Maharashtra Political News: राज्यात गेल्या काही दिवसांपासून फलटणमधील डॉक्टर तरुणीची आत्महत्या, पुण्यातील जैन बोर्डिंगवरून केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्यातील आरोप-प्रत्यारोप, तसेच बच्चू कडू यांचे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठीचे आंदोलन चर्चेत आहेत. याच घडामोडींशी संबंधित दिवसभरातील चर्चेत असलेल्या पाच राजकीय विधानांचा आढावा घेऊया.
“हे शब्दांत गुंडाळणारं बेभरवशी सरकार”, रोहित पवारांची बच्चू कडूंना उद्देशून पोस्ट
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी माजी आमदार बच्चू कडू आक्रमक झाले आहेत. यासाठी त्यांनी काल नागपूरमध्ये आंदोलन केले होते. या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी एक्सवर पोस्ट केली आहे. ते म्हणाले की, “बच्चूभाऊ आपण मुंबईत बैठकीला गेला आहात तर नक्कीच या बैठकीतून काहीतरी सकारात्मक निर्णय होईल, अशी अपेक्षा करूयात. पण हे गोलगोल बोलून शब्दांत गुंडाळणारे बेभरवशी सरकार आहे. कारण सरकारने शब्द देऊनही आपण मुंबईत आलात आणि काही शेतकरी संघटनेच्या नेत्यांना ताब्यात घेतले.”
रोहित पवार पुढे म्हणाले की, “या कृतीवरून सरकारने शेतकरी आंदोलनापासून जनसुरक्षा कायद्याची ट्रायल घ्यायला सुरवात केली की काय, असे दिसतेय. तसे असेल तर याविरोधातही लढू, पण आज शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी आपल्यासोबत आहे. आज जर न्याय मिळाला नाही तर पंढरीच्या पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक होऊन तिथेच आंदोलनाला पुन्हा सुरवात करू. शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी जुलमी सरकारविरोधात ताकदीने लढू आणि जिंकू.”
“सरकारला प्रतिडाव टाकून प्रतिउत्तर देण्याची गरज”, शेतकरी आंदोलनावर जरांगे-पाटील यांची प्रतिक्रिया
शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफी आणि कर्जमुक्तीच्या मागणीसाठी वर्धा मार्गावरील परसोडी येथे शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. मुख्यमंत्र्यांशी फोनवरून काल रात्री झालेल्या चर्चेनंतर बच्चू कडू आणि शेतकरी नेते मुंबईला चर्चेसाठी गेले आहे. मात्र, आंदोलन सुरूच असून आज मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनस्थळी भेट दिली. परसोडी येथील मोकळ्या जागेत मांडव टाकण्यात आले आहे. तेथे शेतकरी आंदोलन सुरू आहे. त्यासाठी आज जरांगे पाटील पोहोचले.
यावेळी बोलताना जरांगे पाटील यांनी गेल्या ७५ वर्षांत सर्वांनी मिळून शेतकऱ्यांना लुटले आहे. शेतकऱ्यांच्या न्याय हक्क मिळवण्यासाठी सरकारविरोधात प्रतिडाव टाकला गेला आहे. सरकारला प्रतिडाव टाकून प्रतिउत्तर देण्याची गरज आहे, असेही जरांगे म्हणाले.
“शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत सरकारमध्ये दुमत नाही”, कृषीमंत्री दत्तात्रय भरणे
अतिवृष्टीमुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात येणाऱ्या दहा ते पंधरा दिवसांमध्ये पैसे जमा होतील, असा विश्वास कृषीमंत्री दत्ता भरणे यांनी व्यक्त केला आहे. नुकसानग्रस्त भागातील पंचनामे झाले आहेत. ज्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे आले नाहीत, त्यांच्या खात्यात लवकरच पैसे जमा होतील, असे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले आहे. ते पिंपरी-चिंचवडमध्ये बोलत होते. बच्चू कडू यांच्या आंदोलनाविषयीदेखील त्यांनी मत व्यक्त केले.
दत्तात्रय भरणे म्हणाले, “राज्यात गेल्या सहा महिन्यांपासून सतत पाऊस कोसळत आहे. एकाच दिवशी वर्षभराचा पाऊस होत आहे. इतका मुसळधार पाऊस कोसळत आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना अतोनात नुकसान झाले आहे. पंचनामे करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते; ते आता पूर्ण झाले आहे. अनेक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात नुकसानभरपाईचे पैसे जमा झाले आहेत. ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत, त्यांच्या खात्यावर पुढील दहा ते पंधरा दिवसांमध्ये पैसे जमा होतील.”
वेळ येऊ द्या, सगळे सांगेन: मुरलीधर मोहोळ
पुण्यातील जैन बोर्डिंग जमीन प्रकरणाचा वादग्रस्त व्यवहार रद्द करण्याचा निकाल आज धर्मादाय आयुक्तांनी दिला आणि गेल्या काही दिवसांपासून या मुद्द्यावरून चालू असलेल्या वादावर पडदा पडला. मात्र, हा पडदा तात्पुरता असल्याचेच पुण्यातील खासदार व केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या विधानावरून सूचित होत आहे.
धर्मादाय आयुक्तांनी आज दिलेल्या निकालावर मुरलीधर मोहोळ यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाष्य केले. यावेळी एकीकडे झालेला निर्णय चांगला झाल्याचे सांगतानाच मोहोळ यांनी येत्या काळात या प्रकरणात नेमके काय काय घडले, हे सगळे मी सांगणार आहे, असेही त्यांनी नमूद केले.
यावेळी मुरलीधर मोहोळ म्हणाले की, “पहिल्या दिवसापासून पुण्यातल्या जैन बांधवांनी व्यक्तिगत स्वरूपात माझे कधीच नाव घेतले नाही. कारण त्यांनाही माहिती होते की यात वास्तव काय आहे. पण ठीक आहे, जे झाले ते झाले. आता मला त्यावर बोलायचे नाही. पण आज झालेला निर्णय ही सगळ्यांसाठीच अत्यंत समाधानाची बाब आहे. येत्या काळात या प्रकरणात नेमके काय काय घडले, हे सगळे मी सांगणार आहे.”
“आम्हाला तर दर पाच वर्षांनी…”, निवडणुकींबाबत देवेंद्र फडणवीस यांचे मिश्किल विधान
अमरावती येथील एका कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाषणात केलेल्या एका वक्तव्यामुळे सभागृहात चांगलाच हशा पिकला. मुख्यमंत्री म्हणाले, अभिनंदन बँकेचे अध्यक्ष ॲड. विजय बोथरा हे सातत्याने अध्यक्षपदी बिनविरोध निवडून येत आहेत. २१ वर्षांपासून ते अध्यक्ष आहेत. आम्हाला तर दर पाच वर्षांनी निवडणुकांना सामोरे जावे लागते. २१ वर्षे तुम्हालाच कसे अध्यक्ष राहता येते, याचे काही गणित तुमच्याकडे असेल, तर ते आम्हालाही समजून सांगावे. पण, २१ वर्षे पदावर राहून इतके गुणवत्तापूर्ण काम करणे, हे अत्यत महत्वाचे आहे.”
