Maharashtra News Live Updates 31 May 2022 : राज्यसभा निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये राज्याच्या राजकारणामध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. संभाजीराजे छत्रपतींनी उमेदवारी मागे घेतली असली तरी त्यांच्या उमेदवारीच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये आरोप प्रत्यारोप केला जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शिमल्यामधील गरीब कल्याण रॅलीकडेही देशाचं लक्ष लागून राहिलेलं आहे. सत्तेत आठ वर्षे पूर्ण झाल्यानंतर पंतप्रधान मोदी पहिल्यांच सार्वजनिक मंचावरुन भाष्य करणार आहे. तर दुसरीकडे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थळ असलेल्या चौंडी (ता. जामखेड) येथे मंगळवारी (दि. ३१) होणाऱ्या अहिल्यादेवींच्या जयंती सोहळ्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार प्रदीर्घ काळानंतर उपस्थित राहणार आहेत. त्यांचे नातू व कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी त्यांना निमंत्रित केले आहे. त्याच वेळी शरद पवार यांच्यावर सातत्याने हल्लाबोल चढवणारे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या अहिल्यादेवी जागर यात्रेचा समारोपही जयंतीदिनी चौंडीत होणार आहे. पवार व पडळकर हे विरोधक एकाच ठिकाणी येत असल्याने संघर्ष अटळ ठरण्याची चिन्हे आहेत.

येस बँक आणि दिवाण हाऊसिंग फायनान्स लिमि.च्या (डीएचएफएल) माध्यमातून करण्यात आलेल्या गैरव्यवहाराप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) अटक केलेल्या प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांच्या कोठडीवर विशेष सीबीआय न्यायालय आज निर्णय देणार आहे. करोनासंदर्भातील आकडेवारीही थोडी चिंतेत टाकणारी आहे. सोमवारी राज्यात करोनाचे ४३१ नवे रुग्ण आढळले असून शून्य मृत्यूची नोंद झाली. मुंबईतील दैनंदिन करोना रुग्णसंख्या ३०० च्या पुढे गेली असून सोमवारी ३१८ नवीन रुग्णांची नोंद झाली. रुग्णांना लक्षणे नसली तरी रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे रुग्णवाढीचा दर वाढला असून रुग्ण दुपटीचा कालावधी कमी झाला आहे. हे आणि असे अनेक विषय चर्चेत आहेत.

National Education Policy,
राज्यातील १ लाख ३१ हजार अंगणवाड्यांमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, आता होणार काय?
3 75 lakh applications received for 1800 jail constable posts in maharashtra
कारागृह रक्षकांच्या १८०० जागांसाठी पावणेचार लाख अर्ज
rain, Mumbai, Thane,
Mumbai News : मुंबईकरांनो सावधान! पुढील तीन तास वादळी वाऱ्याचे; पावसाचीही शक्यता
Maharashtrachi Hasyajatra than Hastay Na Hasaylach Pahije Good response from the audience to the new program
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
Maratha reservation implemented in MPSC recruitment Revised advertisement released by increasing 250 seats
‘एमपीएससी’ पदभरतीत मराठा आरक्षण लागू; २५० जागांची वाढ करून सुधारित जाहिरात प्रसिद्ध
history of education marathi article, evolution in education marathi news
शिक्षणक्षेत्रातील उत्क्रांतीचा समृद्ध इतिहास…
ICMR-NIRRCH recruitment 2024 job news
ICMR-NIRRCH recruitment 2024 : राष्ट्रीय प्रजनन आणि बाल आरोग्य संशोधन संस्थेत होणार भरती! माहिती पाहा
World Thalassemia Day 2024
थॅलसिमियावर नियंत्रण आणि त्याचा प्रतिबंधही शक्य आहे…

अशा अनेक महत्वाच्या घडामोडी राज्य, देश, आंतरराष्ट्रीय स्तरावर तसंच इतर क्षेत्रात घडत आहेत. या सर्व घडामोडी तुम्ही आता एकाच ठिकाणी वाचू शकता.

Live Updates

Maharashtra Latest News Updates : राज्य, देश, आंतरराष्ट्रीय स्तरावरील तसंच इतर क्षेत्रातील सर्व घडामोडी जाणून घ्या

21:33 (IST) 31 May 2022
राज्यात दिवसभरात ७११ नवीन करोनाबाधितांची नोंद

राज्यात पुन्हा एकदा करोनाबाधित रूग्ण आढळत आहेत. आज दिवसभरात ७११ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ७८,८७,०८६ एवढी झाली आहे. वाचा सविस्तर माहिती...

