निम्म्या राज्यातील रब्बी हंगाम पाण्यात; ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

छत्रपती संभाजीनगर : राज्यात पावसाचा कहर सुरूच असून मंगळवारी अनेक जिल्ह्यांत पूरस्थितीचा धोका आणखी वाढला आहे. त्यात सर्वाधिक फटका मराठवाड्याला बसला आहे. आतापर्यंत सरकारने २,२१५ कोटींची मदत जाहीर केली आहे. तसेच प्रचलित निकषांमध्ये शिथिलता आणून शेतकऱ्यांना मदत दिली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी केली. शनिवार व रविवारी राज्यात पुन्हा अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्याने प्रशासनाला खबरदारी घेण्याचा आदेश देण्यात आला आहे. दरम्यान वाहून गेलेले व वीज पडून मराठवाड्यात मृत्यू झालेल्या व्यक्तींची संख्या आठवर गेली आहे.

जायकवाडी आणि माजलगावच्या धरण क्षेत्रात सोमवारी रात्री झालेल्या पावसामुळे गोदावरी नदी धोक्याच्या पातळीवर असून गोदावरी आणि सिंदफणा नदीलगतच्या गावांमधील पूर परिस्थिती वाढण्याचा धोका आहे. तसेच माजलगाव धरणातून सकाळी पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आल्याने बीड, परभणी या जिल्ह्यात पुन्हा पूरस्थिती निर्माण होऊ शकते, असे जलसंपदा विभागातील सूत्रांनी सांगितले. दरम्यान धाराशिव येथे आजही पूरस्थिती गंभीर आहे.

माजलगाव तालुक्यातील जवळा येथे १६० मिलीमीटर आणि रामोदा येथे १२० मिलीमीटर एवढी ढगफुटीच्या पावसाची नोंद झाली. पैठण, गंगापूर, भेंडाळा या भागांतही ढगफुटी झाली. परिणामी जायकवाडी धरणातून एक लाख क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आले. बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी सांगितले, ‘मंगळवारी दिवसभर राष्ट्रीय आपत्ती पथक आणि लष्कराच्या जवानांनी ३० जणांना पुराच्या वेढ्यातून बाहेर काढले. सिंदफणा नदीतील पाणी थांबल्याने माजलगाव धरण परिसरातील १२ गावांतील १००० हजाराहून अधिक जणांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.

धाराशिवमध्ये पुन्हा बचावकार्य

धाराशिव जिल्ह्यात मंगळवारीही बचावकार्यासाठी लष्कराची मदत घ्यावी लागली. भूम, परंडा या दोन तालुक्यांसह उमरगा तालुक्यातील काही गावे आणि कळंब तालुक्यातही बचाव पथकाच्या मदतीने नागरिक आणि जनावरांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. परभणी जिल्ह्यातील काही गावांमध्ये पाणी शिरल्याने तेथील नागरिकांनादेखील सुरक्षितस्थळी हलविण्यात आले.

लाखो हेक्टर शेतीचे नुकसान

मराठवाड्यात दोन शाळांसह ३१५ हून अधिक घरांची पडझड झाल्याची नोंद करण्यात आली आहे. १५० हून अधिक जनावरांच्या मृत्यूचीही प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्याचप्रमाणे या भागातील साडेसात हजार गावांपैकी ११४० गावांमध्ये शेतात पाणी शिरल्याने दोन लाख ५५ हजार १४९ शेतकऱ्यांची दोन लाख २२ हजार १६४ हेक्टरावरील पिके बाधित झाली आहेत. या नुकसानीसह तातडीची मदत म्हणून १६०० कोटी रुपयांची मदत प्रशासनाने शासनाकडे मागितली होती. त्यापैकी ७०० कोटी रुपयांची मदत प्राप्त झाली असून ती देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

पश्चिम विदर्भात हातचे पीक गेले

अमरावती : पश्चिम विदर्भातील पाचही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीने थैमान घातले असून बुलढाणा आणि यवतमाळ या दोन जिल्ह्यांना त्याचा सर्वाधिक फटका बसला आहे. त्यात बुलढाणा जिल्ह्यात ३.०३ लाख, तर यवतमाळ जिल्ह्यात ३ लाख हेक्टरवरील पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. या विभागात कापूस आणि सोयाबीनची लागवड सर्वाधिक आहे. त्यातील सोयाबीन शेतातच अंकुरले असून कापूस पीक फुले आणि बोंड धरण्याच्या अवस्थेत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

सोलापुरातही बचावकार्य

पंढरपूर : अहिल्यानगर, धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे सीना कोळेगाव, चांदणी, खासापुरी प्रकल्प तसेच भोगावती नदीमधून सोडण्यात आलेले पाणी सोलापूरमधील सीना नदीत आले. त्यामुळे करमाळा, माढा, मोहोळ, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर येथील जवळपास २९ गावांतील अनेकांचे संसार पुरात वाहून गेले. येथे एनडीआरएफ, लष्कराकडून हेलिकॉप्टर, बोटींसह बचावकार्य सुरू आहे.

उत्तर महाराष्ट्रात संततधार

नाशिक, जळगाव : नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात मंगळवारीही संततधार सुरू राहिली. जळगाव जिल्ह्यात तीन दिवसांत अतिवृष्टीमुळे सुमारे ५७ हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे. तब्बल ३२४ गावांतील ८० हजारांहून अधिक शेतकरी बाधित झाले आहेत. धुळे जिल्ह्यातही पिकांचे नुकसान झाले आहे.

२७ सप्टेंबरपासून पुन्हा मुसळधार

पुणे : बंगालच्या उपसागरात तयार होत असलेले कमी दाबाचे क्षेत्र पश्चिमेकडे सरकण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे २७ ते २९ सप्टेंबर या कालावधीत मराठवाडा, विदर्भातील दक्षिण भागासह मध्य महाराष्ट्र, कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे सध्या राज्यात पाऊस पडतो आहे. मात्र येत्या दोन दिवसांत तो प्रभाव पश्चिमेकडे सरकण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाचे शास्त्रज्ञ एस. डी. सानप यांनी सांगितले.

एसटी सेवेलाही फटका

पुणे : अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर तसेच धाराशिव जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) सेवेवर परिणाम झाला. शेवगाव, जालना (अंबड), करमाळा (संगोबा), धाराशिव (परांडा, कळंब, जामखेड) या प्रमुख राज्य मार्गांवर पाणी साचल्याने मंगळवारी एसटी बसच्या काही फेऱ्या रद्द, तर काही बसचे मार्ग वळविण्यात आले.