अलिबाग-महाड औद्योगिक वसाहतीतील एका रासायनिक युनिटवर छापा टाकून रायगड पोलिस व अमली पदार्थ नियंत्रण विभाग यांनी मोठा अमली पदार्थ साठा जप्त केला आहे. बाजारात या अमली पदार्थांची किमंत ८८ कोटींच्या घरात असल्याचे सांगतले जात आहे.

गेल्या काही वर्षांपासून महाड एमआयडीसी मधील या बंद पडलेल्या कंपनीतून छुप्या पध्दतीने अमली पदार्थांची निर्मिती सुरु होती. कंपनीत तयार झालेले अमली पदार्थ मुंबईसह इतर महानगरामध्ये वितरणासाठी पाठवले जात होते. संघटीत पध्ततीने हे काम सुरू होते. याबाबतची माहिती पोलीसांना गोपनीय सुत्रांच्या माध्यमातून हाती लागली. त्यानुसार महाड एमआयडीसी पोलीस, स्थानिक गुन्हे शाखा आणि अंमली पदार्थ निंयत्रण विभागाने या बंद असलेल्या कंपनीवर धाड टाकली.

बंद कंपनीच्या प्रांगणात सुरू असलेल्या बेकायदेशीर रसायन प्रक्रियेवर कारवाई करण्यात आली. या ठिकाणाहून ३४ किलो किटामाईन पावडर आणि १३ किलो लिक्विड किटामाईन असा एकूण साठा जप्त करण्यात आला. ज्याची बाजारातील किमंत ८८ कोटींच्या घरात आहे. या युनिटचा वापर कायदेशीर उत्पादनाऐवजी अमली पदार्थ निर्मितीसाठी केला जात असल्याचे प्राथमिक तपासातून उघड झाले आहे. या बेकायदेशीर व्यवहारात अनेक व्यक्ती तसेच लहान रासायनिक युनिट्स सामील असल्याचा संशय असून, सध्या काही संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.

या प्रकरणी अंमली पदार्थ प्रतिबंधक कायदा १९८५ (NDPS Act) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सुरू असून संपूर्ण नेटवर्क उघड करण्यासाठी पथकाकडून अधिक माहिती गोळा केली जात आहे अशी माहिती महाड एमआयडीसी पोलीसांकडून देण्यात आली आहे. ही कारवाई म्हणजे अमली पदार्थांच्या बेकायदेशीर साखळीवर मोठा आघात असून, अशा प्रकारच्या गुन्ह्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे महाड रायगड पोलीस विभागातर्फे सांगण्यात आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काही दिवसांपूर्वीत पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांनी अमली पदार्थ तस्करीबाबत जिल्ह्यात झिरो टॉलरन्स पॉलीसी राबविणार असल्याचे घोषीत केले होते. पोलीस अधीकाऱ्यांना अमली पदार्थ विरोधात व्यापक कारवाई सरू करण्याचे निर्देश दिले होते. मुरूड आणि अलिबाग परिसरात अमली पदार्थ तस्करीचे एक टोळी नुकतीच जेरबंद केली होती. यातील प्रमुख आरोपीला नेपाळ आणि उत्तर प्रदेश पोलीसांच्या मदतीने अटक करण्यात आली होती. यानंतर रायगड पोलीसांनी केलेली अमली पदार्थ विरोधी ही दुसरी मोठी कारवाई आहे.