Today’s Latest News Updates : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी युती करण्याचा निर्णय जाहीर केला. त्यावरून महाराष्ट्रातील राजकारणात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पदमुक्त होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्र पाठवून इच्छा व्यक्त केली आहे. यावरही राजकीय विधान करण्यात येत आहेत.
तर, दुसरीकडे काँग्रेस नेते राहुल गांधी यांची ‘भारत जोडो’ यात्रेने आज ( २४ जानेवारी ) जम्मू-काश्मीरमधील नागरोटा येथून आपला प्रवास सुरु केला आहे. ही यात्रा रात्री डोमेल चौक येथे जाऊन थांबणार आहे. यासह देश, विदेश आणि महाराष्ट्रातील घडामोडी जाणून घ्या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून…
Maharashtra Live Updates : देश, विदेश, राजकीय, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडी एका क्लिकवर….
कल्याण – कल्याण, डोंबिवली, भिवंडी परिसरातून १३ बुलेट, मोटार सायकली चोरणाऱ्या एका सराईत १९ वर्षांच्या चोरट्याला कल्याण गुन्हे शाखेच्या तपास पथकाने भिवंडीजवळील राजनोली गावातील एका चाळीतून सोमवारी अटक केली. त्याच्या ताब्यातून १६ लाख रुपये किमतीच्या एकूण १२ दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत.
शिवसेना ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीची २४ जानेवारीला मुंबईत अधिकृत घोषणा झाली. यामुळे भविष्यात वंचित महाविकास आघाडीत सहभागी होणार काय, अशी चर्चा सुरू असतानाच बुलढाण्यात मात्र वंचित आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जुंपल्याचे चित्र पहायला मिळत आहे. अमरावती पदवीधर मतदारसंघातील वंचितच्या उमेदवाराने राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याविरुद्ध थेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
दौंड तालुक्यातील पारगाव येथे भीमा नदीपात्रात एकाच कुटुंबातील सात जणांचे मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. मुलाने विवाहासाठी एका महिलेला पळवून नेल्याच्या कारणावरून पित्याने कुटुंबासह आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. संबंधित कुटुंब मूळचे बीड जिल्ह्यातील आहे. मृतांमध्ये दोन पुरुष, दोन महिला आणि तीन लहान मुलांचा समावेश आहे.
श्री गणेश जयंतीनिमित्त मध्यभागातील वाहतूक व्यवस्थेत बुधवारी (२५ जानेवारी) वाहतूक बदल करण्यात येणार आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची होणारी गर्दी विचारात घेऊन शिवाजी रस्ता वाहतुकीस बंद करण्यात येणार आहे.
जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष म्हणून मिरवणाऱ्या भाजपला नाशिक विभागीय पदवीधर मतदारसंघात उमेदवार न मिळणे ही शोकांतिका आहे. या मतदारसंघात त्यांचे संघटन नाही का, पक्षाचे नाक का कापले गेले, त्यांना उमेदवार का मिळाला नाही, याची उत्तरे भाजपने द्यावीत, असे आव्हान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिले.
संसदीय अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ३० जानेवारीला सर्वपक्षीय बैठक बोलण्यात येण्याची शक्यता आहे.
नंदुरबार – उमेदवारी अर्जावरून आणि त्यानंतर झालेले राजकारण आमच्या परिवाराला अडचणीत आणण्यासाठीच झाले असल्याचा आरोप नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीतील उमेदवार सत्यजीत तांबे यांनी केला आहे. या विषयावर वेळ आल्यावर आपण बोलणारच आहोत, असेही त्यांनी सांगितले.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक श्याम मानव यांनी जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर आता बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांनाही फोनवरून जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. या प्रकरणी छतरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून धीरेंद्र शास्त्री यांच्याही सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
एका वर्षात जिल्ह्यातील तब्बल २४१ अल्पवयीन मुलांचे अपहरण झाले. त्यात २०२ मुलींचा, तर ३९ मुलांचा समावेश आहे. २११ मुलांना शोधण्यात पोलिसांना यश आले असले, तरी अद्याप २६ मुली आणि दोन मुलांचा शोध लागलेला नाही.
ठाणे महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी गटनेते नजीब मुल्ला यांच्या वाढदिवसानिमित्ताने बाळासाहेबांच्या शिवसेनेने राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला असतानाच, त्यापाठोपाठ आता ठाणे शहरातील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक हणमंत जगदाळे यांना बाळासाहेबांच्या शिवसेनेने गळा लावल्याची चर्चा सुरू झाली आहे.
