Maharashtra Politics Top 5 Political Statements : राज्यात आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली आहे. यातच फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणावरून रुपाली चाकणकर आणि सुषमा अंधारे यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. यावरून सुषमा अंधारे यांनी चाकणकरांचा राजीनामा घेण्याची मागणी केली. दुसरीकडे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बच्चू कडू यांचं नागपूरमध्ये आंदोलन सुरू केलं आहे. या आंदोलनावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रतिक्रिया देताना शेतकरी आंदोलनात हौसे, नवसे, गवसे असल्याचं वक्तव्य केलं आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर आज दिवसभरातील पाच महत्वाची राजकीय विधाने काय आहेत? ते जाणून घेऊयात.
“रुपाली चाकणकरांचा तातडीने राजीनामा घ्या” : सुषमा अंधारे
फलटण तालुक्यातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणानंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आणि शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. यातच आज सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेत रुपाली चाकणकर यांचा तातडीने राजीनामा घेण्याची मागणी केली आहे. सुषमा अंधारे यांनी म्हटलं की, “राष्ट्रीय महिला आयोगाने राज्य महिला आयोगावर राजकीय हेतून प्रेरित काम करणाऱ्या व्यक्तीला तातडीने स्पष्टीकरण मागवायला हवं. तसेच एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर बदनामी केल्याप्रकरणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा सुनील तटकरे यांनी तातडीने राजीनामा घ्यावा”, अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली आहे.
“शेतकरी आंदोलनात हौसे, नवसे, गवसे…” : देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी प्रहार जनशक्ती पार्टीचे प्रमुख बच्चू कडू यांनी नागपूरमध्ये आंदोलन सुरू केलं आहे. या आंदोलनावर व शेतकऱ्यांच्या मागण्यांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. फडणवीस म्हणाले, “शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत सरकार पहिल्या दिवसापासून सकारात्मक भूमिकेत आहे. पण आंदोलकांनी लोकांना त्रास होईल असं काहीही करू नये. अशा प्रकारच्या आंदोलनात काही हौसे नवसे गवसे शिरतात. अर्थात या आंदोलनात शेतकरी देखील आहेत. परंतु, अनेक लोक, वेगवेगळ्या प्रवृत्ती आंदोलनात शिरून आंदोलनाला हिंसक वळण कसं देता येईल यासाठी प्रयत्न करतात. त्यामुळे सावध राहणं आवश्यक आहे. आंदोलकांनी रेल रोको, रास्ता रोको, चक्काजाम अशा गोष्टी करू नयेत.”
“बंगल्यातून सीडींसोबत काही लोकांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे चोरीला” : एकनाथ खडसे
आमदार एकनाथ खडसे यांच्या जळगावमधील बंगल्यातून सोने-चांदीसह रोख रकमेची चोरी झाल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली. दरम्यान, चोरट्यांनी सोने-चांदीसोबत सीडी, काही लोकांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे असलेली महत्वाची कागदपत्रेही चोरून नेल्याचा दावा खडसे यांनी आता केला आहे. चोरटे नेमके कोणत्या उद्देशाने आले होते, असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला. आमदार खडसे यांनी चोरीच्या घटनेनंतर बंगल्यातील कपाटांमधून आणखी काही सामान चोरीला गेला आहे का म्हणून बारकाईने पाहणी केली. तेव्हा त्यांना कपाटातून काही महत्वाच्या सीडी गायब झाल्याचे दिसून आले. त्या विषयी त्यांनी पत्रकारांना माहिती दिली. चोरट्यांनी चोरून नेलेल्या सीडी फार महत्वाच्या नसल्या तरी कामाच्या होत्या, असे ते म्हणाले.
“शिवसेनेतले निष्ठावंत का पळाले?…”, अमित साटम यांचा ठाकरेंना टोला
उद्धव ठाकरे यांनी वरळी येथील ‘निर्धार’ मेळाव्यात भाजपच्या निष्ठावंताचा कळवळा घेतला, पण शिवसेनेतले निष्ठावंत का पळाले याचाही त्यांनी विचार करावा, असा टोला मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी लगावला आहे. ‘ईव्हीएम’च्या रडगाण्याला मतदार आता कंटाळलेत, असाही खोचक सल्ला साटम यांनी ठाकरे बंधूंना दिला आहे.
रणजितसिंह निंबाळकरांच्या अटकेची हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी
फलटण तालुक्यातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणामुळे राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. या प्रकरणावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. यादरम्यान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज बीड जिल्ह्यात जाऊन मृत संबंधित महिला डॉक्टरच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना हर्षवर्धन सपकाळ यांनी महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सरकारने एसआयटीची स्थापना करावी. तसेच या प्रकरणात भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना तात्काळ अटक करावी”, अशी मागणी हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.
