प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.