पत्राचाळ पुनर्विकासातील आर्थिक गैरव्यवहाराप्रकारणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि आरोपींविरुद्ध खटला सुरू करण्यासाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण न केल्याने विशेष न्यायालयाने अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) मंगळवारी फटकारले.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यात 'मातोश्री' निवासस्थानी रात्री ९ वाजता बैठक होणार आहे.
मुंबई : माजी काँग्रेस नेते आणि नाशिक पदवीधर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांचा दोन-चार दिवसांत भाजपमध्ये प्रवेश होणार आहे. राज्यातील नेत्यांनी केंद्रीय नेतृत्वाला त्याबाबत विनंती केली असून लवकरच हा पक्षप्रवेश होईल, असे ज्येष्ठ भाजप नेत्याने सांगितले.
निरनिराळ्या क्लृप्त्या लढवून विदेशातून चलन, सोने, हिरे आणि मौल्यवान वस्तू भारतात आणण्याचे प्रकार सुरूच आहेत. सीमा शुल्क विभागाने मुंबई विमानतळावर कारवाई करून दोन पुस्तकांमध्ये दडविलेले ९० हजार यूएस डॉलर (७३ लाख रुपये), तसेच, अंतवस्त्रात दडवून आणलेली २.५ किलो सोन्याची पावडर जप्त केली.
देशाच्या उत्तरेच्या टोकावर सुरू असलेल्या हिमवर्षावात वाढ झाली असून उत्तर भारतात थंडीचा जोर वाढला आहे. तसेच, हिमवर्षावामुळे उत्तरेकडून दक्षिणेकडे शीत वारे आणखी वेगाने वाहू लागले आहेत. परिणामी, शीत वाऱ्यांच्या प्रभावामुळे राज्यभरातील बहुतांश ठिकाणी कडाक्याची थंडी पडली आहे. मुंबईतील किमान तापमान पुन्हा एकदा घसरले असून, मंगळवारी ते १४.८ अंश तापमान नोंदवले गेले.
नागपूर : अश्लील गाणे गायल्याचा आरोप करीत प्रसिद्ध गायक व रॅपर बादशाह उर्फ आदित्य प्रतीकसिंह सिसोदियाविरुद्ध तक्रार करण्यात आली होती. हे प्रकरण न्यायालयात सुरू असताना बादशाहने एकदाही हजेरी लावली नाही. आता त्याला उत्तर देण्याची अंतिम संधी प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी एस. एस. जाधव यांनी दिली आहे. अन्यथा, त्याची बाजू न ऐकताच निकाल दिला जाईल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
हळदी कुंकवाचा कार्यक्रम आटोपून घरी परतणाऱ्या एका शिक्षिकेचे मंगळसुत्र दोन दुचाकीस्वार चोरट्यांनी लांबवले आहे. बदलापूर पूर्वेतील छत्रपती शिवाजी चौक ते महात्मा गांधी चौक रस्त्यावर हा प्रकार समोर आला. यावेळी त्यांना अडवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना गाडीने उडवून देण्याची धमकीही चोरांनी दिली.
डोंबिवली, कल्याणमध्ये बेकायदा इमारती बांधणारे बांधकामधारक आवश्यक शुल्क भरुन महावितरणकडून तात्पुरता वीज पुरवठा बांधकामाच्या ठिकाणी घेतात. एक वर्षासाठी किंवा बांधकाम पूर्ण होईपर्यंत हा वीज पुरवठा महावितरणकडून सुरळीत ठेवला जातो.
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण 'एबीपी माझा'च्या 'माझा महाराष्ट्र, माझा व्हिजन'मध्ये बोलत होते.
पूर्व उपनगरातील राजावाडी रुग्णालयामधील शवविच्छेदन केंद्राची व शवागराची दुरुस्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई उपनगर खनिज फाऊंडेशनच्या निधीतून दुरुस्तीची ही कामे करण्यात येणार आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेत मृत्यूची संख्या वाढल्यामुळे शवागारावर ताण वाढला होता.
शेकोटी करीत बसलेल्या तरुणांनी ‘कहा के हो?’ असे विचारल्याने एका व्यावसायिकाने त्यांच्यावर गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार कल्याणी नगरमध्ये सोमवारी रात्री घडला. याप्रकरणी पोलिसांनी परस्परविरोधी गुन्हे दाखल केले आहेत.
