Anushakti Nagar Constitution Conflict in NCP Sharad Pawar : शरद पवारांच्या राष्ट्रवादीने आज नऊ उमेदवारांची यादी जाहीर केली. आजच्या यादीत त्यांनी अनुशक्ती नगरमधून अभिनेत्री स्वरा भास्कर हिचे पती फहाद अहमद (Fahad Ahmad) यांना उमेदवारी देऊ केली आहे. या उमेदवारीवरून आता वाद सुरू झाला आहे. अनुशक्ती नगरमधील स्थानिक पदाधिकारी यांनी संताप व्यक्त केला असून कार्यकर्त्यांशी बोलून पुढील निर्णय घेतला जाईल, असा सूचक इशाराही देण्यात आला आहे. ते टीव्ही ९ मराठीशी बोलत होते.

अनुशक्ती नगर येथून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे अनेक पदाधिकारी इच्छूक होते. अजित पवारांनी राष्ट्रवादी पक्षात बंडखोरी केल्यानंतर अनेक पदाधिकाऱ्यांनी शरद पवारांना समर्थन दिलं होतं. त्यामुळे शरद पवार निष्ठावान कार्यकर्त्याला संधी देतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. परंतु, या जागेवरून शरद पवारांनी समाजवादी पक्षाच्या नेत्याला आपल्या पक्षात घेऊन उमेदवारी देऊ केली. त्यामुळे अनुशक्तीनगरमधील कार्यकर्ते नाराज झाले आहेत. इच्छूक उमेदवार निलेश भोसले यांनी यासंदर्भात टीव्ही ९ शी संवाद साधताना फहाद अहमद यांच्यावरही टीका केली.

हेही वाचा >> Fahad Ahmad : शरद पवारांचा मास्टर स्ट्रोक! स्वरा भास्करचा पती निवडणुकीच्या रिंगणात, नवाब मलिकांच्या लेकीविरोधात लढणार

निलेश भोसले म्हणाले, “आम्ही जेवढ्या इच्छूकांनी अर्ज केला होता, आमच्यापैकी कोणाची बायको हिरॉइन नसल्याने आम्हाला टाळलं असावं. राष्ट्रवादी काँग्रेसचा कणा म्हणजे पक्षाचा सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. कार्यकर्ते आम्हाला दिशा ठरवून देत नाहीत, तोवर कोणताही निर्णय घेणार नाही. निष्ठेने शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत उभे राहणार.”

निष्ठावंत कार्यकर्त्यांचा विचार झाला नाही

“अजित पवारांसह ४० आमदार गेले, तरीही आम्ही हललो नाही. चांगले दिवस येतील तेव्हा आमच्यासारख्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचा विचार होईल असं वाटलं होतं. पण अर्ध्या तासांपूर्वी समाजवादी पक्षाचा कार्यकर्त्याचा पक्षात प्रवेश केला अन् त्याला उमेदवारी दिली. हे दुर्भाग्यपूर्ण आहे”, असं निलेश भोसले म्हणाले.

अनुशक्तीनगरमधून फहाद अहमद यांना उमेदवारी

राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाने आज नवी यादी जाहीर केली. आजच्या यादीत ९ जणांना उमेदवारी देण्यात आली आहे. महत्त्वाचं म्हणजे अभिनेत्री स्वरा भास्करचा पती फहाद अहमद यांना उमेदवारी देण्यात आली आहे. नवाब मलिक यांची लेक सना मलिक यांच्याविरोधात ते उभे ठाकले आहेत. अनुशक्तीनगर येथून त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. जयंत पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

फहाद अहमदबद्दल जयंत पाटील काय म्हणाले?

“ते उच्च शिक्षित असून मुस्लीम तरुण आहेत. त्यांनी टाटा इन्स्टिट्युट ऑफ सोशल सायन्समध्ये अभ्यास केला आहे. ते चांगले अॅक्टिव्हिस्ट असून देशभर त्यांचं चांगलं नाव आहे. ते आधी आमच्या पक्षात नव्हते. ते पूर्वी समाजवादी पक्षात होते. चर्चा करून आम्ही त्यांना आमच्या पक्षात घेतलं असून त्यांना निवडणुकीसाठी उमेदवारी दिली आहे”, असं जयंत पाटील म्हणाले.