Latest Political News In Maharashtra: राज्यात सर्वत्र दिवाळी साजरी होत असताना राजकीय क्षेत्रातही आरोप-प्रत्यारोपांचे फटाके उडताना पाहायला मिळत आहेत. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर झालेले जमीन गैरव्यवहाराचे आरोप आणि भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी शनिवारवाड्यात नमाज पठणास विरोध करत केलेल्या आंदोलनामुळे पुणे राज्यात चर्चेत आले आहे. यासह राज्यातील राजकीय क्षेत्रात आज घडलेल्या पाच घडामोडींचा आढावा घेऊया.

“…त्यापेक्षा एखाद्या आमदाराला कापून टाका”, बच्चू कडू यांचे वादग्रस्त विधान

बुलढाणा जिल्ह्यातील पातुर्डा गावात राज्यव्यापी शेतकरी हक्क परिषद पार पडली. या परिषदेत शेतकऱ्यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी बच्चू कडू यांनी एक खळबळजनक विधान केले आहे. राज्यातील कृषी क्षेत्रावर आलेले संकट त्यातून शेतकऱ्यांच्या वाढत असलेल्या आत्महत्या यावर बच्चू कडू भाष्य करत होते. यावेळी ते उपस्थितांना उद्देशून म्हणाले, “अरे आत्महत्या करण्यापेक्षा एखाद्या आमदाराला कापून टाका.”

बच्चू कडू यांच्या या विधानावर आता राजकारणातून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार, भाजपाचे आमदार प्रवीण दरेकर आणि राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी कडू यांच्या विधानावर नाराजी व्यक्त करत त्यांचा निषेध व्यक्त केला आहे.

“न्यायाला उशीर होणे हा अन्यायच”, असीम सरोदेंचे वक्तव्य चर्चेत

शिवसेना पक्ष चिन्ह आणि नावाबाबतची सुनावणी १२ नोव्हेंबरपासून सुरु होते आहे. २०२२ मध्ये जेव्हा एकनाथ शिंदेंनी बंड केलं तेव्हा त्यांच्या विरोधात उद्धव ठाकरे सर्वोच्च न्यायालयात गेले. कारण निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्ह हे एकनाथ शिंदेंचं आहे असा निकाल दिला होता. दरम्यान याबाबत ज्येष्ठ कायदे तज्ज्ञ असीम सरोदे यांनी भाष्य केले आहे. असीम सरोदे म्हणाले की, “वारंवार तारीख देण्याची जी प्रक्रिया आहे ती वाईट पातळीला पोहचली आहे. न्यायाला उशीर होणे हा अन्यायच आहे. तारीख देण्याच्या माध्यमातून अन्याय होत असेल, अन्यायाला खतपाणी मिळत असेल तर हा मुद्दा गंभीर आहे. उद्धव ठाकरेंचीबाजू संवैधानिक पातळीवर अत्यंत मजबूत आहे. त्यामुळे जो निर्णय आहे तो न्यायालयाने त्वरित द्यावा असे मला वाटते.”

अजित पवार गटाच्या महिला नेत्याकडून मेधा कुलकर्णी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी

पुण्यातील शनिवारवाड्यात दोन दिवसापूर्वी काही मुस्लीम महिलांनी नमाज पठण केल्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला होता. यानंतर भाजपाच्या राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांनी रविवारी (१९ ऑक्टोबर) दुपारी काही हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन शनिवारवाड्यात मुस्लिम महिलांनी ज्या ठिकाणी नमज पठण केले होते त्या जागेवर गोमूत्र शिंपडलं आणि ती जागा शेणाने सारवली. तसेच त्या ठिकाणी शिववंदना केली. यासह मेधा कुलकर्णी व त्यांच्याबरोबर आलेल्या कार्यकर्त्यांनी शनिवारवाडा परिसरातील मजार काढून टाकण्याची मागणी केली.

यावरून मेधा कुलकर्णी यांच्यावर काँग्रेससह विरोधी पक्षांनी टीका केली आहे. त्यापाठोपाठ त्यांच्याच मित्रपक्षांनी देखील त्यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (अजित पवार) नेत्या रूपाली ठोंबरे-पाटील यांनी खासदार मेधा कुलकर्णी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. यासह त्यांनी भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने मेधा कुलकर्णी यांना समज द्यावी असेही सुचवले आहे.

‘मतचोरांना हद्दपार करण्यासाठी मराठी-अमराठी लोक एकत्र’; उद्धव ठाकरे यांचे वक्तव्य

भाजपाच्या माजी नगरसेविका संगीता गायकवाड यांनी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. इतर काही नेतेही शिवसेनेत आले. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी छोटेखानी भाषण केले. ते म्हणाले, “सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देतो. आज नरक चतुर्दशी आहे, कृष्णाने नरकासूराचा वध केला. नरकासूर कोण वेगळे सांगायची गरज नाही. त्याचा वध करण्यासाठी संगीता गायकवाड आणि इतर मंडळी शिवसेनेत आली आहेत. आता हा प्रवाह सुरु झाला आहे. जे मतचोरी करुन तिकडे बसले आहेत त्यांची चोरी आपण चोरांसकट पकडली आहे. या चोरांना हद्दपार करण्यासाठी सर्व मराठी माणसे, अमराठीही एकत्र आले आहेत. कारण कुणालाच हे आवडलेले नाही.”

“तुम्ही परमेश्वर गहाण ठेवलात”, शिंदे गटाच्या माजी आमदाराची केंद्रीय मंत्र्यांवर टीका

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊसच्या जमिनीच्या व्यवहारावरून माजी आमदार व शिवसेना (शिंदे) नेते रवींद्र धंगेकर यांनी केंद्रीय राज्यमंत्री तथा भारतीय जनता पार्टीचे खासदार मुरलीधर मोहोळ यांच्यावर टीका केली आहे. टीव्ही ९ मराठीशी बोलताना ते म्हणाले, “एवढे सगळे करून मुरलीधर मोहोळ म्हणतायत की ‘मी जैन धर्माबरोबर आहे, मी भावना दुखावलेल्या नाहीत.’ खरेतर त्यांनी मंदिर गहाण ठेवले आहे, तुम्ही त्यांच्या जमिनी खाल्ल्या आहेत, तुम्ही त्यांचा देव खाल्ला, तुम्ही परमेश्वर गहाण ठेवलात, इतके मोठे झालात का तुम्ही? हे पाप करून ते एकदाही म्हणाले नाहीत की जैन मंदिर वाचले पाहिजे. हा व्यवहार थांबला पाहिजे.”