सातारा येथील एका व्यवसायिकाची महामार्गावर वाढे गावच्या हद्दीत एका हॉटेल परिसरात मध्यरात्री अज्ञातांनी गोळी झाडून एकाची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अमित बाबासाहेब भोसले असे गोळी झाडून हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
छोट्या पडद्यावरील अभिनेत्री तुनिषा शर्मा हिला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याच्या आरोपाप्रकरणी अटकेत असलेला अभिनेका शिझान खान याने जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. नातेसंबंध जोडणे आणि नंतर काही कारणास्तव हे नाते तुटणे हे जीवनाचे सर्वसाधारण पैलू आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 'एबीपी माझा'च्या 'माझा महाराष्ट्र, माझा व्हिजन' कार्यक्रमात बोलत होते.
डोंबिवली एमआयडीसी निवासी, औद्योगिक विभागात रस्ते काँक्रिटीकरणाची कामे सुरू आहेत. इमारती, रुग्णालये, कंपन्यांच्या चारही बाजुने ही कामे सुरू असल्याने सकाळपासून ते संध्याकाळी उशिरापर्यंत धुळीचे लोट परिसरात पसरत असल्याने या भागातील रहिवासी, उद्योजक, शाळा चालक, रुग्णालय चालक हैराण आहेत.
आगामी निवडणुकीच्या तयारीचा एक भाग म्हणून काँग्रेसने शहरात ‘हाथ से हाथ जोडो’ अभियानाला नागपुरात सुरुवात केली. मुख्य कार्यक्रम देवडिया काँग्रेस भवन येथील शहर काँग्रेसच्या कार्यालयात झाला तर शहरातील सहा विधानसभा मतदारसंघातही अभियानाचा प्रारंभ पक्षाचा ध्वज फडकावून करण्यात आला.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवर राज्यपाल व कुलपती भगतसिंग कोश्यारी यांनी समय बनसोड यांची राज्यपाल नामित सदस्य म्हणून नियुक्ती केली. तर अधिसभेवरही दहा सदस्यांची नियुक्ती केली. तसे पत्र विद्यापीठाला प्राप्त झाले आहे. मात्र, राज्यपालांच्या आदेशानंतरही विद्यापीठाकडून कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनी सदस्यांचे नियुक्तीचे तसे पत्र काढले नाही. व्यवस्थापन परिषदेवर शिक्षण मंचाच्या डॉ. कल्पना पांडे यांच्या नियुक्तीसाठी कुलगुरू आग्रही होते. त्यामुळे राज्यपालांच्या निर्णय बदल होईल या अपेक्षेने कुलगुरू पत्र काढत नसल्याची चर्चाही शैक्षणिक वर्तुळात आहे.
सहकारी प्राध्यापकांविरोधात लैंगिक छळाची तक्रार असल्याचे सांगून त्यांची आर्थिक लूट करणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्राध्यापक डॉ. धर्मेश धवनकर यांना प्राथमिक चौकशी समितीने दोषी ठरवले आहे. आता त्यांची विभागीय चौकशी करण्यात यावी, अशी शिफारस अहवालात करण्यात आल्याने उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींकडून ही चौकशी होणार आहे. मात्र, अद्यापही चौकशी समिती गठित न झाल्याने डॉ. धवनकर यांची चौकशी कधी सुरू होणार, असा प्रश्न विचारला जात आहे.
नागपूरमधील खसरा क्रमांक ४९, मौजा-चिखली (देवस्थान) तुलसीनगर, शांतीनगर येथील गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाच्या जागेवर अतिक्रमणाचे प्रकरण समोर आले आहे. सोबतच नागपूर सुधार प्रन्यास प्रशासकीय कामकाजाच्या पद्धतीचे लक्तरे देखील वेशीवर टांगली गेली आहेत. २०१४ मध्ये ही भूखंड नियमित करण्यास नकार देणाऱ्या नासुप्रने २०१९ मध्ये मात्र ते नियमित केले आहे.
राजकीय अनास्थेमुळे गेल्या पाच वर्षांपासून बंद असलेली कात्रज उद्यानातील फुलराणी लवकरच सुरू होणार आहे. फुलराणी सुरू करण्यासाठी मनसे नेते वसंत मोरे यांनी पुढाकार घेत फुलराणी नव्या दमात रूळावर आणली आहे.
म्हाडाच्या कोकण मंडळाच्या बाळकुम प्रकल्पातील वाहनतळाच्या इमारतीचे काम संथगतीने सुरू असून या प्रकल्पातील १९४ घरांना मार्चपर्यंत निवासी दाखला मिळणे अशक्य आहे. त्यामुळे घराची ५० टक्के रक्कम भरण्यासाठी दोन महिने मुदतवाढ द्यावी, अशी मागणी बाळकुममधील १९४ पात्र विजेते / लाभार्थ्यांनी कोकण मंडळाकडे केली आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'एबीपी माझा'च्या 'माझा महाराष्ट्र, माझा व्हिजन' कार्यक्रमात बोलत होते.
