Guardian Minister List : राज्यातील पालकमंत्री पदाची यादी आज (१८ जानेवारी) जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गडचिरोली जिल्ह्याचं पालकमंत्रिपद असणार आहे. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ठाणे आणि मुंबई शहर तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे आणि बीड जिल्ह्याचं पालकमंत्रिपद देण्यात आलं आहे. मात्र, पालकमंत्री पदाच्या यादीतून धनंजय मुंडे यांना वगळण्यात आलं आहे. धनंजय मुंडे यांच्याकडे कोणत्याही जिल्ह्याचं पालकमंत्रिपद देण्यात आलेलं नाही. त्यामुळे त्यांच्यासाठी हा धक्का मानला जात आहे.

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेनंतर बीड जिल्ह्यात चांगलंच राजकारण तापलं आहे. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरण आणि वाल्मिक कराड खंडणी प्रकरण यावरून सध्या बीडमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड सध्या पोलीस कोठडीत आहे, तर वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असल्याची टीका विरोधकांकडून करण्यात आली आहे. त्यामुळे मंत्री धनंजय मुंडे यांचा मंत्रि‍पदाचा राजीनामा घेण्यात यावा, अशी मागणी विरोधकांनी केली होती.

तसेच बीड जिल्ह्याचं पालकमंत्री पद धनंजय मुंडे यांच्याकडे देण्यात येऊ नये, अशी मागणी देखील बीड जिल्ह्यातील सर्वपक्षीय आमदार आणि स्थानिक नेत्यांनी केली होती. तसेच बीड जिल्ह्यातील सर्वपक्षीय आमदारांनी बीड जिल्ह्याचं पालकमंत्री पद देवेंद्र फडणवीस किंवा अजित पवार यांनी स्वत:कडे घ्यावं, अशी मागणी देखील करण्यात आली होती. दरम्यान, अखेर आज पालकमंत्री पदाची यादी जाहीर झाली. यामध्ये बीड जिल्ह्याचं पालकमंत्री पद उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे देण्यात आलं आहे. तसेच धनंजय मुंडे यांच्याकडे कोणत्याही जिल्ह्याचं पालकमंत्री पद देण्यात आलेलं नाही. त्यामुळे धनंजय मुंडे यांना वाल्मिक कराड खंडणी प्रकरण आणि संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरण भोवलं का? असा सवाल आता राजकीय वर्तुळातून उपस्थित केला जात आहे. अजित पवार यांच्याकडे बीड जिल्ह्याचं पालकमंत्रिपद देण्यात आल्यानंतर धनंजय मुंडेंनी ट्वीट करत प्रतिक्रिया दिली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया काय?

“बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन व खूप खूप स्वागत. आदरणीय दादांच्या नेतृत्वात बीड जिल्ह्याच्या विकासाला पुणे जिल्ह्याप्रमाणे अधिकची गती आणि चालना मिळेल असा मला विश्वास आहे. बीड जिल्ह्यातील सध्या बदललेली राजकीय व सामाजिक स्थिती पाहता मुख्यमंत्री महोदय व उपमुख्यमंत्री महोदय यांना मी स्वतः बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद अजित पवार यांना स्वीकारण्याबाबत विनंती केली होती. त्यानुसार त्यांनी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद स्वीकारले, याचा मला आनंद वाटतो. सद्यस्थितीत मला कोणत्याच जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी नको, अशी माझी विनंतीही मान्य केल्याबद्दल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांचे आभार! मला दिलेल्या विभागाची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहील, अशी प्रतिक्रिया धनंजय मुंडे यांनी ट्वीट करत दिली आहे.