19:16 (IST) 31 May 2022
सिद्धू मुसेवाला यांच्यावर मूळ गावी अंत्यसंस्कार

पंजाबमधील प्रसिद्ध गायक आणि काँग्रेस नेते सिद्धू मुसेवाला यांच्यावर मानसा जिल्ह्यातील त्यांच्या मूळ गावी मुसा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मुसेवाला यांचे हजारो चाहते तसेच राजकीय, मनोरंजन क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होत्या. वाचा पूर्ण बातमी

17:55 (IST) 31 May 2022
गौतम अदानी आणि मुकेश अंबानींवर आहे विदेशी कर्जाचा डोंगर; बँक ऑफ बडोदाच्या अहवालातून माहिती उघड

देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपतींच्या यादीत समाविष्ट असलेले मुकेश अंबानी आणि गौतम अदानी हे विदेशी कर्जाच्या ओझ्याखाली दबले आहेत. बँक ऑफ बडोदानं भारतीय कंपन्यांनी घेतलेल्या विदेशी कर्जाचा एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. यामध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेने दिलेल्या आकडेवारीच्या आधारे असं म्हटलं आहे की, भारतीय कंपन्यांनी घेतलेल्या एकूण विदेशी कर्जात अंबानी आणि अदानी यांच्या कंपन्यांचा वाटा २० टक्के इतका आहे. सविस्तर बातमी

17:10 (IST) 31 May 2022
ओला बुकींग, लघुशंका अन् अर्धनग्नावस्थेत सापडलेला मृतदेह; गांजासाठी पैसे हवेत म्हणून प्रवासादरम्यान केली चालकाची हत्या

अडीच हजार रुपयांसाठी ओला चालकाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना ठाण्यामध्ये उघडकीस आलीय. ठाण्यातील शिळ डायघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. ठाण्यातील दिवा परिसरातील खर्डी रोडवर हे हत्याकांड घडलं असून या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात आलीय. येथे वाचा सविस्तर वृत्त

15:42 (IST) 31 May 2022
पत्नीने भाड्याचे गुंड बोलवून महिलेवर करायला लावला बलात्कार

पतीचे विवाहबाह्य संबंध असल्याच्या संशय असल्याने महिलेने पाच गुंडांना महिलेवर सामूहिक बलात्कार करायला लावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हा सर्व प्रकार महिलेने आरोपींना मोबाइलमध्ये रेकॉर्डदेखील करायला सांगितला होता अशी माहिती सायबर पोलिसांनी दिली आहे. हैदराबादमधील कोंडापूर येथील श्रीरामनगर कॉलनीत २६ मे रोजी ही घटना घडली आहे.

सविस्तर बातमी

https://twitter.com/LoksattaLive/status/1531578829755428864

15:14 (IST) 31 May 2022
हवामान विभागाचा मान्सूनबद्दलचा ताजा अंदाज, देशात १०३ टक्के पाऊस आणि महाराष्ट्रात…

नैऋत्य मोसमी पावसाने नुकताच भारतात प्रवेश केला असताना भारतीय हवामानशास्त्र विभागाने मंगळवारी (३१ मे) जून ते सप्टेंबर या कालावधीतील मोसमी पावसाचा अंदाज जाहीर केला. त्यानुसार देशात यंदा सरासरीच्या तुलनेत १०३ टक्के म्हणजे सर्वसामान्य पाऊस पडणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. सविस्तर बातमी

14:59 (IST) 31 May 2022
हार्दिक पटेल भाजपात प्रवेश करणार

गुजरात राज्यातील पाटीदार नेते हार्दिक पटेल यांनी काँग्रेसला रामराम ठोकला. काँग्रेसमधील शीर्ष नेते तसेच गुजरातमधील स्थानिक नेत्यांच्या कारभारावर नाराजी व्यक्त करत हार्दिक पटेल यांनी हा निर्णय घेतला होता. वाचा पूर्ण बातमी

14:59 (IST) 31 May 2022
नागपूर महापालिकेतील ५२ प्रभागांच्या महिला आरक्षणाची सोडत, कुठं कोणत्या पक्षाची अडचण? वाचा…

नागपूर महापालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी सुरेश भट सभागृहात ५२ प्रभागांतील महिलांच्या अनुसूचित जाती, जमाती व सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षणाची सोडत काढली. २०११ च्या लोकसंख्येनुसार प्रभागांमधील अनुसूचित जाती, जमातींची संख्येच्या आधारावर आरक्षण काढण्यात आले. महिलांसाठी ५० टक्के आरक्षण असून यातून अनुसूचित जाती, जमाती व सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षण काढण्यात आले.

सविस्तर बातमीसाठी क्लिक करा...

14:37 (IST) 31 May 2022
केंद्राच्या योजनांमध्ये राज्याचा मोठा वाटा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं विधान!