मुंबई दौऱ्यावर असताना बँकेत पैसा ठेवून विकास होत नाही, तो पैसा विकासासाठी वापरला पाहिजे, असा टोला पंतप्रधान मोदी यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला होता. यावरून मुंबई महापालिकेचे हजारो कोटींच्या ठेवी या लोकप्रतिनिधी आणि आयुक्तांनी घेतलेल्या मेहनतीमुळे ठेवता आल्या आहेत, असं प्रत्युत्तर उद्धव ठाकरे यांनी काल पंतप्रधान मोदी यांना दिलं. दरम्यान, यावरून भाजपा नेते आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. उद्धव ठाकरेंनी मुंबई महापालिका शेठजींसारखी चालवली, असं ते म्हणाले. मुंबईत माध्यमांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली. सविस्तर वाचा
आर. डी. कुलकर्णी समितीच्या अहवालानुसार राज्यातील प्रत्येक विद्यापीठात शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीबाबत काय कार्यवाही झाली, विद्यापीठांच्या अडचणी आहेत, अंमलबजावणी समितीची स्थापना, समितीचे कामकाज या अनुषंगाने बैठकीत आढावा घेण्यात आल्याचे डॉ. करमळकर यांनी सांगितले.
कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली असून २७ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. या निवडणुकीची जिल्हा प्रशासनाकडून पूर्व तयारी सुरू आहे. मतदानासाठी जिल्हा प्रशासनाला १७२० मतदान यंत्रे (इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन – ईव्हीएम) प्राप्त झाली असून या यंत्रांच्या प्राथमिक तपासणीचे काम सुरू करण्यात आले आहे.
शहरातील बेकायदा हुक्का पार्लरवर गुन्हे शाखेने छापे टाकले. बंडगार्डन रस्त्यावरील राजा बहाद्दुर मिल परिसर तसेच कोरेगाव पार्क भागातील दोन हुक्का पार्लरवर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी हुक्कापात्र, सुगंधी तंबाखू असा मुद्देमाल जप्त केला.
शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी शहराच्या २१ ठिकाणी उड्डाणपूल, भुयारी मार्ग आणि नदीवरील पूल उभारण्याचे महापालिका प्रशासनाच्या विचाराधीन आहे. त्यासाठी येत्या काही दिवसांत सल्लागारांची नियुक्ती केली जाणार असून सल्लागाराच्या अहवालानंतर कामे सुरू करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.
अधिकारी, कर्मचारी भरती करावी, पाच दिवस काम, नव्या कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्तिवेतन योजना लागू करावी, निवृत्तिवेतन योजना अद्ययावत करावी अशा विविध मागण्यांसाठी बँक ऑफ महाराष्ट्र आणि बँक ऑफ इंडिया या दोन बँकांच्या कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी (२७ जानेवारी) संपाची हाक दिली आहे.
ठाण्यातील कॅसलमिल नाका येथील मीनाताई ठाकरे उड्डाणपूलावर दुचाकीचे नियंत्रण सुटल्याने उड्डाणपूलावरून खाली पडून दोघांचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी पहाटे उघडकीस आली आहे. प्रतिक मोरे (२१) आणि राजेश गुप्ता (२६) अशी मृतांची नावे आहेत.
खासदार धनंजय महाडिक यांच्या वाढदिवसानिमित्त पंढरपूर तालुक्यातील टाकळी येथील भीमा सहकारी साखर कारखान्यावर कुस्तांचं आयोजन करण्यात आलं आहे. भीमा केसरी स्पर्धेसाठी उपमहाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड, पैलवान सिकंदर शेख यांच्यासह अन्य राज्यातील पहिलवान कुस्तीच्या फडात उतरणार आहेत.
‘बीबीसी’ने नुकताच गुजरात दंगलीबाबत एक माहितीपट प्रदर्शित केला आहे. ‘इंडिया: द मोदी क्वेशन’ नावाच्या या माहितीपटातून गुजरात दंगलींमध्ये तत्कालीन गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहेत. या माहितीपटावरून देशातील राजकीय वातावरण सध्या चांगलंच तापलं आहे. दरम्यान, केंद्र सरकारने या माहितीपटावर बंदी आणली असली तरीही हैदाराबाद विद्यापीठात विद्यार्थ्यांकडून या माहितीपटाचं स्क्रीनिंग केल्याची बाब उघडकीस आली आहे. याप्रकरणी विद्यापीठ प्रशासनाकडून चौकशीचे निर्देश देण्यात आले आहेत.
महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोड एका क्लिकवर…