सातारा : कायम दुष्काळी भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माण तालुक्यात ढगफुटी सदृश झालेल्या पावसामुळे शेकडो एकरवरील पिके पाण्याखाली गेली असून, अनेक घरांचेही नुकसान झाले आहे. अनेक रस्ते वाहून गेले आहेत. काही पुलावरून पाणी गेल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे.माण तालुक्यात गुरुवारी रात्री ढगफुटी सदृश पाऊस झाला. या पावसामुळे येरळा नदी पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे मायणी निमसोड रस्ता बंद करण्यात आला आहे.
म्हसवड-मायणी या रहदारीच्या रस्त्यावरील कुकुडवाड घाटाखालील ओढ्यास पूर येऊन या ओढ्यावरील साकव नजिकचा रस्ता खचून वाहून गेला. रात्रीपासून या रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली आहे. मुसळधार पावसामुळे घाटातील रस्त्यावरील सुमारे १३ गावांचा संपर्क तुटला आहे.या घटनेची माहिती मिळताच, खटाव-माण महसूल उपविभागीय अधिकारी गाडेकर यांनी घटनास्थळी भेट दिली. याबरोबरच सार्वजनिक बांधकाम, पोलीस यंत्रणेची मदत घेऊन हा रस्ता अडथळे (बॅरिकेट) उभे करून बंद ठेवला.
मुसळधार पावसामुळे कातरखटाव परिसरातील रस्त्यावर पाणी वाहू लागले. या भागातील खरीप हंगामातील शेतातील उभ्या पिकांत पाणी साचून काढणीस आलेल्या पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश प्रांताधिकारी यांनी दिले आहेत. कुकुडवाड गावाचा परिसर डोंगराळ असून, या डोंगराळ भागातील घाटातून म्हसवड-मायणी हा सातत्याने वर्दळीचा रस्ता जातो.
१३ गावांचा संपर्क तुटला
मुसळधार पावसामुळे घाटातील सुमारे १३ गावांचा संपर्क तुटला. याबरोबरच रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून, हा रस्ता वाहतुकीस धोकादायक झाला आहे. पर्यायी सुरक्षित रस्त्याने वाहतूक वळविण्यात आली. या रस्त्याची तातडीने डागडूजी करून हा रस्ता खुला करणेबाबत प्रशासन पातळीवर उपाययोजना केल्या असल्याची माहिती गाडेकर यांनी दिली.
यंदा माण तालुक्यात सर्वत्रच मे महिन्यापासून दमदार पाऊस पडत आहे. माणमधील बहुतांश तलाव वाहू लागले आहेत. माण नदीच्या पात्रातील पाण्याची पातळी वाढू लागली आहे. मे महिन्यापासून सातत्याच्या पावसामुळे माणमधील खरीप हंगामातील पिकांच्या पेरणीचे वेळापत्रक कोडमडले. शेतशिवारातील सखल भागात पाणी साचून राहिल्यामुळे नापेर क्षेत्र वाढले आहे. या उलट पेरणी केलेल्या पिकांचे सातत्याच्या पावसामुळे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. माण तालुका ओला दुष्काळी जाहीर करावा, पावसाने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून शासनाने मदतीचा हात द्यावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून होऊ लागली आहे.