कराड : शिक्षकांना जुनी पेन्शन (निवृत्ती वेतन) योजना व टप्पा वाढ अनुदान देण्यासह मुख्याध्यापक व एकूणच शिक्षण क्षेत्रासमोरील प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही राज्याचे पर्यटनमंत्री तथा सातारचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाच्या कराड येथे आयोजित दोन दिवसीय ६४ व्या अधिवेशनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून मुकेश पाटील (नंदुरबार) हे तर, स्वागताध्यक्ष म्हणून राज्याचे माजी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील हे उपस्थित होते. आमदार महेश शिंदे, आमदार जयंत आसगावकर, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे आदींची प्रमुख उपस्थिती होती. अधिवेशनास राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दूरभाष्य प्रणालीद्वारे अधिवेशनाला संबोधित करताना, शिक्षक, मुख्याध्यापकांप्रती सद्भावना व्यक्त केली. त्यांच्या न्याय भूमिकेस समर्थन असल्याचे उभय नेत्यांनी सांगितले.

शंभूराज देसाई म्हणाले की, लोकांना दानधर्म करून जेवढं पुण्य मिळत नाही, त्यापेक्षा जास्त पुण्य तुम्ही शिक्षक ज्ञानार्जनाचे काम करून मिळवता. तरी, तुमचे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. कितीही संकटे आली, अडचणी आल्या तरी प्रत्येक समाज घटकाला न्याय देण्याचे काम ‘महायुती’चे सरकार करणार असल्याचा विश्वास मंत्री शंभूराज देसाई यांनी दिला.

बाळासाहेब पाटील म्हणाले, महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी कृषी, औद्योगिक क्रांतीसह शिक्षणात अमुलाग्र बदल झाला पाहिजे हा विचार मांडला आणि रुजवलाही. या अधिवेशनातून शिक्षण क्षेत्राला चांगली दिशा मिळेल.आमदार महेश शिंदे, म्हणाले, राज्याला दिशा देणारे हे अधिवेशन आहे. पूर्वीच्या शिक्षण पद्धतीप्रमाणे ६४ कला विद्या आजच्या विद्यार्थ्याला आल्या पाहिजेत, त्यांच्यावर योग्य संस्कार रूजवण्याचे काम सर्वांनी केले पाहिजे, अशी अपेक्षा शिंदे यांनी व्यक्त केली. आमदार जयंत आसगावकर, सुभाष माने, विजय पाटील, तानाजी माने आदींनी मनोगत व्यक्त केले. डॉ. चंद्रकांत पाटील, कौस्तुभ गावडे, मंगेश चिवटे, सचिन नलवडे, बिपीन मोरे यांच्यासह राज्यभरातून शिक्षक व मुख्याध्यापकांची अधिवेशनाला मोठी उपस्थिती होती.