“योजना केंद्राच्या असोत किंवा राज्यांच्या असोत, त्या सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचण्यासाठी राज्याच्या यंत्रणेचे मोठे योगदान असते. हे प्रयत्न पक्षभेद विसरून आणि राजकारणविरहित झाले पाहिजेत. मला आनंद व समाधान आहे की, या योजना राज्य, जिल्हा, तालुका पातळीवर प्रशासकीय यंत्रणेने नियोजनपूर्वक लाभार्थींपर्यंत यशस्वीरित्या पोहचविल्या.”, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. वाचा सविस्तर बातमी...

14:34 (IST) 31 May 2022
सरकारी तंत्राचा वापर करून आहिल्यादेवींची जयंती हायजॅक करण्याचा प्रयत्न – फडणवीसांचा आरोप!

“आहिल्यादेवी होळकर यांची जयंती चौंडीला नेहमी कुठलाही पक्ष अभिनिवेश न ठेवता साजरी केली जाते. सर्व प्रकारचे लोक त्या ठिकाणी येतात. पण मला असं वाटतं की यावेळी सरकारी तंत्राचा उपयोग करून, या ठिकाणी पुण्यश्लोक राजमाता आहिल्यादेवी होळकर यांची पुण्यतिथी हायजॅक करण्याचा प्रयत्न हा झालेला आहे. हे अत्यंत चुकीचं आहे.” असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. वाचा सविस्तर...

14:12 (IST) 31 May 2022
पुणे महापालिका निवडणुकीसाठी प्रभागनिहाय आरक्षण सोडत जाहीर

राज्य निवडणूक आयोगाने १४ महापालिकांना प्रभागनिहाय आरक्षण सोडत जाहीर करण्याचे आदेश दिले होते. या आदेशाअंतर्गत पुणे महापालिकेसाठी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे. पुणे महापालिकेतील 58 प्रभागातील 173 जागांसाठी ही आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे. वाचा पूर्ण बातमी

14:10 (IST) 31 May 2022
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर

राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील १४ महापालिकांना प्रभागनिहाय आरक्षण सोडत जाहीर करण्याचे आदेश दिले होते. या आदेशाअंतर्गत आज मुंबई महापालिकेसाठी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे. या सोडतीनुसार बेस्टचे माजी अध्यक्ष आशिष चेंबुरकर यांचा वॉर्ड अनुसूचित जातीसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. वाचा पूर्ण बातमी

14:08 (IST) 31 May 2022
"२०१४ च्या तुलनेत आता देशाच्या सीमा अधिक सुरक्षित" - पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिमला येथील रॅलीला संबोधित करताना भारतीय सीमारेषेबाबत मोठं विधान केलं आहे. २०१४ च्या तुलनेत आता भारतीय सीमारेषा अधिक सुरक्षित असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं आहे. त्यांनी पुढे म्हटलं की, "मी देशाचा पंतप्रधान नसून देशातील जनतेचा प्रधान "सेवक" आहे. आणि यावर माझा ठाम विश्वास आहे." यावेळी त्यांनी भाजपा सरकारला आठ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित केलेल्या ‘गरीब कल्याण संमेलन’मध्ये विविध सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांशी देखील संवाद साधला. सविस्तर बातमी

14:07 (IST) 31 May 2022
पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी १७३ जागांची आरक्षण सोडत जाहीर

सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाशिवायच निवडणुका घेण्याचे आदेश दिल्याने मंगळवारी राज्यातील महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी ओबीसी वगळता अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षणाची सोडत काढण्यात आली आहे. त्यामुळे कोणता वॉर्ड आरक्षित होतो, याकडे इच्छुकांचे लक्ष लागले होते. मुंबईसह पुण्यात महापालिकेच्या जागांसाठी आरक्षण सोडत जाहीर झाली. वाचा सविस्तर...

13:57 (IST) 31 May 2022
सकाळ, दुपार, संध्याकाळ पत्नी जेवण न करता केवळ मॅगीच खायला देते म्हणून पतीचा घटस्फोटासाठी अर्ज; घटस्फोटही मिळाला

जेवण करण्याचा कंटाळा आलाय किंवा तेच तेच पदार्थ नको म्हणून आपल्यापैकी अनेकांनी कधी ना कधी मॅगीवर एखाद्या दिवशीचं रात्रीचं किंवा दुपारचं जेवण नक्कीच केलं असणार. मात्र याच मॅगीमुळे आयुष्य बदलून टाकणाऱ्या एका निर्णयापर्यंत एक जोडपं पोहचलंय असं सांगितलं तर तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. एका व्यक्तीने त्याची पत्नी त्याला दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणात रोज मॅगीच खायला देते म्हणून चक्क घटस्फोटाचा अर्ज केला आणि नंतर तो मंजूरही झाला. तुम्हाला हे वाचून गंमत वाटली असेल मात्र खरोखर असा प्रकार घडलाय कर्नाटकमध्ये!

