अतिवृष्टी, महापूर, भूस्खलन यामुळे राज्यातील लाखो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असले तरी शेतकरी नवनिर्मितीसाठी पुढे सरसावला आहे. नुकसानीच्या वेदना, आर्थिक झळा कायम असतानाही दीपावलीच्या सणानिमित्त सर्व वेदना, नुकसानीला पाठीवर टाकत नवनिर्मितीसाठी बळीराजा सरसावला आहे.

यंदाच्या वर्षी फेब्रुवारी महिन्यापासून राज्याला अतिवृष्टी, गारपीट, महापूर, भूस्खलन सारख्या नैसर्गिक आपत्तींचा फटका बसत आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि महापुरामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. यंदाच्या खरीप हंगामात राज्यातील सुमारे ९० लाख हेक्टरवरील पिके कमी अधिक प्रमाणात बाधित झाले आहेत, तर बाधित शेतकऱ्यांची संख्या ८३ लाखांवर गेली आहे. राज्य सरकारने एनडीआरएफच्या माध्यमातून आजवर सुमारे सात हजार कोटी रुपयांची मदत शेतकऱ्यांना केली आहे. जिल्हाधिकारी पातळीवरून झालेली आर्थिक मदत यापेक्षा वेगळी आहे. तरीही हे नुकसान भरून येणारे नाही.

सोलापूर आणि उस्मानाबाद परिसरातून वाहणाऱ्या सीना नदीच्या पुरात जनावरांचे गोटे पाण्याखाली गेले. लोकांची घरे पाण्याखाली गेली. ज्या शेतात ऊस जोमदार येत होता, तिथे वीस, एकवीस फूट खोल जमीन वाहून गेली आहे. फक्त दगड, गोठे, वाळू राहिली आहे. ना ऊस राहिला, ना पीक राहिले.

नाशिक, पुणे, सांगली, भागात साततच्या पावसाने द्राक्षबागांचे नुकसान झाले आहे. फळ छाटणीला उशीर होत आहे. फळ छाटणी घेतलेल्या बागांमध्ये द्राक्ष घडांचा आकार कमी दिसतो आहे, तसेच द्राक्ष घडांची संख्या कमी दिसते आहे. विदर्भात संत्रा, मोसंबी पिकांना सततच्या पावसामुळे फटका बसला असून, फळगळती होत आहे. झाडे पिवळी पडून झाडांचे नुकसान झालेले आहे. सोलापूर, इंदापूर परिसरात डाळिंब शेतीला अति पावसाचा फटका बसला आहे. फळकुज रोगाचा प्रादुर्भाव या ठिकाणी वाढत आहे. हजारो कोटी रुपयांचे नुकसान या पावसामुळे झालेले आहे.

सरकारचा मदत आणि पुनर्वसन विभाग सुद्धा शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत देण्यासाठी तत्परतेने काम करत आहे. दिवाळीतील विभागाचे कर्मचारी काम करताना दिसत आहेत. ई ऑफिस सारख्या अत्याधुनिक यंत्रणेचा वापर केल्यामुळे काही अधिकारी सुट्टीवर असतानाही घरात बसून फाईल मंजूर करत आहेत. शेतकऱ्यांप्रती असणारी ही तळमळ, आत्मीयताच आहे, यातून सर्वसामान्यांचे शेतकऱ्यांप्रती असलेलं प्रेम अधोरेखित होतं. पण झालेले नुकसान भरून येणार नाही. हेक्टरी भरपाईची आकडेवारी मोठी दिसत असली तरी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या हातात पडणारी रक्कम खूपच कमी आहे, त्यामध्ये जनावरांचे नुकसान प्रचंड आहे. सोलापूर परिसरात अनेक दुधाळ गाई मृत्युमुखी पडल्या आहेत. एक गाय एक ते दीड लाख रुपये किमतीची असताना सरकार फक्त ३७,५०० रुपयांची भरपाई देत आहे. त्यामुळे नुकसान भरपाई मिळत असली तरीही शेतकऱ्यांचे झालेले नुकसान भरून निघणार नाही. शेतकऱ्याला त्याचे नुकसान स्वतःलाच भरून काढावं लागणार आहे आणि त्यासाठीच तो नव्या उमेदीने पुढे चालतो आहे.

दिवाळी सणाच्या तोंडावर झालेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांच्या तोंडाचा घास हिरावला आहे. शेत शिवारातील सोन्यासारखी पीक मातीमोल झाली आहेत, तरीही दिवाळीचा सण आहे. वर्षाचा सण आहे, म्हणून शेतकरी दुःख, वेदना नुकसान पाटीवर टाकत नव्याने कामाला लागला आहे. एकीकडे तो दिवाळीचा सण जसा जमेल तसा करतो आहे आणि दुसरीकडे रब्बी हंगामाच्या तयारीला लागला आहे. खरिपाचे नुकसान झाल्यामुळे रब्बी हंगामात तरी चांगले पीक हाताशी यावे. वर्षभराच्या उदरनिर्वाहाचा खर्च तरी निघाला, अशा अपेक्षेने शेतकरी पुन्हा कामाला लागला आहे. सरकारने रब्बी पिकांसाठी शेतकऱ्याला प्रति हेक्टरी दहा हजार रुपये जाहीर केली आहे. ही मदत त्याला लवकर मिळावी एवढीच शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. शेतकरी आळशी नाही. नुकसानीने खचणारा नाही, तो आत्महत्या करणारा नाही. तो नव निर्माण करणारा आहे. म्हणूनच खरिपात झालेला नुकसान बाजूला सारून, तो रब्बी हंगामात नवनिर्माण करण्यासाठी सरसावला आहे. आता रब्बीत किमान दर्जेदार बियाणे, दर्जेदार खाते, औषधे शेतकऱ्यांना माफक दरात उपलब्ध व्हावीत आणि सरकारने जाहीर केलेली प्रती हेक्टरी दहा हजार रुपयाची मदत वेळेत मिळावी, म्हणजे त्याच्या कष्टाला नवनिर्मितीचे धुमारे फुटतील.