निसर्ग चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात वीज वितरण कंपनी आणि घरांना फटका बसला आहे. जिल्ह्यातील ८ तालुक्यातील सुमारे ४१ घरांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तसेच वीज वितरण कंपनीचे सुमारे ३ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
निसर्ग चक्रीवादळामुळे अनेक वृक्ष घरे, गोठे,वीज वितरण कंपनीचे खांब, वीज लाईनवर उन्मळून पडले आहेत, त्यामुळे वीज कंपनीचे मोठे नुकसान झाले तसेच रस्ते देखील वाहून गेल्याच्या घटना घडल्या आहेत.
मालवण तालुक्यात वीज वितरण कंपनीचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्य़ातील सावंतवाडी, वेंगुर्ले, कुडाळ ,देवगड, वैभववाडी, दोडामार्ग या तालुक्यात ४१ घरांचे नुकसान झाले आहे. ते सुमारे २५ ते ३० लाख रुपयांच्या दरम्यान झाले असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. याबाबतचे पंचनामे करण्याचे काम सुरू झाले आहे. असे जिल्हा आपत्कालीन कक्षातून सांगण्यात आले.
निसर्ग चक्रीवादळामुळे जिवीत हानी झाली नाही पण घरे, वीजेचे खांब, रस्ते, आदींचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील वीज वितरण कंपनीचे ४०८ विद्युत पोल,३२ किलो मीटर वीज लाईन यांचे २ कोटी ९० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. असे विद्युत कंपनीच्या अधीक्षक अभियंता यांनी सांगितले.सुमारे ३० झाडे घर, वीज लाईनवर उन्मळून पडल्याने नुकसान झाले आहे.
जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत सरासरी १६.८२ मि.मी. पाऊस झाला आहे. तालुकानिहाय पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतची असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत.
दोडामार्ग १०(२२२), सावंतवाडी १७(२१४), वेंगुर्ला १८.६(१८४.६), कुडाळ ३ (१५७), मालवण २८(२३२), कणकवली १०(१२०), देवगड २०(१६१), वैभववाडी २८(२३१), असा पाऊस झाला आहे.