https://twitter.com/LoksattaLive/status/1531550391250612224

येथे वाचा सविस्तर वृत्त

13:53 (IST) 31 May 2022
चंद्रपूर : शेतात जात असताना दबा धरून बसलेल्या वाघाचा हल्ला, हत्याराविना लढताना मजुराचा मृत्यू

शेतात काम करण्यासाठी गेलेल्या शेतमजुरावर काटवन येथील कक्ष क्रमांक ७५६ मधील नाल्याजवळ वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना मंगळवारी (३१ मे) सकाळी आठ वाजताच्या दरम्यान घडली. रामभाऊ कारु मरापे (४३) असे मृत्यू झालेल्या शेतमजुराचं नाव आहे. या घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या चमुने घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.

सविस्तर बातमीसाठी क्लिक करा...

13:52 (IST) 31 May 2022
"... म्हणून नाना भाऊंनी काँग्रेसच्या नेत्यांना कव्वाली, शायरी आणि मुशायरे करणं शिकवावं"; आशिष देशमुख यांचा घणाघात

काँग्रेसचे प्रदेश महासचिव आशिष देशमुख यांनी काँग्रेसच्या राज्यसभा यादीवर तीव्र आक्षेप घेतलाय. यात उत्तर प्रदेशमधून इम्रान खान उर्फ प्रतापगडी, पी. चिदंबरम आणि प्रमोद तिवारी यांच्या उमेदवारीवर त्यांनी विशेष आक्षेप घेतले. यावरूनच त्यांनी काँग्रेसचे महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांचं नाव घेत काँग्रेस नेत्यांना कव्वाली, शायरी, मुशायरे शिकवावेत, अशी घणाघाती टीका केली.

सविस्तर बातमीसाठी क्लिक करा...

13:51 (IST) 31 May 2022
काँग्रेसमधील नाराजी चव्हाट्यावर! आशिष देशमुख राजीनामा देणार; कारण सांगताना म्हणाले...

काँग्रेसचे प्रदेश महासचिव आशिष देशमुख यांनी उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीत डिपॉझिट जप्त झालेल्या इम्रान खान उर्फ प्रतापगडी यांना काँग्रेसने महाराष्ट्रातून राज्यसभेची उमेदवारी दिल्याबद्दल नाराज व्यक्त केली. तसेच माजी आमदार डॉ. अशिष देशमुख यांनी आपल्या काँग्रेस प्रदेश महासचिव पदाचा राजीनामा देण्याचं जाहीर केलं.

सविस्तर बातमीसाठी क्लिक करा...

13:50 (IST) 31 May 2022
“एका कुटुंबातून एकाच सदस्याला उमेदवारीच्या ठरावाचं काय झालं?”; चिदंबरम यांच्यावरून काँग्रेसमध्ये धुसफूस

माजी आमदार व काँग्रेस नेते डॉ. आशिष देशमुख यांनी उत्तर प्रदेशचे नेते इम्रान प्रतापगडी यांना महाराष्ट्रातून राज्यसभेवर काँग्रेसने उमेदवारी दिल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे आणि महाराष्ट्रातील कर्तबगार नेत्यांवर अन्याय झाल्याची भावना व्यक्त केली आहे.

सविस्तर बातमीसाठी क्लिक करा...

13:48 (IST) 31 May 2022
कल्याण : महागड्या दुचाक्या चोरून हौस मौज करणं आलं अंगलट, बाईक चोर गॅरेज मॅकेनिक गजाआड

महागड्या बाईक चोरून हौस मौज करणे एका गॅरेज मॅकेनिकला चांगलेच महागात पडले आहे. बुलेट चोरी प्रकरणी डोंबिवली पोलिसांनी या गॅरेज मॅकेनिकला अटक केली आहे. राज तावडे असं या चोरट्याचं नाव आहे. त्याच्याकडून चोरी केलेल्या पाच दुचाक्या पोलिसांनी हस्तगत केल्या असून चार गुन्ह्यांची उकल झाली आहे.

सविस्तर बातमीसाठी क्लिक करा...

