सातारा : पुणे – महाबळेश्वर मार्गावरील सुरूर ते वाई दरम्यानचा रस्ता पुलाच्या दुरुस्ती कामासाठी १५ ऑगस्टपर्यंत बंद करण्यात आला आहे. यासाठी प्रवाशांनी पर्यायी पाचवड मार्गाचा वापर करावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी केले आहे.

पुणे-महाबळेश्वर मार्गावरील सुरूर ते वाई दरम्यानच्या रस्त्याचे सध्या काम सुरू आहे. रस्ता रुंदीकरणाबरोबरच या मार्गावरील पुलाचे नवनिर्माणही केले जाणार आहे. यासाठी या मार्गावरील वाहतूक आजपासून १५ ऑगस्टपर्यंत बंद करण्यात आली आहे. या मार्गे वाई, पाचगणी, महाबळेश्वरकडे जाणाऱ्या सर्व वाहनांनी पुणे-सातारा महामार्गावरील पाचवडहून वाईकडे जाणाऱ्या रस्त्याचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यामुळे पुढील कालावधीत वाई, महाबळेश्वरकडे जाणाऱ्या एसटी बसदेखील पाचवडमार्गे जातील.

सुरूर ते वाई या मार्गाचा वापर वाई, महाबळेश्वरसह आंबेनळी घाटातून कोकणात जाणारे प्रवासी करतात. या सर्वच वाहनांना आता पुणे-सातारा महामार्गावरील पाचवडहून वाई गाठावे लागणार आहे. यामुळे वाहनचालकांचे अंतर वाढणार आहे. या बंद करण्यात आलेल्या मार्गावरील गावांतील वाहतूक अंशता सुरू राहणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एसटी भाडेवाढ

दरम्यान, हे अंतर वाढल्याने या मार्गावरून प्रवास करणाऱ्या सर्व एसटी फेऱ्यांसाठी तिकीट दरात २५ रुपये वाढ करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. या मार्गावरून पुणे, वाई, पाचगणी, महाबळेश्वर, कोकणात अनेक एसटी बस प्रवास करतात. या सर्वच फेऱ्यांचे अंतर वाढणार असल्याने महामंडळाने भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती वाईचे आगार व्यवस्थापक युवराज कदम यांनी दिली. या रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत सर्व प्रकारची एसटी वाहतूक यापुढे पाचवडमार्गे होणार असल्याचेही कदम यांनी सांगितले.