13:30 (IST) 31 May 2022
मद्यप्राशन करून दंगा केल्याने चौकशीसाठी आणलेल्या तरुणाचा पोलीस ठाण्यात आत्महत्येचा प्रयत्न

मद्यप्राशन करून दंगा केल्याने चौकशीसाठी आणलेल्या तरुणाने पोलीस ठाण्यात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पलूस पोलीस ठाण्यात ही घटना घडली.पोलिसांच्या मदतीसाठी मोफत असणाऱ्या ११२ नंबरवर सातत्याने अतुल शंकर भोसले हा फोन करत होता. मला ठाण्यात नेण्यासाठी गाडी पाठवा असे तो मोफत सुविधा असलेल्या नंबरवर सांगत होता. पोलिसांनी त्याला ठाण्यात बोलावले व विचारणा केली असता त्यांने पलायन केले. परत पकडून आणले असता अंगावरील शर्टने गळफास लाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यापासून परावृत्त करून कोठडीत ठेवले. तेथेही लोखंडी ग्रीलवर डोके आपटून आत्महत्येचा प्रयत्न केला. यामध्ये तो जखमी झाला असून रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

13:24 (IST) 31 May 2022
“रोहित पवार आणि त्यांच्या आजोबांनी कायदा लिहिलाय का?

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थळ असलेल्या चौंडी येथे अहिल्यादेवींच्या जयंती सोहळ्या निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार प्रदीर्घ काळानंतर उपस्थित राहत आहेत. कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी त्यांना निमंत्रित केलं आहे. दरमयान यावेळी भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या अहिल्यादेवी जागर यात्रेचा समारोपही चौंडीत होणार आहे. मात्र पोलिसांनी गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांना रोखलं असून यामुळे रस्त्यावरच समर्थक आणि पोलिसांमध्ये संघर्ष निर्माण झाला आहे.

सविस्तर बातमी

https://twitter.com/LoksattaLive/status/1531538160626176000

13:00 (IST) 31 May 2022
राज ठाकरे लीलावती रुग्णालयात दाखल; उद्या शस्त्रक्रिया होणार

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे मागील काही काळापासून पायाच्या आजाराने त्रस्त आहेत. त्यांनी स्वत:च पुण्यातील सभेतून याबाबत माहिती दिली होती. तसेच लवकरच पायाची शस्त्रक्रिया करणार असल्याचंही राज ठाकरे म्हणाले होते. आता ते शस्त्रक्रिया करण्यासाठी मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल झाले आहेत. सविस्तर बातमी

12:59 (IST) 31 May 2022
जम्मू काश्मीरमध्ये आणखी एक दहशतवादी हल्ला, महिला शिक्षिकेची गोळ्या घालून हत्या

जम्मू काश्मीरमध्ये मागील काही दिवसांपासून सामान्य नागरिकांवर होणाऱ्या हल्ल्यात वाढ झाली आहे. १२ मे रोजी बडगाम जिल्ह्यात महसूल विभागाचे कर्मचारी राहुल भट यांची अतिरेक्यांनी गोळी घालून हत्या केली होती. त्यानंतर गेल्या आठवड्यात, बडगामच्या चदूरा भागात लष्कर-ए-तैयबाच्या दहशतवाद्यानं अंदाधुंद गोळीबार करत टीव्ही कलाकार अमरीन भटचा खून केला होता. या घटना ताज्या असताना आता जम्मू काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात आणखी एक दहशतवादी हल्ल्याची घटना समोर आली आहे. सविस्तर बातमी

12:57 (IST) 31 May 2022
Photos: सलमान खानच्या फार्म हाऊसजवळ पनवेल पोलीस आणि स्थानिक ग्रामपंचायतीची संयुक्त कारवाई

पनवेल तालुका पोलीस स्थानकाच्या हद्दीमध्ये येणाऱ्या मौजे वाजे गावातील येथील सलमान खानच्या ‘अर्पिता फार्म’ शेजारी पोलिसांनी मोठी कारवाई केलीय. येथे क्लिक करुन जाणून घ्या नेमकं घडलंय तरी काय...

https://twitter.com/LoksattaLive/status/1531524465859129345

12:31 (IST) 31 May 2022
“उद्धव ठाकरे हे पुढचे…”; सुप्रिया सुळेंनी राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होण्याबद्दल विधान केल्यानंतर गृहमंत्र्यांची प्रतिक्रिया

राज्यातील महाविकास आघाडी सरकारने नुकतेच सत्तेचे अडीच वर्षे पूर्ण केले आहेत. मात्र अद्यापही तिन्ही पक्षांपमध्ये धुसफूस कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. असे असले तरी तिन्ही पक्षातील वरिष्ठ नेते सर्व काही ठिक असल्याचे कायम सांगत आले आहेत. अशात आता मुख्यमंत्री पदाबाबत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी एक विधान केले आहे. यावरुन आता महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी भाष्य केले आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.

12:22 (IST) 31 May 2022
Gyanvapi Row: नंदीपासून ८३ फुटांवर ‘शिवलिंग’; भिंतींवर त्रिशूल आणि हत्तीचं चिन्हं

उत्तर प्रदेशातील वाराणसीमधील ज्ञानवापीमध्ये कोर्टाच्या आदेशानुसार १४ मे ते १६ मे दरम्यान करण्यात आलेल्या सर्व्हेचे व्हिडीओ सोमवारी (३० मे) हिंदू आणि मुस्लिम पक्षकारांना सोपवण्यात आले. दरम्यान या सीडीमधील काही व्हिडीओ लीक झाल्याचा आरोप हिंदू पक्षकारांनी केला आहे. याप्रकरणी मंगळवारी कोर्टाकडे तक्रार दाखल करणार असल्याचंही ते म्हणाले आहेत. या व्हिडीओंमध्ये शिवलिंग, त्रिशूल अशी चिन्हं दिसल्याचा दावा करण्यात येत आहे.

सविस्तर बातमी

https://twitter.com/LoksattaLive/status/1531527588245426176

11:11 (IST) 31 May 2022
Garib Kalyan Sammelan: मोदींच्या रॅलीत वाहतूककोंडी टाळण्यासाठी शिमल्यातील शाळांना सुट्टी; शहराची झाली पोलीस छावणी

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शिमल्यामध्ये 'गरीब कल्याण संमेलना'त सहभागी होणार आहेत. मोदी सरकारला आठ वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर ही सभा आयोजित करण्यात आली असून मोदी यावेळेस सरकारी योजनांचा लाभ घेणाऱ्यांशी थेट संवाद साधणार आहेत. मात्र मोदींच्या यासभेसाठी शिमल्यामधील शाळाही बंद ठेवण्यात आल्याची माहिती समोर आलीय. येथे वाचा सविस्तर वृत्त

11:09 (IST) 31 May 2022
गेल्या २४ तासांत साताऱ्यासह बीडमध्ये पूर्व मोसमी पावसाची हजेरी, आज 'या' जिल्ह्यांत कोसळणार सरी

महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली आहे. गेल्या २४ तासांत सातारा आणि बीड जिल्ह्यात काही ठिकाणी विजांच्या गडगडाटासह पावसाने हजेरी लावली आहे. इतरही काही जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मान्सून पूर्व सरी कोसळल्या आहेत. आज दक्षिण महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांना हवामान खात्याने पिवळा इशारा दिला आहे. सविस्तर बातमी

10:56 (IST) 31 May 2022
“…तर मी तुला लगेच १० हजार रुपये देईन”; भर बैठकीत ममता बॅनर्जींची कार्यकर्त्याला ऑफर

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी वजन वाढलेल्या आपल्या तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. बैठकीत सहभागी झालेल्या या कार्यकर्त्यामधील आणि ममता बॅनर्जींमधील संवादाचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला असून चांगलाच चर्चेत आहे. कार्यकर्ता बोलत असताना ममता बॅनर्जी यांनी त्यांना थांबवत, “ज्याप्रकारे तुमचं पोट वाढत चाललं आहे ते पाहता कधीही खाली कोसळू शकता, तुम्हाला बरं वाटत नाहीये का?,”अशी विचारणा केली.

सविस्तर बातमी

https://twitter.com/LoksattaLive/status/1531497593762590721

10:50 (IST) 31 May 2022
उद्धव ठाकरे २५ वर्ष मुख्यमंत्री राहतील - संजय राऊत

राज्यात महाविकास आघाडी सरकारला अडीच वर्ष पूर्ण झाली आहेत. समान किमान कार्यक्रमाच्या आधारे महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं आणि उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करण्यात आलं. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुढील मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचा होऊ दे असं साकडं घातलं आहे. यावर शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरे २५ वर्ष मुख्यमंत्री राहतील असं संजय राऊत म्हणाले आहेत.

सविस्तर बातमी

https://twitter.com/LoksattaLive/status/1531503403712491521

10:47 (IST) 31 May 2022
“हा राजकीय कार्यक्रम नाही, कुणीही...”; अहिल्यादेवींच्या जयंती सोहळ्यानिमित्त विरोधकांना इशारा

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थळ असलेल्या चौंडी येथे मंगळवारी अहिल्यादेवींच्या जयंती सोहळ्या निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार प्रदीर्घ काळानंतर उपस्थित राहणार आहेत. कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी त्यांना निमंत्रित केले आहे. त्याच वेळी भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या अहिल्यादेवी जागर यात्रेचा समारोपही जयंतीदिनी चौंडीत होणार आहे. पवार व पडळकर हे विरोधक एकाच ठिकाणी येत असल्याने संघर्ष अटळ ठरण्याची चिन्हे आहेत. याबाबात बोलताना रोहित पवार यांनी हा राजकीय कार्यक्रम नाही असे म्हटले आहे.

10:34 (IST) 31 May 2022
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होण्याआधी आमचं घर नव्हतं, आम्ही हवेत रहायचो : नितेश राणे

कोल्हापूरमध्ये घेतलेल्या पत्रकारपरिषदेत नितेश राणेंना मुंबईतील जुहूमधील घरासंदर्भातील नोटीशींबद्दल प्रश्न विचारण्यात आला त्यावर उत्तर देताना, "सगळ्याच नियमांचं उल्लंघन आम्ही उद्धव ठाकरेजी मुख्यमंत्री बनल्यानंतरच केलेलं आहे," असं उत्तर दिलं. येथे वाचा सविस्तर वृत्त

10:32 (IST) 31 May 2022
२५ वर्षानंतर सुप्रिया सुळेंचा मुख्यमंत्री पदी नंबर लागावा हीच ईश्वराकडे आमची प्रार्थना - अब्दुल सत्तार

राज्यातील महाविकास आघाडी सरकारने नुकतेच सत्तेचे अडीच वर्षे पूर्ण केले आहेत. मात्र अद्यापही तिन्ही पक्षांपमध्ये धुसफूस कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. असे असले तरी तिन्ही पक्षातील वरिष्ठ नेते सर्व काही ठिक असल्याचे कायम सांगत आले आहेत. अशात आता मुख्यमंत्री पदाबाबत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी एक विधान केले आहे. यावरुन आता शिवसेनेचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

10:31 (IST) 31 May 2022
क्रूझ ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानला क्लीन चिट मिळाल्यानंतर समीर वानखेडेंची बदली

क्रूझ ड्रग्ज प्रकरणात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला अटक करणारे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे अधिकारी समीर वानखेडे यांची चेन्नईला बदली करण्यात आली आहे. आदेशानुसार, समीन वानखेडे यांची डायरेक्टरेट जनरल ऑफ अॅनालिटिक्स अँड रिस्क मॅनेजमेंट (डीजीआरएम) मुंबई येथून चेन्नईचे करदाता सेवा महासंचालनालय येथे बदली करण्यात आली आहे.

10:15 (IST) 31 May 2022
“तुम्हाला घरात घुसून मारु,” भाजपा नेत्यांच्या इशाऱ्यावर दिपाली सय्यद यांनी दिलं उत्तर

अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या दिपाली सय्यद पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेल्या टीकेमुळे सध्या चांगल्याच चर्चेत आहेत. दिपाली सय्यद यांनी मोदींवर आक्षेपार्ह टीका केल्यानंतर भाजपा नेत्या उमा खापरे यांनी त्यांना इशारा दिला असून घरात घुसून बदडून काढू असं म्हटलं आहे. त्यानंतर दिपाली सय्यद यांनीही टीव्ही ९ शी बोलताना त्यांना प्रत्युत्तर दिलं असून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाला काही किंमत नाही का? अशी विचारणा केली आहे. तसंच माझ्या घरी येऊन दाखवा असं प्रतीआव्हानही दिलं आहे.

सविस्तर बातमी

https://twitter.com/LoksattaLive/status/1531470757514989568

10:14 (IST) 31 May 2022
विभास साठे यांचा मनसुख हिरेन होऊ नये - किरीट सोमय्या

Anil Parab ED Raid: शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्याशी संबंधित सात ठिकाणांवर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) २७ मे रोजी छापेमारी केली. ईडीने मुंबईसह पुणे आणि रत्नागिरी अशा एकूण सात ठिकाणी छापे टाकले होते. अनिल परब यांना दापोलीमधील जमीन विकणाऱ्या विभास साठेंच्या कोथरुडमधील घरावरही छापा टाकण्यात आला होता. विभास साठे यांच्या कोथरुडमधील कार्यालयात छापेमारी करण्यात आली होती. दरम्यान भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी विभास साठेंचा मनसुख हिरेन होऊ शकतो अशी भीती व्यक्त केली आहे.

सविस्तर बातमी

https://twitter.com/LoksattaLive/status/1531482108547387392

10:09 (IST) 31 May 2022
Jammu-Kashmir Encounter: अवंतीपोरात सुरक्षा दलासोबत झालेल्या चकमकीत २ दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोरा येथे झालेल्या चकमकीत भारतीय सुरक्षा दलांना मोठं यश आलं आहे. मंगळवारी सकाळी अवंतीपोरा परिसरात झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांना ठार केलं आहे. यानंतर सुरक्षा दलाने दहशतवाद्यांकडून दोन एके-४७ रायफलसह काही संवेदनशील साहित्य जप्त केलं आहे. ठार झालेल्या दोन दहशतवाद्यांपैकी एकाचा दोन काश्मिरींच्या हत्येत सहभाग होता. सविस्तर बातमी

10:08 (IST) 31 May 2022
World No Tabaco Day: सिगारेट सोडल्याने एवढे पैसे वाचले की त्यामधून साकारलं मोठ्या घराचं स्वप्न; केरळच्या आजोबांची गोष्ट

तंबाखू तसेच धुम्रपान सोडल्याने केवळ आरोग्यविषय फायदा होतो असं नाही तर त्यामधून त्या व्यसनांवर खर्च होणारा पैसाही मोठ्याप्रमाणात वाचतो. अशाचप्रकारे धुम्रपान सोडल्याने केरळमधील एका व्यक्तीला एवढा आर्थिक फायदा आणि बचत झाली की त्याने सिगारेटवर खर्च होणाऱ्या पैशांमधून चक्क मोठ्या घर बांधण्याचं आपलं अनेक वर्षांचं स्वप्न पूर्ण केलं आहे. येथे वाचा सविस्तर वृत्त

10:07 (IST) 31 May 2022
संजय राऊत – छत्रपती शाहू महाराज भेटीबद्दल बोलताना नितेश राणेंचा तोल सुटला; म्हणाले, “शाहू महाराजांचं मी खरंच…”

संभाजीराजे छत्रपती यांना शिवसेनेकडून राज्यसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी देण्याच्या मुद्द्यावरुन राज्यातील राजकारण आरोप प्रत्यारोपांमुळे तापलेलं असतानाच रविवारी शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी कोल्हापूरचा दौरा केला. या दौऱ्यादरम्यान त्यांनी श्रीमंत शाहू महाराज यांची भेट घेऊन या विषयावर चर्चा केली. त्यानंतर राऊत यांनी पत्रकार परिषदेमध्ये आपली भूमिका स्पष्ट करतानाच विरोधकांवर निशाणा साधला. मात्र या साऱ्या घटनाक्रमावर भाष्य करताना भाजपाचे आमदार नितेश राणे यांचा तोल सुटला आहे. येथे वाचा सविस्तर वृत्त

10:06 (IST) 31 May 2022
“राज आणि उद्धव ठाकरेंमध्ये संजय राऊतांनी आग लागवली; आता त्यांची मजल छत्रपतींच्या घरापर्यंत गेलीय”

"संजय राऊतांचा घर फोडण्याचा इतिहास आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंमध्ये भांडणं लावण्यात ज्या काही व्यक्ती पुढे होत्या त्यात संजय राऊतांचा समावेश होता. आता त्यांची मजल छत्रपतींचं घर फोडण्यापर्यंत गेलीय," अशी गंभीर टीका भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी सोमवारी सायंकाळी कोल्हापूरमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली. संभाजीराजे छत्रपती यांना शिवसेनेकडून राज्यसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी देण्याच्या मुद्द्यावरुन राज्यातील राजकारण आरोप प्रत्यारोपांमुळे तापलेलं असतानाच याच मुद्द्यावरुन नितेश राणेंनी थेट श्रीमंत शाहू महाराज यांची भेट घेणार संजय राऊतांवर निशाणा साधलाय. येथे वाचा सविस्तर वृत्त

10:06 (IST) 31 May 2022
“बँकांपुढील रांगांमध्ये तासनतास उभे राहावे लागल्याने ज्यांना…”; नोटाबंदीने काय साध्य झाले? असं विचारत शिवसेनेची मोदींवर टीका

देशभरात बनावट नोटांचा सुळसुळाट सुरू असून, बँकिंग प्रणालीतून पकडण्यात आलेल्या बनावट नोटामध्ये मागील वर्षभरात झालेल्या वाढीतून हे स्पष्ट होत आहे. रिझव्‍‌र्ह बँकेने प्रसिद्ध केलेल्या वार्षिक अहवालात, सर्वाधिक पकडल्या गेलेल्या बनावट नोटा या ५०० आणि २,००० रुपये अशा सर्वोच्च मूल्यातील असून, मागील वर्षभरात त्यांचे प्रमाण अनुक्रमे १०१.९३ टक्के आणि ५४ टक्के असे वाढले आहे. याच मुद्द्यावरुन आता शिवसेनेनं सत्ताधारी भाजपा सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नोटबंदीच्या निर्णयावर निशाणा साधलाय. येथे वाचा सविस्तर वृत्त नेमकं शिवसेनेनं काय म्हटलंय...

अनेक महत्वाच्या घडामोडी राज्य, देश, आंतरराष्ट्रीय स्तरावर तसंच इतर क्षेत्रात घडत आहेत. या सर्व घडामोडी तुम्ही आता एकाच ठिकाणी वाचू शकता.